Tuesday, September 8, 2020

रियाला अटक...त्यांचं काय? घराणेशाहीच्या 'सेल्फी'शगिरीमुळे 'ते' वाचणार ?

सुशांतचा रहस्यमय मृत्यू झाला तो १४ जून रोजी. मुंबई पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. समाजमाध्यमांवर सुशांतला न्यायासाठी जोरदार आवाज उठवला जावू लागला. सुशांतनं आत्महत्या केली नसून त्याचा बॉलिवूडमधील घराणेशाहीनं बळी घेतलाय, असा आरोप एकाचवेळी अनेकांकडून केला गेला. त्यातही रियाच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्यांसारख्याच अनेकांनी बॉलिवूड घराणेशाहीविरोधात मोहिम चालवली. कधी घराणेशाहीविरोधात करण जोहर, कधी धार्मिक कारणांमुळे खानांविरोधात हॅशटॅगही ट्रेंड झाले. बॉलिवूड प्रस्थापित घराण्यांमधील स्टार पुत्र-कन्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. त्यांच्या चित्रपटांवर बहिष्काराचीही भाषा वापरली गेली. ज्यांच्याविरोधात हॅशटॅग ट्रेंड झाले त्यांचे देशाच्या पंतप्रधानांसोबतचे सेल्फी फोटोही काहींनी ट्रेंड केले. राजकारण दोन्ही बाजूंनी उफाळलं. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुशांत प्रकरण राजकारणामुळे भलतं वळण घेत आहे हे लक्षात आलं नाही. ते गाफिल राहिले. केलेल्या तपासावर संतुष्ट. 

त्यांची अडचण झालीच. पण तरीही एक बरं वाटत होतं. काही वेगळं घडतंय. अनेकांना वाटलं होतं बॉलिवूडमध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर दबलेला असंतोष व्यक्त करणारी, सर्वच प्रतिभावंतांना समान न्याय मिळवून देणारी क्रांती घडतेय की काय! पण तसं काहीच झालं नाही. अचानक बिहार पोलीस सक्रिय झाले. तिथं पाटण्यात रिया चक्रवर्ती या सुशांतच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा नोंदवला गेला. झपाट्यानं हालचाली झाल्या. राजकारणही जोरात रंगू लागलं. रंगतंय. थेट आदित्य ठाकरेंपर्यंत भाजप नेत्यांनी नाव न घेता आरोप केले. सीबीआय चौकशीची मागणी सुरु झाली. महाराष्ट्र सरकारनं ती फेटाळताच बिहार सरकारनं मात्र तातडीनं तशी शिफारस केली. पुढे सर्वोच्च न्यायालयानंही सीबीआय चौकशीच्या बाजूनं कौल दिला. सीबीआय चौकशी सुरु होती. त्यात डीआरआयनंही तपास सुरु केलाच होता. त्यांना सापडलेल्या माहितीवरून एनसीबी म्हणजेच अंमलीपदार्थविरोधी तपास यंत्रणेचा प्रवेश झाला. 
आता अटकेची कारवाई केली आहे ती एनसीबीने. आरोप सुशांतला रियाने भाऊ आणि मित्रांच्यामाध्यमातून गांजा हा अंमलीपदार्थ मिळवून दिल्याचा. प्रकरण ड्रगचं. ड्रग हे मानवजातीला झालेला कर्करोग असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यामुळे डिलर असो, पेडलर असो की यूजर. ड्रग प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. त्याबद्दल कुणाचंही दुमत असू नये. 
पण एक अपेक्षा. यूजर किंवा पेडलर कारवाई तर मुंबईचे बीट हवालदारही करतात. बिहार गाजवून आलेले आयपीएस शिवदीप लांडेही गेले वर्षभर ड्रग माफियांविरोधात त्यांच्यापरीनं कारवाई करतच आहेत. एनसीबीनं, डीआरआयनं, सीबीआयनं बीट हवालदारांच्या पुढे जावं. फक्त यूजर, पेडलर नको. मोठे डिलर, त्यांचे ड्रग कार्टेल चालवणारे इंटरनॅशनल माफियांच्याही मुसक्या आवळाव्यात. फक्त रिया सापडल्यानं राजकीय लक्ष्य पूर्ण झालं असेल. पण ड्रग विळख्यातून देश सोडवायचं राष्ट्रीय लक्ष्य विसरू नये. ते जास्त महत्वाचं! 
दुसरी आठवण करून द्यायची आहे ती आज रियाच्या अटकेनंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना. तुम्हीही तुमची आधाची मोहिम विसरू नका. बॉलिवूडमधील घराणेशाहीवरील, 'खान'दानांवरील तुमचे आरोप तुम्ही विसरला असाल पण डिजिटल युग साऱ्याचीच नोंद ठेवते. रियानंतर तुम्ही ज्यांची ज्यांची नावे घेतली ते बॉलिवूडमधील सारेच चौकशीच्या फेऱ्यात, पुरावे सापडले तर कारवाईच्या घेऱ्यातही आलेच पाहिजेत. कंगनासारखी साक्षीदार आहेच. त्यामुळे पुरावे नाहीत, असंही म्हणता येणार नाही. नाही तर घराणेशाहीमुळे 'ते' वाचले, 'ही' बळीची बकरी, अशी 'सेल्फी'शगिरी झाली असं वाटायचं!

- तुळशीदास भोईटे
9833794961

Saturday, September 5, 2020

'तबेल्या'ची शाळा करणाऱ्या माई...सरोज पाटील मॅडम !

 



मुंबईसारखं महानगर. विलेपार्ले हे सांस्कृतिक शैक्षणिक राजधानी म्हणावं असं उपनगर. तिथं पार्ले टिळकसारख्या नामांकित शैक्षणिक संस्था. तिथंच पार्ले टिळकपासूनच काही अंतरावर एक शाळा मात्र काहीशी अंग चोरून वसलेली. माध्यमिक शाळा. ८ वी ते १० वी. शाळा पार्ल्यातील, मात्र शैक्षणिकदृष्ट्या एखाद्या खेडेगावातीलही बरी वाटावी अशी सुमार. इमारतही बैठी चाळीसारखीच वाटणारी. सुविधा नसलेली. 'तबेला' म्हणायचे अनेक लोक. माई म्हणजेच सरोज पाटील मॅडमनी 'तबेला' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या शाळेला शाळेसारखं बनवलं. शाळेचं नाव अभिमानानं घेतलं जाऊ लागलं. छत्रपती शिवाजी विद्यालय, विलेपार्ले, मुंबई !

आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं सध्या कोल्हापुरात असणाऱ्या सरोज पाटील मॅडमशी बोललो. त्यांच्याशी बोलताना ऐकलेला आणि अनुभवलेला इतिहास नजरेसमोर तरळला. 

पाटील मॅडममुळेच शाळा सुधारली, निकाल सुधारला आणि त्या शाळेत शिकणाऱ्या माझ्यासारख्या हजारोंचं जीवनही घडवलं गेलं. होय, मलाही घडवणारी हीच शाळा !! पण मी तसा सुदैवी, कारण मी १९८२मध्ये शाळेत गेलो, तोपर्यंत पाटील मॅडमनी शाळेत चांगले बदल घडवून आणले होते. पण काही वर्षे मागे गेलं तर खूप भलतीच स्थिती होती. आज पाटील मॅडमशी बोलताना अनेकांकडून ऐकलेला शाळेचा तो इतिहास आठवला.

आमचं छत्रपती शिवाजी विद्यालय विलेपार्ल्यात. पण शाळेत विलेपार्ले नव्हतं. कारण तिथं येणारा वर्ग हा समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सर्वात तळागाळात असणारा. अनेकांची तर शिकणारी पहिली किंवा दुसरीच पिढी. पार्ल्यापेक्षा शेजारच्या अंधेरी, सहार, सांताक्रुझ या उपनगरांमधील चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील कष्टकरी कुटुंबातील मुलं-मुली कुठंच प्रवेश मिळत नाही म्हणून त्या शाळेत येत. 

मी मनपा शाळेत शिकलेलो. शैक्षणिक कामगिरी तशी बरीच. पण का कोणास ठाऊक आईनं अंधेरीतील जवळच्या शाळा न निवडता तशी दूरची पार्ल्यातील शाळा निवडली. बहुधा तीही कामगार असल्यानं इतर कामगारांकडून पाटील मॅडम, इतर शिक्षक वर्गाविषयी ऐकलं असावं. त्यामुळे एक चांगलं झालं. चालण्याची मस्त सवय लागलीच आणि जीवनाला दिशाही मिळाली. 

जुन्या काहींशी बोलल्यावर कळतं शाळा मी प्रवेश घेतला तेव्हा जशी बदलली होती, बदलत होती तशी पूर्वी नव्हती. १९६५मध्ये पाटील मॅडम आल्या. सुरुवातीला शिक्षिका. पगाराच्याही बोंबा. कसंबसं चालायचं. पुढे कायम झाल्या, पण पगार तसा हाती येतच नव्हता. चेकनं पगार सुरु झाला आणि त्यांच्यासारख्या शिक्षकांना दिलासा मिळाला. 

शाळेत येणारे विद्यार्थी चाळी, झोपडपट्ट्यांमधील. असं म्हणतात की त्याकाळी काही मुलं चाकू सुरेही आणायचे. त्यामुळे शिक्षकांनी शिस्त लावण्यासाठी शिक्षा करणं दूरच, तेच टरकून असायचे. शिक्षकांनी नोकरी सोडण्याचे प्रमाण जास्त असायचं. क्वचितच कुणी टिकायचं. पाटील मॅडमसाठी मात्र शाळा अशी असणं हेच समर्पितपणे काम करण्याची संधी असावी. त्याचं कारण त्यांची सामाजिक बांधिलकीची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यातूनच घडलेला स्वभाव असावा. त्या टिकून राहिल्या. परिस्थिती बदलण्यासाठी झगडत राहिल्या. त्यांना मुख्याध्यापिकापदाची जबाबदारी मिळाली ती 'ओसाडगावच्या पाटीलकी'सारखीच. पण त्यांनी ओसाडगावातच शिक्षणाचं नंदनवन फुलवलं. आमच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षणच नाही तर शिस्त आणि संस्कारही मिळू लागले. 

छत्रपती शिवाजी विद्यालयातील शैक्षणिक आणि इतर संस्कारांमुळे माझं तर जीवनच बदलून गेलं. आईची शाळेची निवड सार्थ ठरली. 

शिवीगाळ, रासवट वागणं चहूबाजूला असणाऱ्या वस्त्यांमधील आम्ही मुलं छत्रपती शिवाजी विद्यालयात घडवले गेलो. मला तसं वाचनाचं वेड बालपणापासूनच. पण छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रत्येक वर्गात पुस्तकांची पेटी येत असे. त्यातील पुस्तकांनी वाचन वेडाला आकार दिला. 

पत्रकार झालो ते वाचनाच्या वेडातून. त्या वेडाला आकार दिला तो शाळेतील त्या पुस्तक पेटीनं. तसंच लोकांसमोर, कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा आत्मविश्वास जोपासला तोही शाळेतील दर एक ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेतून. विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग कष्टकरी. कमीच भाग घ्यायचे. पण शिक्षकांच्या खोलीतील माइकसमोर उभं राहून बोलताना शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आपलं बोलणं ऐकत आहेत ही जाणीव माझा आत्मविश्वास वाढवत गेली. मी तसाही घडलो.

संस्थेतील प्रतिकुलतेशी लढतानाच पाटीलबाईंच्या सामाजिक जाणीव खूपच तीव्र होत्या. मला आठवतं मी आठवीला होतो. माझ्या सोबतची गिरणीकामगारांची मुलं असणारे मित्र रुबाबात राहायचे. पण तो गिरणी संप झाला. आणि चित्रच बदलले. खरंतर शाळेनं काय करावं? पण माझी शाळा पाटील मॅडमची शाळा होती. त्यांनी शिक्षकांच्या माध्यमातून आम्हा मुलांना विश्वासात घेतलं. कामगिरी दिली. संपानं पोळत असलेल्या गिरणी कामगारांच्या मुलांसाठी समाजातून सहकार्य मिळवण्याची. मला आठवतं. मी रिकाम्या वेळेत अनेक घरं फिरलो. खूप पुस्तकं गोळा झाली. शाळेत तो गठ्ठा नेताना ओझं जाणवलं नव्हतं, उलट आपण काहीतरी करु शकल्याच्या अभिमानानं त्या वयात छाती तट्ट फुगली होती.

मला आठवतं. अगदी आजही लक्षात आहेत आमच्या समूहगीत तासातील गाणी. खरा तो एकची धर्म...पासून अनेक. त्यातही ग.दि.मांडगुळकरांचं...हे राष्ट्र देवतांचे...हे राष्ट्र प्रेषितांचे...हे गाणं आजही मनात निनादत असतं.

"कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची"

हे कर्तव्यदक्षतेचे पाठ आपल्या वागण्यातून आमचा शिक्षकवर्ग आम्हाला रोजच शिकवायचा. 

पाटीलबाईंनी फार आर्थिक बळ नसताना, काही प्रस्थापितांचा साधा खिळाही ठोकण्यास विरोध असतानाही शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामांबरोबरच शिक्षकांच्या मदतीनं शिक्षणाचा दर्जाही असा दुरुस्त केला की इमारत बैठी असली तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाचे मात्र मनोरे उभे राहिले. जणू त्यांच्या रचनात्मक संघर्षातून त्या आम्हाला दाखवून देत असत...

"येथे नको निराशा, थोडया पराभवाने

पार्थास बोध केला येथेच माधवाने"

     माझ्यासारख्यांवर पद, सत्ता हाती असतानाही जमिनीवरच राहण्याचे संस्कारही झाले ते पाटील मॅडममुळेच. काहीवेळा चांगला पगार, सोयीसुविधा, मोठं पद असलेली नोकरी सोडून वेगळा प्रयत्न करण्याचं बळही आईच्या संस्कारांप्रमाणेच शाळेतील मॅडमचं वागणं पाहूनही मिळालं असावं. मॅडम महाराष्ट्रातील महानेत्याच्या कुटुंबातील. मात्र, मला आजही आठवतात...स्कुटरवरून येणाऱ्या, अनेकदा स्कुटर स्टार्ट करण्यासाठी किकवर किक मारणाऱ्या आमच्या पाटीलबाई. कडक शिस्तीच्या पण मायाळू स्वभावाच्या. माती आणि माणसांशी नातं राखणाऱ्या. बहुधा त्या माई म्हणून ओळखल्या जातात, त्यामागे थोरल्या बहिणीची करडी शिस्त आणि माया करणारा स्वभावही असावा.

पाटील मॅडम म्हणतात, "प्रत्येक मुलं हे बुद्धिमत्तेचं लेणं असतंच असतं. शिक्षकांनी शोधून आकार दिला पाहिजे. टाकाऊ काहीच नसतं, तसं वाटलं तरी त्यातूनच टिकाऊ घडवलंच पाहिजे."

घडलं तसंच. शाळेतून डॉक्टर - इंजिनीअर कमी झाले असतील. पण हजारो लघु उद्योजक घडलेत. शाळेच्या संस्कार, शिस्तीतून नेतृत्वगुण वाढवले गेले. छत्रपती शिवाजी विद्यालयात शिकलेल्यांमधून दहा नगरसेवक, दोन आमदार आजवर निवडले गेलेत. 

सरकारी योजना आता खूप आहेत. पण आमच्या शाळेत येणारी मुलं ही खूपच गरीब परिस्थितीतील. मुलींचे तर खूपच हाल. पाटील मॅडमनी एक योजना राबवली. विलेपार्ल्यातील मध्यमवर्गीय कुटुंबांशी संवाद साधला. त्यांना सहकार्यासाठी पुढे आणलं. त्या कुटुंबांनी मुलींना शैक्षणिक दत्तक घेतलं . त्या योजनेतून २५० मुली व्यवस्थित शिकू शकल्या.

मॅडम आणखी एक सांगतात. नव्हे तीव्रतेनं बजावतात. "कधीच नकारघंटा वाजवू नका. प्रयत्न करा. शिक्षकांनी ठरवलं तर खूप करू शकतात. तुम्ही चांगलं काम केलंत तर समाज सोबत येतो."

मॅडम जे बोलतात, त्यांनी करूनही दाखवलं. करूनही दाखवत आहेत. आमच्या शाळेला सभागृह नव्हतं. काय करायचं? प्रत्येक वर्गात स्पीकर लावले. समूह गीत स्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला. क्रीडांगण नसताना मुलांना दुसऱ्यांच्या मैदानात नेलं जायचं. तसं करून मुलांनी करून दाखवलं. शाळेची कबड्डीची टीम स्पर्धा जिंकायची. हे सारं करतानाच शाळा शैक्षणिक क्षेत्रातही पुढे गेली. पार्ले टिळकचा दहावीचा निकाल ९७ टक्के तर छत्रपती शिवाजी विद्यालयाचाही तेवढाच. फरक एकच. पार्ले टिळकची निवडून घेतलेली, तर छत्रपती शिवाजी विद्यालयाची मुलं कुठेही वाव नसलेली. पण कामगिरी सारखीच !

मला अनेकांकडून ऐकलेलं. आवडलेलं एक काम. आमच्या शाळेनं पार्ल्यात अनेक झाडे लावली. जोपासलीही. पार्ल्यातील अनेक झाडं पाटील मॅडमच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावली. मॅडमनी दुधाच्या रिकाम्या पिशव्यांमधून घरून पाणी आणून झाडं जोपासायची सवय लावली, 

जीवनभराचं देणं आम्हाला छत्रपती शिवाजी विद्यालयातून लाभले, ते पाटीलबाई आणि साळवीसर, जंगले सर, भट सर, चव्हाणबाई अशा शिक्षकांमुळे. शिक्षण संपवून आम्ही पुढे निघालो. १९९७नंतर पाटीलबाईही शाळेतून निघाल्या. 

शाळेतून निवृत्त झाल्यावरही माई स्वस्थ नाहीत. नव्हे त्यांना तसं बसणं शक्यच नाही. सध्या त्या कोल्हापुरात एन.डी.पाटील सरांसोबत कृतार्थ जीवन जगत आहेत. मात्र तिथंही स्वस्थ नाहीत. रयत शिक्षण संस्थेच्या किमान ८६ शाळांचा तरी दर्जा अधिक उंचावण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असल्याचं कळत आहे. म्हणजे एक छत्रपती शिवाजी विद्यालय घडवलेल्या आमच्या पाटील मॅडम आता जीवनाच्या या टप्प्यावरही तशाच अनेक शाळा घडवत आहेत आणि माझ्यासारखे लाखो विद्यार्थी ! 

- तुळशीदास भोईटे

9833794961


Thursday, September 3, 2020

...कधी तरी म्हणा मुंबई आपली !


ते फक्त जीवाची मुंबई करतात
उदात्ततेचा आव आणत मुंबई शोषतात
तुमची माझी आमची मुंबई 
अशांना कळणार तरी कशी?
झगमगाटात दिपतातच डोळे आणि डोके
माणसं नाहीच हे पार्टी अॅनिमल पेज थ्रीवाले
मुंबईत जगतात, मुंबईत मिरवतात,
तरी मुंबईवरच दुगाण्या झाडतात?
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !


कधी तरी माणसांसोबतही राहायचं,
जगायची माझी मुंबई
अनुभवाल मुंबईची माणुसकी, 
जिवंतच नाही तर सळसळती
चलाच कधीतरी उघड्या डोळ्यानं, 
खुल्या मनानं मुंबईला जगा
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !


जीवाला जीव देते माणुसकीनं,
एकटं पडू देत नाही ती मुंबई
लोकलच्या गर्दीतही अडलेल्यांना
माणुसकीनं जपते ती मुंबई
बदाबदा पावसात पाण्यात 
बुडू देत नाही माणुसकी ती मुंबई
संकटातही माणुसकीनं 
उपाशी राहू देत नाही ती मुंबई
लॉकडाऊन झालं तरी 
माणुसकी लॉक नसते ती मुंबई
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !


मलबारहिल, नरिमन पॉइंट, जुहू,
फक्त फाइव्ह स्टारच नाही मुंबई
गिरणगावात कष्टाच्या घामाच्या सुगंधात
दणक्यात संस्कृती जपते मुंबई
धारावी म्हटलं तर नाक वेंगाडता, 
तिथंही जगण्याचा उद्योग देते मुंबई
शेअरबाजाराचे सौदे, कॉर्पोरेट उलाढाल
देशाचं अर्थचक्र चालवते मुंबई
धकाधकीचं जीवन, अचाट अफाट वेग
सोबत माणूसपण जपते मुंबई
रस्त्यावरच्या बेघरांना पांघरते माया,
देशातल्या रुग्णांचा आधार मुंबई
मरिन ड्राइव्ह, बँड स्टँड
गर्दीतही प्रेमिकांना एकांत देते मुंबई
मेंदूनं नाही मनानं विचार करा
कधी तरी म्हणा मुंबई आपली !

एखाद्याचं स्वप्न अकालीच शांत होतं,
तेही मनाला लावून घेते मुंबई
विसरू नका आधी स्वप्नं सारी बहरवते, 
ती हीच स्वप्ननगरी मुंबई
जबाबदार असतील ते इतर कुणीही,
चकचकाटातील स्वप्नांचे सौदागर
पेज थ्रीच्या परग्रहावरचे ते,
माय मुंबईतील भलतेच एलियन
उगाच दुषणं का मुंबईला,
लखलखाटात दिसत नसतंच वास्तव 
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !


विचारा संकटातून सावरलेल्यांना, 
कशी आहे आपली मुंबई?
आठवा कधी म्हटलं मुंबईनं परकं,
आपुलकीचा ओलावा कधी आटला?
फुप्फुसावर नाही ह्रदयावरच घातला घाव,
तरी झिडकारलं का मुंबईनं?
मेंदूनं नाही मनानं विचार करा,
कधी तरी म्हणा मुंबई आपली !
माणूस म्हणून विचार करा माणसांसारखा
ह्रदयातूनच उचंबळेल...ही मुंबई आपलीच !

- तुळशीदास भोईटे
९८३३७०४९६१

Wednesday, September 2, 2020

पांडुरंगचा बळी घेणारी 'ती' पाच कारणं !

 पांडुरंग रायकर हा सिस्टमचा बळी. व्यवस्थेचा बळी. आज अनेकांकडून ऐकलं. पण मला वाटतं पांडुरंगचा बळी नेमका का गेला याची पाच कारणं आहेत. त्यासाठी काही प्रमाणात तरी आपणही सारे जबाबदार आहोत.

 मी एक सामान्य पत्रकार. सध्या कोणत्याही प्रस्थापित माध्यमांसोबत नाही. त्यामुळेच आज खूप आतून दाटून आलं त्यामुळे समाजमाध्यमांच्या मुक्तपीठावर व्यक्त होतोय. 

 पांडुरंग रायकर. वय वर्षे ४२. माझा दोन चॅनलमधील तरुण सहकारी. सकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला. हे वय नव्हतंच जायचं. खूप करायचं होतं त्याला. खूप काही. कधीही न चिडणारा. शांतपणे काम करत राहणारा. कुणी त्रास दिला तरी तक्रारही न करणारा. वेगळाच होता तो. आज सकाळी तो गेल्यावर पुण्यातील पत्रकारांना अश्रू आवरत नव्हते त्याचं कारणचं पांडुरंगचा स्वभाव. आपुलकीचं वागणं बोलणं. त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. कारण अनेक जवळच्या मित्रांनी, मोठ्या माणसांनी त्याच्याविषयी भरभरून बोलून झालंय. त्यातील काही तर असेही असावेत की आज त्याच्या मृत्यूनंतरच ते बोलते झाले असावे, काल जेव्हा पुण्यातील पत्रकार पांडुरंगला वाचवण्यासाठी झगडत होते तेव्हा मात्र ते कुठेच नसतील. तेव्हा कदाचित पांडुरंग नावाचा एक पत्रकार त्यांच्या दृष्टीनं तेवढा महत्वाचाही नसावा. त्यामुळेच त्याच्या पुढे जात असं पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न आवश्यक!

 आपला एक पांडुरंग गेला, आणखी कुणाचा पांडुरंग होऊ नये. त्यासाठीच पांडुरंगचा बळी घेणारी कारणं तपासली पाहिजेत. 

कारण -१

 पुण्यासारख्या महानगरात कोरोना अत्यवस्थ रुग्णाला एका कोरोना उपचार केंद्रातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध नसणे. त्याचबरोबर कोरोना जंबो फॅसिलिटीच्या नावाखाली उभारली गेलेली मोठी केंद्रं. उद्घाटन झोकात. मिरवतात नेते. असतं काय? जर पुढील उपचाराची योग्य सोय नसेल, कोणत्या वॉर्डमध्ये, कोणत्या बेडवर कोणता रुग्ण आहे, याची धड नोंद नसेल, जर आपत्कालीन स्थिती उद्भवली तर तर इतरत्र हलवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिकाही नसतील  तर या तथाकथित जंबो फॅसलिटी म्हणजे पोकळ सांगाडेच! 
 बालेवाडीच्याआधी त्याला हिंजवडी कोव्हिड सेंटरला नेण्यात आलं. तिथं हाय प्रेशर ऑक्सिजनच नव्हते. छातीत सूज असल्यानं फिजिशियननं इंजेक्शन दिलं. 
 या पहिल्याच कारणावर आज सर्व प्रस्थापित माध्यमांचा भर राहिला. पण मुळात पांडुरंग पॉझिटिव्ह असतानाही अहमदनगरहून पुण्यात का यावं लागलं तेही महत्वाचं.

कारण -२

 पांडुरंग त्याच्या गावाकडे कोपरगावला गेला होता. तिथंही त्रास होतच असल्यानं तो कोपरगावच्या रुग्णालयात गेला. तिथं तपासणीसाठी अँटीजन किटच नव्हतं. कसंबसं ते काही तासांनी मिळालं. टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र, रुग्णालयानं दाखल करून घेण्यासाठी ४० हजार आगाऊ रक्कम मागितली. त्याच्या पत्नीकडे दहा हजारच होते. अखेर त्याची पत्नी पांडुरंगला घेऊन पुण्याकडे निघाली. 
 कोपरगावातील रुग्णालयासारखी ती रुग्णालयं जी कंपनीनं दिलेलं कॅशलेस मेडिक्लेमचं कार्ड असतानाही तब्बल ४० हजाराची आगाऊ रक्कम मागतात. हा अनुभव सध्या हजारो घेतात. एकीकडे जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा करणारे आरोग्यरक्षक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि दुसरीकडे हे धंदेवाईक ! पांडुरंगचा बळी जाण्यासाठी हेही जबाबदार !!

कारण -३

 तिसरं कारण खूपच महत्वाचं वाटतं. प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर संबंधित व्यक्तीला योग्य सल्ला न मिळणं. योग्य उपचार न मिळणं. आजवर हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी सेवेतील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण काहीवेळा ज्या डॉक्टरांकडे जातात त्यांनी खूप दक्षता घेतली पाहिजे. जर वेळेत कोरोना चाचणीच्या जोडीनं संशय येत असेल तर छातीचे सिटी स्कॅन केले पाहिजे. अनेकदा सुरुवातीला कळतही नाही. पांडुरंगला ताप आल्यानंतर सात दिवसांनी एक चाचणी झाली. ती निगेटिव्ह आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो श्रीरामपूरला गेला. तिथं अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली. हे सारंच विचित्र वाटतंय. चौकशी गरजेची. 
 नेमके हे महत्वाचे दहा दिवस त्याचा संसर्ग जास्त वाढवणारे ठरल्याची शक्यता, वन रुपी क्लिनिकच्या डॉ. राहुल घुले यांनीही व्यक्त केली. ज्याअर्थी ऑक्सिजन पातळी ७८च्याही खाली गेली त्याचा अर्थ संसर्गानं फुप्फुसाची हानी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त झाली असण्याची शक्यता होती, असंही ते म्हणाले. त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक रुग्णाकडे जनरल प्रॅक्टिसनरनी संशयानंच पाहावं. तात्पुरती औषधं देऊ नये. त्यामुळे तापासारखं लक्षण जाईल, पण कोरोना संसर्ग मात्र वाढेल, असे ते म्हणाले. 
 सरकारने जनरल प्रॅक्टिसनरसाठी असे रुग्ण आल्याची माहिती त्वरित स्थानिक आरोग्य यंत्रणेला कळवणं बंधनकारक असावं. जर नसेल तर त्वरित तसं केलं जावं, अशी मागणीही डॉ. घुले यांनी केली. 
 कोरोना उपचाराच्या दृष्टीनं सुरुवातीचे हे दिवस गोल्डन अवर, पांडुरंगच्या बाबतीत तिथं अक्षम्य दिरंगाई झाली, असं दिसतंय. 

कारण -४

 पांडुरंग रायकरला कोरोना झाला तो धोकादायक परिस्थितीत फिरल्यामुळे हे नाकारताच येणार नाही. टीव्ही 9 असो किंवा अन्य कोणतंही चॅनल आपल्या कर्मचाऱ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्याचे प्रयत्न कंपनीचं धोरण म्हणून असतातच. प्रसंगी नुकसान सहन करुनही. मात्र, तरीही पत्रकारांना व्यावसायिक जबाबदारीमुळे धोकादायक स्थितीत फिरावयास लागणं, हे अपरिहार्यच असतं. कोणी कितीही नाकारलं तरी दर गुरुवारी येणारे बार्कचे आकडे हे टीव्ही पत्रकारितेसाठी साप्ताहिक तणावाचं कारण असतंच असतं. अपरिहार्य असं. त्यामुळेच खरं तर कोरोना संकटकाळात बार्कची रेटिंग सिस्टम कोरोना संकट काळापुरती स्थगित करणं आवश्यक होतं. 
अनेकांना बाहेरून वाटतं चॅनलना काय, कोण विचारतंय? मात्र एनबीएफसारख्या संघटनांकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारी, अगदी कुसळाचंही मुसळ करणाऱ्याही असतात. त्यांना पुराव्यासह उत्तरं देणं सोपं नसतं. त्याच संघटनांना रेटिंगबाबतीत स्थगितीचा निर्णय घेणं आवश्यक वाटलं नाही.

 स्पर्धा नसती तर ताणही कमी असता. तशी मागणीही झाली. पण दुर्लक्ष केलं गेलं. चॅनलमधील पत्रकारांना कामाशिवाय पर्याय नव्हता. थोडक्यात चॅनलकडून कितीही काळजी घेतली गेली तरी धोकादायक स्थितीत काम करणं अपरिहार्यच होतं. 

कारण - ५

मला स्वत:ला पांडुरंग रायकर सारख्या तरुण पत्रकाराचा बळी जाण्यासाठी राजकारण हेही सर्वात महत्वाचं कारण वाटतं. खटकेल, खुपेल अनेकांना पण हे सत्यच आहे. 

टीव्हीच्या रेटिंगप्रमाणेच कोरोना संकटकाळात राजकारणही थांबणं गरजेचं होतं. पण ज्या देशात राजकारण हेच अनेकांचा फुलटाइम उद्योग असतो तिथं तसं घडणं अशक्यच होतं. 
जबाबदार राजकीय नेत्यांनी बेजबाबदारीनं गर्दी जमवत आंदोलनं करत धोकादायक परिस्थिती निर्माण करणं कधीच समर्थनीय मानलं जाऊ शकत नाही पण तसं सातत्यानं घडलं. घडतंय. अपवाद कुणाचाच नाही. कुणी आंदोलनांसाठी तर कुणी राजकीय कार्यक्रमांसाठी गर्दी जमवण्याचा बेजबाबदारपणा केलाच केला. त्यामुळे पत्रकारांनाही अशा धोकादायक गर्दीच्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्याशिवाय पर्याय नव्हता. यूट्युब, फेसबुक लाइव्हचा पर्याय असतानाही पत्रकार परिषदा घेण्याची हौसही अशीच धोकादायक. पण भागवली गेली. भागवली जात आहे.

दुसरीकडे कोरोना आरोग्य सुविधा नाहीत म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे आपल्या विभागात होऊ घातलेल्या कोरोना सुविधा केंद्रांना विरोध करण्याचेही राजकीय उद्योग बरेच झाले. 

माध्यमांनी संयम बाळगला. कोरोना जागतिक आपत्ती असल्याची जाण ठेवत गल्लीतील ठाकरे सरकार असो वा दिल्लीतील मोदी सरकार दोष देणं टाळलं. तर माध्यमांनाही लक्ष्य करून बदनामीचे प्रयत्न सुरुच आहेत. 

सकाळपासून पांडुरंग रायकरचा बळी कुणी घेतला यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवताना दिसतात तेव्हा मनाला वेदना होतात. किमान तरुण पत्रकाराच्या मृत्यूवर तरी राजकारण नसावं. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन राजकीय पक्षांनी पांडुरंगच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाखांची मदत दिली. किमान एक छोटा दिलासा मिळाला. तेवढ्यानं जीवन निघणार नाही. अजून खूप करावं लागेल. पण काही तरी झालं.

गेलेला पांडुरंग परत येणार नाही. पण किमान आता आणखी एखादा पांडुरंग नको. त्यासाठीच आपण सर्वांनी गंभीरतेनं ही पाच कारणं म्हणजे आपणही सोसलेले, दुर्लक्षानं पोसलेले आपल्याही सर्वांचे दोष असल्याचं समजून घेणं आवश्यक आहे.

सकाळपासून सांगितलं जातंय. पांडुरंगचा व्यवस्थेनं बळी घेतला. मग ही व्यवस्था...म्हणजे सिस्टम...असते काय...ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममध्ये आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे. पांडुरंगचा बळी आपणही घेतला असं मी म्हणतो ते त्यामुळेच. जर सिस्टम बदलायची असेल तर आपणच आधी बदलावं लागेल.

- तुळशीदास भोईटे

Monday, August 17, 2020

सुनील इरावारांचा गळफास...राज ठाकरेंना अस्वस्थ करणारा...पण प्रत्येकानं विचार करावा असा !

सुनील इरावार. नांदेडचे मनसे पदाधिकारी. त्यांनी रविवारी गळफास. स्वत:ला संपवलं. सुनील किनवटमधील. किनवट तसं नांदेडच्या कोपऱ्यातील. महाराष्ट्राच्या तर आणखीच कोपऱ्यात. जास्त चर्चा झाली नाही. पण त्यांचं पत्र वाचलं आणि त्यातील एक वाक्य मनाला स्पर्शून गेलं. दाहक वास्तव मांडणारं असं ते वाक्य. 

आत्महत्येच सुनीलनं सांगितलेलं कारण. त्यांनी आपल्या अखेरच्या पत्रात आई-वडिलांची माफी मागतानाच आपल्या अध्यक्षांसाठीही लिहिलं..."राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात यावर राजकारण केल जातं.आणि या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत. अखेरचा जय महाराष्ट्र. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मी माझं आयुष्य स्वखुशीने संपवत आहे. जय महाराष्ट्र. जय मनसे. जय राजसाहेब"
सुनील इरावारांनी स्वत:चं जीवन ऐन तारूण्यात संपण्यासाठी दिलेलं कारण वेगळंच. आजवर तसं उघडपणे कुणी न मांडलेलं. पण आहे ते महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील वास्तव. त्यामुळेच या प्रकरणाची जास्त माहिती घेण्यासाठी प्रयत्न केले. किनवटलाच शुभम शिंदे हा तरुण पत्रकार राहतो. त्याच्याशी बोललो. त्याच्याकडून सुनीलच्या अमोल जाधव या मित्राचा मोबाइल नंबर मिळाला. अमोलला कॉल लावताच तो भडाभडा बोलू लागला. आणि एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेच्या बळावर मनानं किती मोठा असतो ते अनुभवता आलं.
अमोल म्हणाला, "सुनील इरावार आमचा मित्र. मी काही मनसेचा कार्यकर्ता नाही. पण आमचा सुनील गेली दहा वर्षे तरी राजसाहेबांचा फॅन. त्यामुळे तो मनसेचं काम करु लागला. आम्हीही त्याला साथ देऊ लागला. राजकारणात असला तरी सुनील खूपच गरीब घरातील. त्याचे वडिल मेल एक्स्प्रेसमध्ये काही कामे करून कमाई करायचे. लॉकडाऊनने ती कामेही थांबली. त्याची आई किनवटच्याच एका वसतीगृहात भांडी घासायचे काम करते. कष्ट करणारे कुटुंब.
 सुनीलही तसाच. मात्र, तो आपलं कुटुंब, स्वत: यापेक्षा समाजाचाच जास्त विचार करायचा. त्याने कधीच पैशाच विचार केला नाही. राजसाहेबांचा कडवट चाहता. वाट्टेल ते करण्यास तयार असणारा. केवळ त्यांना भेटायचं म्हणून दोन वेळा मुंबईला गेला. एकदा मनसेचं निवडणूक चिन्ह असणारा इंजिन भेट दिलं. तेही असं तसं नाही. किनवटला सागाची झाडे खूप. साहेबांनी द्यायचं म्हणून त्यानं सागाचं बनवून घेतलं. ते दिलं. गर्दीमुळे थेट साहेबांच्या हाती देता आलं नाही. त्याची रुखरुख राहिली. पण टीव्हीवर साहेब दिसलं की दिसणारं इंजिन आपणच दिलेलं असं तो अभिमानानं सांगायचा."
अमोल सांगत होता. मला स्वत:ला असे कार्यकर्ते खूप भारी वाटतात. मोठे वाटतात. नेत्यांपेक्षाही. त्यामुळेच खरंतर सुनीलविषयी माहिती मिळवत होतो. अमोल सांगू लागला, "सुनील खूप काम करायचा. त्याला इतर पक्षांमध्येही बोलवायचे. पण तो निक्षून सांगायचा, जे काही आहे ते राजसाहेबांसाठीच करेन. सुनील मनसेचा किनवट शहर अध्य़क्ष होता. पण खूप प्रामाणिक. पक्षाशी आणि लोकांशीही. खूप कामं करायचा. अडीनडीला धावायचा. खिशात काही नसताना काम करत राहायचा."
अमोलने पुढे सुनीलच्या नैराश्याचं कारण मांडलं, "किनवटमध्ये दोन समाजांची लोकसंख्या जास्त. एसटी आणि बंजारा. मतांच्या राजकारणात सुनिल होता ती मसनजोगी जात तशी काहीच महत्व नसलेली. त्यामुळे सुनीलची निराशा वाढत गेली. त्यातच आर्थिक स्थितीनं तो अधिकच ढासळला." 
अमोलनं सांगितलेलं आत्महत्येचं कारण सुनीलनं त्यालाही सांगतिलं नसावं. सुनीलने ते आत्महत्येच्या पत्रात लिहिल्यानं उघड झालं. आर्थिक तंगी ठाऊक होती. पण ती आताची नाही. कदाचित लॉकडाऊननं सर्वच आटवलं असावं. त्यात मग जातीय समीकरणांच्या राजकारणात आपला निभावच लागणार नाही, ही भावना अधिकच तीव्र झाली असावी. त्यातूनच रविवारी पहाटे त्यानं गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. 
खरंतर जातीय समीकरण हे विदारक वास्तव. मात्र, तसं असल्यानं काहीच करता येत  नाही असं नाही. अनेक राखीव मतदारसंघांमध्ये ज्यांच्यासाठी जागा राखीव असते ते समाज सोडून इतर समाजाचे कार्यकर्ते नेते काम करत राहतात. किमान पदांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तसंच ओपन मतदारसंघांमध्ये इतर कमी संख्या असणाऱ्या जातींच्या बाबतीत घडतं. त्यांना इतर काही जागा राखीव असल्यानं त्यांनी ओपनकडे पाहूच नये असाही एक दृष्टिकोन आढळतो. पण तिथंही ते कार्यकर्ते-नेते थांबत नाहीत. काम करत राहतात. 

काही ठिकाणी तर समाज नसला तरी कामाच्या, पक्षाच्या बळावर चंद्रकांत खैरेंसारखे नेते अनेक वर्ष निवडून येत राहतात. त्यांच्या बुरुड समाजाची घरं मोजलीत तर काही टक्केही नसतील. तसंच इतरही काही लोकप्रतिनिधी असतात. अर्थात ते अपवादच. पण सुनिलला हे समजवणारं कुणी नसावं. तो आपल्या नेत्यांशी बोललाही नसावा. त्यात आर्थिक तंगीची झळ मनातील नैराश्य अधिकच दाट करणारी ठरली असावी. त्यातूनच त्याने स्वत:ला संपवलं. पण सुनील ईरावारांना हे कुणी समजवलंच नसावं.
हे लिहून संपवतानाच राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली. "अरे बाबांनो जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण बदलण्यासाठी पक्ष स्थापन केला. जात आणि पैसा या गोष्टीवर मला माझ्या पक्षाचं राजकारण करायचे नाही. त्यासाठी मी माझे तत्व सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल,” असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष असे आहेत जे जातीय आधारावर राजकारण करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनाला किती लागलं असावं ते समजू शकतो. पण एक मात्र नक्की. थेट पक्षाचे सर्वोच्च नेते नाही. पण किमान इतर जिल्हा-संपर्क नेत्यांनी तरी आपल्या पक्षाच्या अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवला पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. राजकारण म्हटलं की अर्थकारणच असं नसतं. मी शेकडो तरी अशा कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांना ओळखतो जे घरचं खावून लष्कराच्या भाकऱ्या भाजतात. काही तर कर्जबाजारी होतात. बर्बाद होतात. आणि असे मनसेतच नाही प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. नेत्यांनी या कार्यकर्त्यांना सभोवतालच्या गर्दीतून वेळ काढत समजून घेण्याची एक व्यवस्था उभारली पाहिजे. पुढच्या फळीतील नेत्यांची अशी व्यवस्था. समर्पित कार्यकर्त्यांना वेळ देणारी. या व्यवस्थेनं अशांना आधार दिला पाहिजे. शक्य तसा पैशाचाही, किमान मानसिक तरी. समजवलं पाहिजे, संपत नसतं काहीच. नेहमीच असते संधी. प्रतिकुलतेतही.  
सुनीलचा भाऊ अनिलशी राज ठाकरे बोलले. तो संवाद ऐकला, राज ठाकरेंनी विचारलं, "अनिल, राज ठाकरे बोलतो, काय झालं? असं का केलं?" अनिल म्हणाला, "वाघ गेला साहेब तुमचा वाघ गेला. अचानक काय टेन्शन होतं. गेला साहेब. खूप जीव लावत होता हो साहेब. तुमच्याबद्दल कुणी काही पोस्ट केली तर खूप भांडत होता. सांगायचा खूप भाग्यवान मी, साहेबांना अशी तशी माणसं भेटत नाही. मी भेटलो
अशा वेळी नेत्यांचं दु:खही वेगळंच. राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं तर...“मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्य़ावर येऊ नये." अशी वेळ त्यांच्यावरच काय कुणावरही येवू नये. आणखी कोणत्याही सुनीलमधील महाराष्ट्राचं भविष्य असं अकाली करपू नये. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते नेत्यांनाच. तसं घडलं तर बिघडणं नक्कीच थांबेल.

- तुळशीदास भोईटे
मोबाइल - 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite

Tuesday, August 11, 2020

"मौत तूने मुझको जमींदार कर दिया"


राहत इंदोरी...शायरीच्या दुनियेतील सदाबहार सदाबंडखोर कलाकार. शायरीतील हळूवारपणा जपतानाच अंगार उसळवणारे शब्द म्हणजे राहत इंदोरी. 

आपल्या भावनांना शब्दरुप देत त्यांना आपल्या शैलीत मांडणाऱ्या राहतजींचं जाणं मनाला चटका लावणारं...

त्यांनी मृत्यूलाही कलात्मक धन्यवादच दिले होते....

"दो गज सही मगर ये मेरी मिल्कियत तो है,
ऐ मौत तूने मुझको जमींदार कर दिया"

कसलीही पर्वा न करता सत्तेच्या...प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आवाज बुलंद करणारे राहतजी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यातील सत्तेच्या धुंदीला सहजच ठणकावून गेले...

"जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं, ज़ाती मकान थोड़ी है"

हा माणूस एवढी हिंमत कशी दाखवू शकतो असा प्रश्न ज्यांना पडायचा अशा कणाहीनांनाही त्यांनी विचारलेलं...

"लोग हर मोड़ पे रुक रुक के सँभलते क्यूं हैं
इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यूं हैं"

भेदाभेदाचं राजकारण करुन देशाची एकात्मता धोक्यात आणणाऱ्यांना राहजींनी बजावलेलं...

"सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है"

त्यांच्याकडे भौतिक संपत्ती, सत्तेचा आधार असं फार काही होतं...असं नाही...पण आपल्या हिंमतीबद्दल त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता...

"मैं जानता हूं दुश्मन भी कम नहीं,
लेकिन हमारी तरह हथेली पर जान थोड़ी है"

हिंमत हरायची नाहीच...उलट संकटालाही ठणकावून सांगायचं. राहतजींनी वारंवार ते मांडलं...

"शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम
आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे"

एक शायर. लोकप्रिय. सृजनशीलतेचं शिखरं गाठणारा. लोकांना भावणारा. आणखीही काही तसे असतील. पण राहत इंदोरीच तशी हिंमत दाखवायचे...त्यांच्या हिंमतीचं कारण त्यांच्याच शब्दात...

"बादशाहों से भी फेंके हुए सिक्के न लिए
हम ने ख़ैरात भी माँगी है तो ख़ुद्दारी से"

आज ते गेले...जीवनभर ज्या प्रवृत्तींचा शब्दांची शस्त्रं करून मुकाबला केला त्यांची थोबाडं फोडणारे त्यांचे हे शब्द. का शायराची अंतिम इच्छाच...

"मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना
लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्तान लिख देना"

- तुळशीदास भोईटे
9833794961
@TulsidasBhoite

Thursday, August 6, 2020

मुरलीधर शिंगोटे : शून्यातून शिखर...जबरदस्त न्यूजसेंस !


मुरलीधर शिंगोटेंच्या प्रेरणादायी जीवनकथेत एक भाग खूपच नाट्यमय. अमिताभ शून्यातून पुन्हा शिखरावर झेपावले तसाच. त्यांच्याकडे मुंबईतील तेव्हा प्रचंड खपणाऱ्या नवाकाळची एजेंसी होती. कालनिर्णय प्रकाशनाच्या साळगावकरांनी अचानक दैनिक प्रकाशनाचा निर्णय घेतला. दैनिक वर्तमान नाव नक्की झालं. मराठीतील बहुधा पहिलं बहुरंगी दैनिक. वितरक म्हणून चांगला खप असलेल्या नवाकाळच्या शिंगोटेंनाच गळ घालण्यात आली. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी वर्तमानचं वितरण स्वीकारलंही. बहुधा नवाकाळला ते मान्य नव्हतं. त्यांनी शिंगोटेंना दूर केलं. कालनिर्णयचं दैनिकही अत्यल्पजीवी ठरलं. मुरलीधर शिंगोटेंकडे काहीच उरलं नाही. पण ते शांत बसले नाहीत. त्यांना स्वत:च्या वितरण साखळीत काम करणाऱ्यांचीही काळजी होती.  त्यांनी स्वत:चंच दैनिक सुरु करण्याचा निर्धार केला. मुंबई चौफेर या सायंदैनिकाच्या रुपानं प्रत्यक्षात आणला. त्यानंतर त्यांनी पुढेच झेपावणं सुरु केलं. वार्ताहर, हिंदीतील लोकप्रिय असं यशोभूमी आणि अन्य अनेक भाषांमधील दैनिकं त्यांनी प्रकाशित केली. 

अभिमान म्हणजे मराठी दैनिक, चॅनलचे मालक अमराठी असताना मुरलीधर शिंगोटे हा अस्सल मराठी माणूस हिंदी, तमिळ, कन्नड दैनिकांचाही मालक होता! मध्यंतरी इंग्रजी दैनिकाचा प्रयोग मोठा फटका देणारा ठरला. तरीही त्यांनी नव्या पिढीसह दै. पुण्यनगरी महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पोहचवला. 

अनेकांना ठाऊक नसेल त्यांचा न्यूजसेंस. मी ऐकलेला. अंक छापायला जाईपर्यंत ते लक्ष ठेवत. कोणती बातमी वाचकांना भावेल ते लक्षात घेऊनच पहिलं पान. नवी बातमी आली तर छपाई थांबवून ती घेण्याचा कटाक्ष. 

एक वृत्तपत्र वितरक ते अनेक भाषांमधील दैनिकांचे मालक. अभिमान वाटावा असाच खराखुरा शुन्यातून शिखरापर्यंतचा आपल्या माणसाचा प्रवास ! 

- तुळशीदास भोईटे