Monday, August 17, 2020

सुनील इरावारांचा गळफास...राज ठाकरेंना अस्वस्थ करणारा...पण प्रत्येकानं विचार करावा असा !

सुनील इरावार. नांदेडचे मनसे पदाधिकारी. त्यांनी रविवारी गळफास. स्वत:ला संपवलं. सुनील किनवटमधील. किनवट तसं नांदेडच्या कोपऱ्यातील. महाराष्ट्राच्या तर आणखीच कोपऱ्यात. जास्त चर्चा झाली नाही. पण त्यांचं पत्र वाचलं आणि त्यातील एक वाक्य मनाला स्पर्शून गेलं. दाहक वास्तव मांडणारं असं ते वाक्य. 

आत्महत्येच सुनीलनं सांगितलेलं कारण. त्यांनी आपल्या अखेरच्या पत्रात आई-वडिलांची माफी मागतानाच आपल्या अध्यक्षांसाठीही लिहिलं..."राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात यावर राजकारण केल जातं.आणि या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत. अखेरचा जय महाराष्ट्र. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मी माझं आयुष्य स्वखुशीने संपवत आहे. जय महाराष्ट्र. जय मनसे. जय राजसाहेब"
सुनील इरावारांनी स्वत:चं जीवन ऐन तारूण्यात संपण्यासाठी दिलेलं कारण वेगळंच. आजवर तसं उघडपणे कुणी न मांडलेलं. पण आहे ते महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील वास्तव. त्यामुळेच या प्रकरणाची जास्त माहिती घेण्यासाठी प्रयत्न केले. किनवटलाच शुभम शिंदे हा तरुण पत्रकार राहतो. त्याच्याशी बोललो. त्याच्याकडून सुनीलच्या अमोल जाधव या मित्राचा मोबाइल नंबर मिळाला. अमोलला कॉल लावताच तो भडाभडा बोलू लागला. आणि एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेच्या बळावर मनानं किती मोठा असतो ते अनुभवता आलं.
अमोल म्हणाला, "सुनील इरावार आमचा मित्र. मी काही मनसेचा कार्यकर्ता नाही. पण आमचा सुनील गेली दहा वर्षे तरी राजसाहेबांचा फॅन. त्यामुळे तो मनसेचं काम करु लागला. आम्हीही त्याला साथ देऊ लागला. राजकारणात असला तरी सुनील खूपच गरीब घरातील. त्याचे वडिल मेल एक्स्प्रेसमध्ये काही कामे करून कमाई करायचे. लॉकडाऊनने ती कामेही थांबली. त्याची आई किनवटच्याच एका वसतीगृहात भांडी घासायचे काम करते. कष्ट करणारे कुटुंब.
 सुनीलही तसाच. मात्र, तो आपलं कुटुंब, स्वत: यापेक्षा समाजाचाच जास्त विचार करायचा. त्याने कधीच पैशाच विचार केला नाही. राजसाहेबांचा कडवट चाहता. वाट्टेल ते करण्यास तयार असणारा. केवळ त्यांना भेटायचं म्हणून दोन वेळा मुंबईला गेला. एकदा मनसेचं निवडणूक चिन्ह असणारा इंजिन भेट दिलं. तेही असं तसं नाही. किनवटला सागाची झाडे खूप. साहेबांनी द्यायचं म्हणून त्यानं सागाचं बनवून घेतलं. ते दिलं. गर्दीमुळे थेट साहेबांच्या हाती देता आलं नाही. त्याची रुखरुख राहिली. पण टीव्हीवर साहेब दिसलं की दिसणारं इंजिन आपणच दिलेलं असं तो अभिमानानं सांगायचा."
अमोल सांगत होता. मला स्वत:ला असे कार्यकर्ते खूप भारी वाटतात. मोठे वाटतात. नेत्यांपेक्षाही. त्यामुळेच खरंतर सुनीलविषयी माहिती मिळवत होतो. अमोल सांगू लागला, "सुनील खूप काम करायचा. त्याला इतर पक्षांमध्येही बोलवायचे. पण तो निक्षून सांगायचा, जे काही आहे ते राजसाहेबांसाठीच करेन. सुनील मनसेचा किनवट शहर अध्य़क्ष होता. पण खूप प्रामाणिक. पक्षाशी आणि लोकांशीही. खूप कामं करायचा. अडीनडीला धावायचा. खिशात काही नसताना काम करत राहायचा."
अमोलने पुढे सुनीलच्या नैराश्याचं कारण मांडलं, "किनवटमध्ये दोन समाजांची लोकसंख्या जास्त. एसटी आणि बंजारा. मतांच्या राजकारणात सुनिल होता ती मसनजोगी जात तशी काहीच महत्व नसलेली. त्यामुळे सुनीलची निराशा वाढत गेली. त्यातच आर्थिक स्थितीनं तो अधिकच ढासळला." 
अमोलनं सांगितलेलं आत्महत्येचं कारण सुनीलनं त्यालाही सांगतिलं नसावं. सुनीलने ते आत्महत्येच्या पत्रात लिहिल्यानं उघड झालं. आर्थिक तंगी ठाऊक होती. पण ती आताची नाही. कदाचित लॉकडाऊननं सर्वच आटवलं असावं. त्यात मग जातीय समीकरणांच्या राजकारणात आपला निभावच लागणार नाही, ही भावना अधिकच तीव्र झाली असावी. त्यातूनच रविवारी पहाटे त्यानं गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. 
खरंतर जातीय समीकरण हे विदारक वास्तव. मात्र, तसं असल्यानं काहीच करता येत  नाही असं नाही. अनेक राखीव मतदारसंघांमध्ये ज्यांच्यासाठी जागा राखीव असते ते समाज सोडून इतर समाजाचे कार्यकर्ते नेते काम करत राहतात. किमान पदांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तसंच ओपन मतदारसंघांमध्ये इतर कमी संख्या असणाऱ्या जातींच्या बाबतीत घडतं. त्यांना इतर काही जागा राखीव असल्यानं त्यांनी ओपनकडे पाहूच नये असाही एक दृष्टिकोन आढळतो. पण तिथंही ते कार्यकर्ते-नेते थांबत नाहीत. काम करत राहतात. 

काही ठिकाणी तर समाज नसला तरी कामाच्या, पक्षाच्या बळावर चंद्रकांत खैरेंसारखे नेते अनेक वर्ष निवडून येत राहतात. त्यांच्या बुरुड समाजाची घरं मोजलीत तर काही टक्केही नसतील. तसंच इतरही काही लोकप्रतिनिधी असतात. अर्थात ते अपवादच. पण सुनिलला हे समजवणारं कुणी नसावं. तो आपल्या नेत्यांशी बोललाही नसावा. त्यात आर्थिक तंगीची झळ मनातील नैराश्य अधिकच दाट करणारी ठरली असावी. त्यातूनच त्याने स्वत:ला संपवलं. पण सुनील ईरावारांना हे कुणी समजवलंच नसावं.
हे लिहून संपवतानाच राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली. "अरे बाबांनो जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण बदलण्यासाठी पक्ष स्थापन केला. जात आणि पैसा या गोष्टीवर मला माझ्या पक्षाचं राजकारण करायचे नाही. त्यासाठी मी माझे तत्व सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल,” असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष असे आहेत जे जातीय आधारावर राजकारण करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनाला किती लागलं असावं ते समजू शकतो. पण एक मात्र नक्की. थेट पक्षाचे सर्वोच्च नेते नाही. पण किमान इतर जिल्हा-संपर्क नेत्यांनी तरी आपल्या पक्षाच्या अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवला पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. राजकारण म्हटलं की अर्थकारणच असं नसतं. मी शेकडो तरी अशा कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांना ओळखतो जे घरचं खावून लष्कराच्या भाकऱ्या भाजतात. काही तर कर्जबाजारी होतात. बर्बाद होतात. आणि असे मनसेतच नाही प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. नेत्यांनी या कार्यकर्त्यांना सभोवतालच्या गर्दीतून वेळ काढत समजून घेण्याची एक व्यवस्था उभारली पाहिजे. पुढच्या फळीतील नेत्यांची अशी व्यवस्था. समर्पित कार्यकर्त्यांना वेळ देणारी. या व्यवस्थेनं अशांना आधार दिला पाहिजे. शक्य तसा पैशाचाही, किमान मानसिक तरी. समजवलं पाहिजे, संपत नसतं काहीच. नेहमीच असते संधी. प्रतिकुलतेतही.  
सुनीलचा भाऊ अनिलशी राज ठाकरे बोलले. तो संवाद ऐकला, राज ठाकरेंनी विचारलं, "अनिल, राज ठाकरे बोलतो, काय झालं? असं का केलं?" अनिल म्हणाला, "वाघ गेला साहेब तुमचा वाघ गेला. अचानक काय टेन्शन होतं. गेला साहेब. खूप जीव लावत होता हो साहेब. तुमच्याबद्दल कुणी काही पोस्ट केली तर खूप भांडत होता. सांगायचा खूप भाग्यवान मी, साहेबांना अशी तशी माणसं भेटत नाही. मी भेटलो
अशा वेळी नेत्यांचं दु:खही वेगळंच. राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं तर...“मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्य़ावर येऊ नये." अशी वेळ त्यांच्यावरच काय कुणावरही येवू नये. आणखी कोणत्याही सुनीलमधील महाराष्ट्राचं भविष्य असं अकाली करपू नये. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते नेत्यांनाच. तसं घडलं तर बिघडणं नक्कीच थांबेल.

- तुळशीदास भोईटे
मोबाइल - 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite

11 comments:

  1. सुंदर लेख, गावपातळीवर जातीचं राजकारण फार प्रभावी ठरतं. जात आणि पैसा यांच्याभोवती गावचं राजकारण फिरत रहातं. निवडणूक जिंकण्याची तुमच्या जातीचा हुकमाचा एक्का असला पाहिजे, नाहीतर मत विकत घेण्यासाठी पैसा असला पाहिजे, एका मताची किंमत तरी किती ? एक हजार ते दोन हजार रुपये, त्यासोबत एक दारूची बातमी आणि चिकन बिर्याणी, यावर निवडणुकीचं भवितव्य ठरतं, आणि ही लोकशाहीची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल

    ReplyDelete
  2. मंगला खानविलकर

    ReplyDelete
  3. छान रेखाटलंत सर

    ReplyDelete
  4. लेख खूप छान आहे, कदाचिन ग्राऊंडवर पक्षाचं काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा लेख एकदा तरी वाचावा, असा लेख आहे....

    ReplyDelete
  5. सर,तुमचा लेख वाचून डोकं सुन्न झालं.😪😪
    तुम्ही जे लिहलं आहे ती जमिनी स्तरावरची वस्तुस्थिती आहे.
    सर ,असे अनेक सुनिल समाजात दिसतात जे स्वतःच्या कुटुंब चा विचार न करता फक्त आपले नेते व पक्षाचा विचार करतात.
    सद्यस्थितीला राजकारणात तग धरायचा व पुढं जायचा असेल तर पैसा व जातीय समीकरणे खूप महत्वाची आहेत.सच्चा लोकांना फार कमी वेळा न्याय मिळतो
    तुमचा लेख वाचून तरी राजकीय कार्यकर्त्यानी बोध घ्यावा.
    सुनील यास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

    ReplyDelete
  6. मुळात राज्य घटनेमध्ये लोकप्रतिनीधी ची गरज त्यांचे कर्तव्य व आता त्यांचे गट ज्याला आपण पक्ष म्हणतो ते आपली सत्ता येण्यासाठी ज्या प्रमाणात ही सगळी लोकशाहीची मुळ तत्वे दावणीला बांधतात ते थांबले पाहीजे.यासाठी हेच पक्ष काही संसदेत कायदे करणार नाही पण यासाठी प्रत्येक मतदारानेच जागृत व्हायला हवे आणि जे कायदे अस्तित्वात आहेत त्यांचा तरी उपयोग करायलाच हवा.

    ReplyDelete
  7. दुर्दैवी. खरं आहे सर ! "नेत्यांनी या कार्यकर्त्यांना सभोवतालच्या गर्दीतून वेळ काढत समजून घेण्याची एक व्यवस्था उभारली पाहिजे. पुढच्या फळीतील नेत्यांची अशी व्यवस्था. समर्पित कार्यकर्त्यांना वेळ देणारी. या व्यवस्थेनं अशांना आधार दिला पाहिजे. शक्य तसा पैशाचाही, किमान मानसिक तरी. समजवलं पाहिजे." पण, दुर्दैवाने हे कुठल्याच पक्षांत होताना दिसत नाही. कार्यकर्त्यांनीही आपले कुटुंब आणि आपला जीव संभाळूनच पक्षाचे / नेत्यांचे काम केले पाहिजे. हे असे स्वतःच संपून जाणे, हा काही उपाय नव्हता. या सर्वांपासून अलिप्त राहून, आपले जगणे त्याने जगून घ्यायला हवे होते. नेतेमंडळी चार दिवस हळहळतील नंतर राजकारणातले आपले जुगाड खेळत राहतील. या खेळात आज एक तरुण गेला, उद्या आणखी जातील, कित्येक असेच व्यक्त न होता गेले असतील. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले असतील. कित्येक मानसिकदृष्ट्या खचले असतील. राजकारणात ज्याचा "जयजयकार" केला तो आपल्या सोयीसाठी दुसऱ्या पक्षाचा "जयजयकार" करत आपल्या फायद्यासाठी गेल्याची अनेक उदाहरणे समोर असताना, तरुणांनी हे डोळसपणे पाहायला हवे. आपल्या नेत्यांचे/पक्षाचे नाही पटले तर आपले जीवन संपविण्या ऐवजी विचारांना, श्रद्धेला, गाडून आयुष्यात वेगळा विचार करायला शिकायला हवे. आपल्या प्राणाच्या आहुतीच्या बदल्यात चार अश्रूंपलिकडे नेते काहीच देणार नाहीत हे कार्यकर्त्यांना वेळीच समजायला हवे. पक्षावर आंधळा विश्वास आणि आंधळे प्रेम न करता, वास्तववादी नजरेने पाहायला शिकले पाहिजे. स्वतःचे घर/कुटुंब/मित्रपरिवार यांना वेळ ध्यायला हवा. राजकारणात वावरताना/नेत्यांचा जयजयकार करताना आलेले अनुभव / आपले दुःख त्यांच्याशी व्यक्त करायला हवे. फार त्रास होत असेल तर वेळीच राजकारणातून एक्झिट घेतली पाहिजे, जीवनातून नाही.

    असो. या दुर्दैवी जीवाला भावपूर्ण श्रद्धांजली.

    सतीश सुर्वे @truemate_2006

    ReplyDelete
  8. वास्तव दर्शी चित्रण......खूप छान

    ReplyDelete
  9. जातीयतेने समाजाचे खूप मोठे नुकसान होत आहे. आपल्याकडे नुसते बोलले जाते की सर्व नागरिक समानता पण वास्तवात बघितले तर नोकऱ्या जातीनुसार, राजकारण जातीनुसार, फी जातीनुसार, सरकारी अनेक सवलती जातीनुसार. आपली संपूर्ण यंत्रणा म्हणा किंवा जीवन हे जातीव्यवस्थे नुसारच चालले आहे.

    ReplyDelete
  10. भोइटे साहेब खूप छान लेख लिहलात आपण . एक हृदय स्पर्शी वस्तूस्थिती , परिस्थीती आपण मांडलीत.

    ReplyDelete