मुरलीधर शिंगोटेंच्या प्रेरणादायी जीवनकथेत एक भाग खूपच नाट्यमय. अमिताभ शून्यातून पुन्हा शिखरावर झेपावले तसाच. त्यांच्याकडे मुंबईतील तेव्हा प्रचंड खपणाऱ्या नवाकाळची एजेंसी होती. कालनिर्णय प्रकाशनाच्या साळगावकरांनी अचानक दैनिक प्रकाशनाचा निर्णय घेतला. दैनिक वर्तमान नाव नक्की झालं. मराठीतील बहुधा पहिलं बहुरंगी दैनिक. वितरक म्हणून चांगला खप असलेल्या नवाकाळच्या शिंगोटेंनाच गळ घालण्यात आली. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी वर्तमानचं वितरण स्वीकारलंही. बहुधा नवाकाळला ते मान्य नव्हतं. त्यांनी शिंगोटेंना दूर केलं. कालनिर्णयचं दैनिकही अत्यल्पजीवी ठरलं. मुरलीधर शिंगोटेंकडे काहीच उरलं नाही. पण ते शांत बसले नाहीत. त्यांना स्वत:च्या वितरण साखळीत काम करणाऱ्यांचीही काळजी होती. त्यांनी स्वत:चंच दैनिक सुरु करण्याचा निर्धार केला. मुंबई चौफेर या सायंदैनिकाच्या रुपानं प्रत्यक्षात आणला. त्यानंतर त्यांनी पुढेच झेपावणं सुरु केलं. वार्ताहर, हिंदीतील लोकप्रिय असं यशोभूमी आणि अन्य अनेक भाषांमधील दैनिकं त्यांनी प्रकाशित केली.
अभिमान म्हणजे मराठी दैनिक, चॅनलचे मालक अमराठी असताना मुरलीधर शिंगोटे हा अस्सल मराठी माणूस हिंदी, तमिळ, कन्नड दैनिकांचाही मालक होता! मध्यंतरी इंग्रजी दैनिकाचा प्रयोग मोठा फटका देणारा ठरला. तरीही त्यांनी नव्या पिढीसह दै. पुण्यनगरी महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पोहचवला.
अनेकांना ठाऊक नसेल त्यांचा न्यूजसेंस. मी ऐकलेला. अंक छापायला जाईपर्यंत ते लक्ष ठेवत. कोणती बातमी वाचकांना भावेल ते लक्षात घेऊनच पहिलं पान. नवी बातमी आली तर छपाई थांबवून ती घेण्याचा कटाक्ष.
एक वृत्तपत्र वितरक ते अनेक भाषांमधील दैनिकांचे मालक. अभिमान वाटावा असाच खराखुरा शुन्यातून शिखरापर्यंतचा आपल्या माणसाचा प्रवास !
- तुळशीदास भोईटे
No comments:
Post a Comment