Monday, November 4, 2024

अमेरिका अध्यक्षीय निवडणूक २०२४

US PRESIDENTIAL ELECTION 2024 in Marathi


निवडणूक अमेरिकेची, जगाला का काळजी?


तुळशीदास भोईटे





अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी आहे. आपल्या येथे रात्र असेल तेव्हा अमेरिकेत मतदानाला सुरुवात होईल. जरी निवडणूक अमेरिकेची असली तरी अवघ्या जगाचं लक्ष या निवडणुकीनं वेधलं आहे. तिथं जिंकणार कोण...आजवरच्या अर्ली व्होटिंगमध्ये, मंगळवारच्या नियमित मतदानात अमेरिकन मतदारांचा कौल कुणाला मिळालाय...कुणाला मिळतोय...त्याची कधी नाही तेवढी उत्सुकता जगभरात आहे.  अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष कोण असतील...MAKE AMERICA GREAT AGAINची घोषणा देत अमेरिकन श्वेत अस्मिता चेतवतच  नाही तर भडकवणारे उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प की KAMALA HARRIS FOR PEOPLE अशी घोषणा देत अमेरिकन उदारमतवादी कल्चर जपत लोकशाही वाचवण्यासाठी, लोकांसाठी पुढे सरसावल्याचा दावा करणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस? एक अंदाज मतदानाच्या दिवशी येईल. आणि डिसेंबरमध्ये इलेक्टोरल कॉलेजच्या शिक्कामोर्तबानंतर नक्की कळेल.
अमेरिकेतही यावेळी मतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसतोय, असे स्थानिक माध्यमांमधील रिपोर्ट सांगतात. मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा आहे. ट्रम्प समर्थक जास्तच आक्रमक आहेत. काही ठिकाणी मतपेट्या जाळण्याच्या घटनाही घडल्यात. तर लोकशाहीसाठी, अमेरिकन उदारमतवादासाठी कमला हॅरिसनाच विजयी करण्यासाठी त्यांचे समर्थक सरसावलेत. अमेरिकन निवडणुकीविषयी नेहमीच उत्सुकता असतेच, पण यावेळी खूपच जास्त वाढलीय. एकीकडे अमेरिकेच्या काही भागात दुष्काळाच्या झळा जाणवत असतानाच तिथंही गेले काही महिने प्रचाराचा महापूर आलेला. त्यात या मुद्द्यांना तेवढं स्थान नव्हतंच. अनेक गोष्टी आपल्यासारख्याच. त्यामुळे अमेरिकन निवडणुकीचा घेतलेला हा वेध...

///////////////////////////

 

अमेरिकन निवडणूक भारतासाठी का महत्वाची?

 

  • ·         अमेरिका ही एक महासत्ता आहे
  • ·         महासत्तेचं प्रमुखपद हे जगात सर्वात प्रभावशाली मानलं जातं
  • ·         अमेरिकेच्या अध्यक्षांकडे अनेक अधिकार एकवटलेले असतात
  • ·         अमेरिका ही महासत्ता म्हणून जगभरातील देशांमधील वाद, संघर्ष यात भूमिका घेत आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करते
  • ·         अमेरिकेच्या जागतिक घडामोडींमधील भूमिकांचा प्रभाव भारतावरही पडतो
  • ·         अमेरिका जगातील आर्थिक महासत्ताही असल्यानं अनेकदा राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी आर्थिक बळाचाही वापर करते.
  • ·         काहीवेळा नाटो या करारातील मित्र राष्ट्रांसाठी किंवा ज्या देशांमुळे, संघटनांमुळे अमेरिकेचे हित धोक्यात येईल असं अमेरिकेला वाटतं, त्यांच्याविरोधात अमेरिका सैन्यबळही वापरते.

 

उदाहरणं:


भुतकाळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त केलं, बांगला देश हा स्वतंत्र देश घडवला, तेव्हा लोकशाहीच्या बाता मारणाऱ्या अमेरिकेने आपलं सातवं आरमार भारताकडे पाठवण्याची धमकी दिली होती. त्यावेळी दुसरी महासत्ता असणाऱ्या सोव्हिएट रशियानं भारताची बाजू घेण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिका तटस्थ राहिली. हे पाकिस्तान या तत्कालीन मित्र देशासाठी सैन्यबळाच्या वापराच्या धमकीचं उदाहरण.

 

आताचं ताजं उदाहरण रशिया युक्रेन युद्धातील आर्थिक बळाच्या गैरवापराचं. युक्रेनला अमेरिका वाट्टेल ती रसद पुरवते, इस्रायलाही तशीच मदत करते, पण जगभरातील ज्या कंपन्या रशियाला व्यावसायिक भूमिकेतून माल, सेवा पुरवतात त्यांच्यावर अमेरिका निर्बंध लादते. अमेरिकेने नुकत्याच जगभरातील १५० कंपन्यांवर निर्बंध लादले त्यात भारतातील कंपन्याही आहेत.

 

त्यामुळे स्वाभाविकच अमेरिकेत सत्तेत कोण येतं ते भारतासारख्या महासत्ता बनण्यासाठी बळ वाढवू पाहणाऱ्या आकांक्षी देशासाठी महत्वाचंच आहे. भारतच नाही रशिया, चीन हे मोठे देशही तसं लक्ष ठेवून असतात. ते देश तर अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेपही करतात असा आरोप होतो.

 

///////////////////////////

 

अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीची वैशिष्ट्ये काय?

 

जर कमला हॅरिस जिंकल्या तर...




 

1.      अमेरिकत प्रथमच एक महिला अध्यक्ष बनेल. KAMALA HARRIS FOR PEOPLE अशी घोषणा देणाऱ्या कमला हॅरिस लोकाभिमुख कारभार करतील, अशी अपेक्षा आहे.
 
2.      अध्यक्षपदी येणारी ही महिला अश्वेत असेल, हेही आणखी एक वेगळंपण असेल.
 
3.      महिलांचा गर्भपातबंदीसारखे बुरसटलेले कायदे जातील, महिलांना इतर नागरिकांसारखं स्वतंत्र सक्षमपणे जगता येईल.
 
4.      अमेरिकेची उदारमतवादी संस्कृती आणि प्रतिमा कायम राहील, असाही डेमोक्रॅट्सचा दावा आहे.
 
5.      अमेरिकन नागरिकांमध्ये रुढीप्रिय असणाऱ्यांना गर्भपात, समलैंगिक अशा धोरणांमध्ये जास्त उदारपणा येणं धोकादायक वाटतं
 
6.      जो बायडन यांच्या कार्यकाळात वाढत असलेली महागाई, उत्पन्न खालावण्याची भीतीही तशीच वाढण्याचा धोकाही रिपब्लिकन्स दाखवतात.

 

जर डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर...




 

1.      MAKE AMERICA GREAT AGAIN…MAGA घोषणा देणारे, अमेरिकन ड्रीम अमेरिकनांच्या मनात फुलवणारे ट्रम्प आले तर आर्थिक भरभराट होईल असं अनेकांना वाटतं.
 
2.      अमेरिकेतील उद्योग, व्यवसायांना अधिक चालना देत अमेरिकेचा फायदा होणारी धोरणं राबवणारे कडवटपणे अमेरिकाहित पाहणारा कारभार असेल, असाही रिपब्लिकन्सचा दावा आहे
 
3.      अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल अमान्य करत राजधानीत हिंसाचाराचा आरोप असलेला पहिला माजी अध्यक्ष पुन्हा अध्यक्षपदी येईल.
 
4.      अमेरिका म्हणजे उदारमतवाद ही ओळख इतिहासजमा होऊन महिलांचा गर्भपाताचा अधिकार काढून घेणाऱ्या निर्णयांसारखा बुरसटलेपणा वाढेल
 
5.      स्थलांतरिताचा देश असणाऱ्या अमेरिकेत स्थलांतरांविरोधातील अतिकडक निर्बंध लागू केले जाण्याची भीती असेल
 
6.      डेमोक्रॅट आणि इतर आरोप करतात तसा अमेरिकेतील लोकशाहीला धोका पोहचेल

 

///////////////////////////

 

अमेरिकेचे अध्यक्ष हे प्रभावशाली पद!

1.      अमेरिकेच्या अध्यक्षांना POTUS असंही संबोधलं जातं.
2.      विशेषत: सेनादलं या कोडचा वापर करत असत.
3.      आता सोशल मीडिया हँडल्सनाही हेच नाव आहे.
4.      President Of The United Status या शब्दसमुहाचे तो शॉर्टफॉर्म आहे.
5.      अमेरिकेत अध्यक्ष हे प्रभावशाली असतात.
6.      भारतात ते अधिकार पंतप्रधान आणि अध्यक्ष यांच्यात विभागलेले असतात, त्यातही भारतात राष्ट्रपतींकडे तसे स्वतंत्ररीत्या राबवता येतील असे अधिकार नाममात्रच असतात.
7.      अध्यक्ष - फक्त औपचारिक पद नाही तर कार्यकारी अधिकारीही.
8.      अध्यक्षांना स्वतःला काही कायदे करण्याचा अधिकार आहे, परंतु बहुतेकदा कायदे करण्यासाठी त्यांना संसदेसोबत (काँग्रेस) काम करावे लागते.
9.      अमेरिकत अध्यक्ष चार वर्षानंतर पुन्हा पदावर येऊ शकतात - पण त्यांना दोनवेळाच अध्यक्षपद भुषवता येतं.

///////////////////////////

 

अमेरिकेत अध्यक्ष कोण बनू शकतं?

  • 1.      अमेरिकन नागरिक ज्याचा जन्म अमेरिकेतच झाला आहे
  • 2.      तो नागरिक जो गेली १४ वर्षे अमेरिकतच राहतो
  • 3.      ज्याचा जन्म अमेरिकेत पण नंतर पालकांसोबत परदेशात गेला आणि १४ वर्षांपेक्षा कमी काळापूर्वी परतला, तोही चालणार नाही.

 

///////////////////////////

 

निवडणुकीत कोणाला मतदान करता येईल?

 

  1. ·         18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व यूएस नागरिक निवडणुकीत मतदान करू शकतात.
  2. ·         काही राज्यांमध्ये अपवाद देखील आहेत जे विशिष्ट मतदारांना निवडणुकीत भाग घेण्यापासून प्रतिबंधित करतात.
  3. ·         काही नागरिक एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरल्यानंतर (एक वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा असलेला गंभीर गुन्हा) किंवा ते सध्या किरकोळ गुन्ह्यासाठी तुरुंगात शिक्षा भोगत असल्यास मतदान करू शकत नाहीत.
  4. ·         काही राज्यांमध्ये काही मानसिक दिव्यांग लोक मतदान करू शकत नाहीत.

 

///////////////////////////

 

अमेरिकेतील सभागृह

 

आपल्याकडे संसद तशी अमेरिकेत काँग्रेस

House of Representative

आपल्याकडे जशी लोकसभा कनिष्ठ सभागृह – जिथं थेट मतदारांनी निवडून दिलेले खासदार असतात, तसे तिथे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह

सदस्य संख्या 438 सदस्य

 

Senate

·         आपल्याकडे जशी राज्यसभा वरिष्ठ सभागृह – जिथं विधिमंडळ, अध्यक्षनियुक्त सदस्य असतात, तशी तिथं सिनेट

·         सदस्य संख्या 100 सदस्य

·         2 members प्रत्येक राज्यातून

·         6 वर्षांचा कार्यकाळ

·         1/3 सदस्य 2 वर्षांनी निवृत्त, नवे 1/3 निवडले जातात

 

///////////////////////////


अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते?

  • 1.      अध्यक्षपदाची निवड थेट पद्धतीनं होते, असा समज आहे. पण तसं नाही.
  • 2.      अमेरिकन मतदार अध्यक्षांना थेट निवडत नाहीत. ती निवडणूक अप्रत्यक्षच आहे.
  • 3.      अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज एक पद्धत आहे. जसे आपल्याकडे विधिमंडळातील आमदार, संसदेतील खासदार हे राष्ट्रपतींना निवडतात, ते त्या निवडणुकीसाठीचं इलेक्टोरल कॉलेज आहे.
  • 4.      अमेरिकन मतदार त्या इलेक्टोरल कॉलेजचे प्रतिनिधी निवडतात, ते अध्यक्ष निवडतात.
  • 5.      आपल्याकडे पंतप्रधान पदासाठीची निवडही अप्रत्यक्ष आहे. लोकसभेत निवडून गेलेले खासदार पंतप्रधान कोण ते ठरवू शकतात. अमेरिकेत तसं नाही. पण निवडपद्धत थेटही नाही.
  • 6.      अध्यक्ष हे मतांच्या संख्येवर नाही निवडले जात नाहीत
  • 7.      मतदार इलेक्टोरल कॉलेज प्रतिनिधी निवडतात
  • 8.      इलेक्टोरल कॉलेजचे प्रतिनिधी अध्यक्ष निवडतात

///////////////////////////

अमेरिकेत एक प्रकारे द्विपक्षीय निवडणुकीची पद्धत आहे

  1. ·         अध्यक्षीय निवडणुकीत आजवर रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी या दोन पक्षांमध्येच लढत झालीय. इतर पक्षही असतात. पण ते तेवढे महत्वाचे नसतात.
  2. ·         यावेळीही या दोन पक्षांचे उमेदवार असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प (रिपब्लिकन पार्टी) आणि कमला हॅरिस (डेमोक्रॅटिक पार्टी) या दोघांमध्येच लढत आहे.
  3. ·         कमला हॅरिसआधी विद्यमान अध्यक्ष जो बायडन उमेदवार होते, पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे ते स्पर्धेत मागे पडू लागले आणि मग उमेदवार बदल झाला.
  4. ·         कमला हॅरिस या अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार झाल्या.

///////////////////////////

 

उमेदवारांची निवड कशी केली जाते?

  1. ·         रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष या दोन्ही प्रमुख पक्षांसाठी अध्यक्षीय उमेदवारांची राज्य प्रायमरी आणि कॉकसमध्ये निवड केली जाते.
  2. ·         प्रायमरीमध्ये पक्षांचे नोंदणीकृत मतदार त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडतात.  
  3. ·         कॉकसमध्ये पक्ष सदस्य राजकीय पक्षांचे अध्यक्ष पदाचे उमेदवार निवडण्यास मदत करतात.
  4. ·         शेवटी दोन्ही पक्षांची अधिवेशनं होतात
  5. ·         त्या अधिवेशनांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारांवर अंतिम शिक्कामोर्तब होते.

 

///////////////////////////

 

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक कधी आहे?

  1. ·         मंगळवार 5 नोव्हेंबर 2024 रोजी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक आहे
  2. ·         ही निवडणूक जिंकणारी व्यक्ती व्हाईट हाऊसमधून देशाचे नेतृत्व करेल.
  3. ·         जानेवारी 2025 पासून नव्या अध्यक्षांचा चार वर्षांचा कार्यकाळ सुरु होईल.            

 ///////////////////////////

रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प




 

  • ·         रिपब्लिकन पक्षात माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत त्यांच्या पक्षाचा पाठिंबा मिळवला. मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथील पक्षाच्या अधिवेशनात ते अधिकृत रिपब्लिकन उमेदवार बनले.
  • ·         ट्रम्प यांनी ओहायो सिनेटर (वरच्या सभागृहाचे सदस्य) जेडी व्हॅन्स यांना त्यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडले.
  • ·         डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत.
  • ·         त्यांनी 2016 मध्ये त्यांची पहिली निवडणूक जिंकली.
  • ·         चार वर्षांनंतर 2020 मध्ये ते बायडेन यांच्याकडून पराभूत झाले.

 

///////////////////////////

 

डेमोक्रॅट उमेदवार कमला हॅरिस




 

  • ·         अध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर डेमोक्रॅट्सने उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची पक्षाचा चेहरा म्हणून निवड केली.
  • ·         कमला यांना ऑगस्टच्या सुरुवातीला डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आणि त्यांनी लगेचच प्रचाराला सुरुवात केली.
  • ·         मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ हे त्यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
  • ·         2020 च्या निवडणुकीत जो बायडेन निवडून आल्यापासून हॅरिस उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत
  • ·         त्या अमेरिकन भारतीय आफ्रिकन अशा मिश्रवंशाच्या आहेत

 

///////////////////////////

 

अपक्ष उमेदवार

 

  • अध्यक्षपदासाठी काही अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.
  • यापैकी एक प्रमुख नाव रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर होते, जे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे नातू आहेत.
  • केनेडी जूनियर यांनी ऑगस्टच्या उत्तरार्धात त्यांची मोहीम स्थगित केली आणि ट्रम्प यांना पाठिंबा दिला.
  •  

///////////////////////////

 

अमेरिकन मतदार अध्यक्षपदाशिवाय आणखी कोणाला मतदान करतील?

·         ते उपाध्यक्ष पदासाठीही मतदान करतील, पण हे मत अध्यक्षपदाच्या मतदानाशी जोडलेले आहे.

·         याचा अर्थ असा की ट्रम्प यांना दिलेले मत हे त्यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जेडी व्हॅन्सनाही मिळालेले मत असेल

·         कमला हॅरिसना दिलेले मत हे त्यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार टीम वॉल्झसाठीचेही मत असेल.

 

///////////////////////////

 

निवडणुकीच्या राजकारणात अमेरिकन राज्यांचे तीन रंग

 

1.      Red States – सेफ -

परंपरेनं रिपब्लिकन पार्टीलाच साथ देणाऱ्या मतदारांची बहुसंख्या असलेली राज्यं – जसे – Texas

2.      Blue States - सेफ –

परंपरेनं डेमोक्रेटिक पार्टीलाच साथ देणाऱ्या मतदारांची बहुसंख्या असलेली राज्यं – जसे – NewYork, California

3.      Purple State - स्विंग – कुंपणावरची Battleground States

·         ही राज्यं ठरवतात अध्यक्ष कोण निवडला जाणार

·         या सात राज्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी खरी लढाई असते.

 

///////////////////////////

 

Purple State - स्विंग – कुंपणावरची Battleground States म्हणजे काय?

·         निवडणुकीच्या काळात या शब्दाची खूप चर्चा होते.

·         बहुतेक राज्यांतील लोक एकाच पक्षाला प्राधान्य देतात आणि त्यांचे मत साधारणपणे निवडणुकीपासून निवडणुकीपर्यंत सारखेच असते. उदाहरणार्थ, वायोमिंगमधील लोकांनी 1968 पासून फक्त रिपब्लिकनला मतदान केले आहे. मॅसॅच्युसेट्सच्या रहिवाशांनी 1932 पासूनच्या चार निवडणुकांव्यतिरिक्त सर्व निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान केले आहे.

·         परंतु स्विंग राज्यांमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वेगवेगळे पक्ष निवडण्याचा कल असतो.

·         रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट यांच्यापैकी एकाला मतदान करण्याचा कल असल्यामुळे याला बॅटलग्राऊंड किंवा टॉस-अप राज्ये असेही म्हणतात.

·         दोन्ही पक्ष या स्विंग किंवा बॅटलग्राऊंड स्टेट्स असणाऱ्या राज्यांमध्ये प्रचारासाठी लाखो डॉलर्स खर्च करतात, कारण अतिरिक्त इलेक्टोरल कॉलेज मते जिंकणे महत्त्वपूर्ण असू शकते.

·         2024 मधील महत्त्वाच्या राज्यांमध्ये ॲरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन या स्विंग राज्यांचा समावेश आहे.

 

 

///////////////////////////

 

Battleground States

 

सात स्विंग राज्यं

 

१- पेन्सिल्व्हेनिया

२- नॉर्थ कॅरोलिना,

३ - जॉर्जिया

४ - मिशिगन

५- अॅरिजोना

६ - विस्कान्सिन

७-नेवाडा

 

सध्या स्विंग राज्यांपैकी चार राज्यांमध्ये ट्रम्प आघाडी

 

///////////////////////////

 

इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय?

 

·         अमेरिकन मतदार प्रत्यक्षात कोणाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व्हायचे आहे यावर थेट मत देत नाहीत. त्याऐवजी ते इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांना मत देतात

·         हे सदस्य अध्यक्ष आणि उपअध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांना समर्थन देतात.

·         संपूर्ण अमेरिकेत एकूण 538 मतदार आहेत.

·         यामध्ये काँग्रेसच्या प्रत्येक सदस्यांच्या आणि वॉशिंग्टन डीसीच्या तीन अतिरिक्त मतदारांचा समावेश आहे.

·         अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमधील मतदारांची संख्या लोकसंख्येच्या आधारावर ठरविली जाते, उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया राज्याची लोकसंख्या सुमारे 4 कोटी आहे आणि इलेक्टोरल कॉलेजमध्ये 54 मते आहेत. तर नॉर्थ डकोटाची लोकसंख्या सुमारे ७.६२ लाख आहे आणि त्यात फक्त तीन मते आहेत.

 

///////////////////////////

 

Winners Take All प्रणाली म्हणजे काय?

·         बहुतेक राज्ये Winners Take All प्रणाली वापरतात, त्यामुळे एखाद्या राज्यात कोणी सर्वाधिक मते जिंकल्यास, त्यांना इलेक्टोरल कॉलेजमधील सर्व मते मिळतात.

·         कॅलिफोर्नियाचे उदाहरण घेता, 4 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात 2020 च्या निवडणुकीत सुमारे 1 कोटी 71 लाख मतदारांनी मतदान केले.

·         यापैकी 1 कोटी 11 लाख 10 हजार 250 मते बायडेन यांना आणि 60 लाख 06 लाख 429 मते ट्रम्प यांना पडली. मतांमध्ये बायडन यांनी बाजी मारल्यामुळे कॅलिफोर्नियाची मतांच्या प्रमाणात नाही तर सर्वच्या सर्व ५५ इलेक्टोरल मते बायडेन यांना गेली.

·         यालाच Winners Take All प्रणाली म्हणातात.

 

///////////////////////////

 

Winners Take All प्रणालीचा मोठा दोष

 

·         Winners Take All प्रणालीमुळे जनमतात आघाडीवर नसलेला दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार बाजी मारू शकतो. तसं काही वेळा झालं आहे. 2016 US Presidential Electionत्याचं उत्तम उदाहरण आहे.

·         त्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन या ४८.२ टक्के सामान्य मतदारांच्या पसंतीसह मतदानात आघाडीवर होत्या, पण राज्यांमधील Electoral Collegeसाठी Winners Take Allमुळे त्यांना २२७ मतेच मिळाली.

·         याउलट रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना सामान्य मतदारांची हिलरींपेक्षा २.१ टक्के मते कमी म्हणजे ४६.१ मते मिळाली, तरीही ट्रम्प यांना राज्यांमधील Electoral Collegeसाठी Winners Take Allमुळे हिलरींपेक्षा ७७ मते जास्त म्हणजे एकूण ३०४ मते मिळाली. ट्रम्प अमेरिकन मतदारांची मते कमी मिळवून Winner Take Allप्रणालीमुळे अमेरिकेचे अध्यक्ष झाले.

 

२०१६ निवडणुकीचा निकाल


Donald Trump   46.1%          304

Hillery Clinton 48.2%           227

 

Winners Take All प्रणालीला अपवाद २ राज्यं

 

·         चार मतदारांसह मेन आणि पाच निर्वाचकांसह नेब्रास्का ही दोनच राज्ये आहेत जी प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळतात यावर त्यांची इलेक्टोरल कॉलेज मते विभाजित करतात.

·         नेब्रास्काच्या 2020 च्या निकालांवरून आपण हे समजू शकतो.

·         गेल्या निवडणुकीत राज्यातील जनतेने ट्रम्प यांना ५,५६,८४६ आणि बायडेन यांना ३,७४,५८३ मते दिली होती.

·         नेब्रास्कामध्ये पाच इलेक्टोरल मते आहेत, त्यामुळे इतर बहुतांश राज्यांमध्ये ट्रम्प यांना पाचही इलेक्टोरल मते मिळाली असती. पण नेब्रास्कामध्ये मतांचे विभाजन असल्याने चार इलेक्टोरल मते ट्रम्प आणि एक बायडेन यांना गेली.

 

///////////////////////////

 

मतदान कसे केले जाते?

·         अमेरिकेत मतदार प्रामुख्यानं मतपत्रिकांवर मतदान करतात.

·         बहुतेक लोक त्यांच्या स्थानिक मतदान केंद्रावर जातात आणि वैयक्तिकरीत्या मतदान करतात.

 

मतदार तीन प्रकारे मतदान करतात.

 

·         पहिली पद्धत म्हणजे हाताने चिन्हांकित कागदी मतपत्रिका.

·         बहुतेक लोक त्यांच्या मतपत्रिकेवर पेनने चिन्हांकित करून त्यांची निवड नोंदवतात.

 

·         दुसरी पद्धत म्हणजे मतपत्रिका चिन्हांकित यंत्र.

·         ही यंत्रे आहेत ज्यात मतदार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करतात आणि ते कागदी स्वरूपात नोंदवले जातं.

·         सुमारे एक चतुर्थांश लोक या मशीनद्वारे मतदान करतात.

 

·         तिसरी पद्धत इलेक्ट्रॉनिक मशिनची आहे.

·         सुमारे 7% मतदार ज्या भागात डायरेक्ट रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक (DRE) मशीन वापरतात त्या भागात राहतात.

·         DRE हे मशिन संगणक आहेत जे मेमरीमध्ये मते नोंदवतात, हे आपल्या ईव्हीएमसारखंच असावं.

 

·         बहुतेक राज्यांमध्ये मेलद्वारे मतदान करण्याची परवानगी आहे किंवा लोक त्यांच्या स्थानिक निवडणूक कार्यालयात त्यांची मतपत्रिका आगाऊ सबमिट करू शकतात.

·         हे प्रामुख्याने ज्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचण येत आहे किंवा परदेशात असलेल्या किंवा सैन्यात सेवा देत असलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी आहे.

 

अमेरिकेत मतदानाच्या तारखेलाच नाही तर आधीही मतदान करण्याची परवानगी EARLY VOTING आहे, ज्याचा लाभ यावेळी मतदानाच्या चार दिवसाआधीपर्यंत ३३ टक्के मतदारांनी घेतला.

 

///////////////////////////

 

मतपत्रिकेत काय असते?

·         मतपत्रिका राज्यानुसार बदलू शकतात, परंतु तेथे नेहमीच अध्यक्षीय भाग असतो, जेथे मतदार चिन्हांकित करतो की त्याला किंवा तिला कोणते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडायचे आहेत.

·         याशिवाय एक भाग असाही आहे जिथे लोक सिनेटर्स आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधींना मत देतात.

·         मतदार ज्या उमेदवाराला मतदान करू इच्छितात त्याच्या शेजारी असलेल्या बॉक्सवर खूण करून त्यांची निवड करतात.

 

///////////////////////////

 

मतमोजणी कशी केली जाते आणि निकाल कधी जाहीर केला जाईल?

·         बहुतेक राज्यांमध्ये ते इलेक्ट्रॉनिक स्कॅनरद्वारे मोजले जातात.

·         काहीवेळा मते हातानेही मोजली जातात.

·         संभाव्य विजेत्याची घोषणा सहसा निवडणुकीच्या रात्री केली जाते.

·         मात्र, प्रत्यक्ष इलेक्टोरल कॉलेजचे मतदान डिसेंबरमध्ये होते.

·         डिसेंबरमधील दुसऱ्या बुधवारनंतरचा सोमवार, यावेळी 16 डिसेंबर

·         इलेक्टोरल प्रतिनिधींचं अधिकृतपणे मतदान होईपर्यंत अध्यक्ष प्रत्यक्षात निवडला जात नाही.

·         प्रत्येक राज्याचे इलेक्टोरल कॉलेज प्रतिनिधी डिसेंबरमध्ये त्या त्या राज्यांच्या राजधानीत एकत्र येतात

·         तिथं ते अध्यक्षपद निवडीसाठी मतदान करतात

·         राज्याचे प्रतिनिधी राज्याच्या निर्णयानुसार त्या उमेदवाराला मत देतात

·         इलेक्टोरल कॉलेज प्रतिनिधी शपथबद्ध असतात, त्या उमेदवारालाच मत देण्यासाठी, ज्याच्या नावे ते जिंकतात

·         मात्र काही सदस्य ज्यांना faithless electors म्हणतात, ते तसंच करतात असं नाही

·         तसं रोखण्यासाठी अमेरिकेत कायदाही नाही, काही पद्धत नाही

·         29 राज्यांमध्ये कारवाईची तरतुद आहे, पण आजवर एकालाही शिक्षा नाही

 

///////////////////////////

 

नव्या अध्यक्षांचा शपथविधी कधी होणार?

·         सहा जानेवारीला अमेरिकन काँग्रेस निवडणूक मतांची मोजणी करण्यासाठी संयुक्त अधिवेशन आयोजित करते.

·         उपाध्यक्ष मतमोजणी प्रक्रियेचे अध्यक्षस्थान भुषवतात.

·         ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे याची घोषणा करतात.

·         यावेळी वर्तमान उपाध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस या आपल्याच अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या मतमोजणीच्या अध्यक्षस्थानी असतील.

·         जानेवारीमध्ये त्यांचा शपथविधी होईपर्यंत विजेत्यांना अध्यक्ष-निर्वाचित PRESIDENT ELECT आणि उपाध्यक्ष-निर्वाचित VICE PRESIDENT ELECT म्हटले जाते.

·         शपथविधी समारंभात, दोघेही पदाची शपथ घेतात आणि व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतात आणि त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ सुरू करतात.

 

///////////////////////////