Saturday, September 5, 2020

'तबेल्या'ची शाळा करणाऱ्या माई...सरोज पाटील मॅडम !

 



मुंबईसारखं महानगर. विलेपार्ले हे सांस्कृतिक शैक्षणिक राजधानी म्हणावं असं उपनगर. तिथं पार्ले टिळकसारख्या नामांकित शैक्षणिक संस्था. तिथंच पार्ले टिळकपासूनच काही अंतरावर एक शाळा मात्र काहीशी अंग चोरून वसलेली. माध्यमिक शाळा. ८ वी ते १० वी. शाळा पार्ल्यातील, मात्र शैक्षणिकदृष्ट्या एखाद्या खेडेगावातीलही बरी वाटावी अशी सुमार. इमारतही बैठी चाळीसारखीच वाटणारी. सुविधा नसलेली. 'तबेला' म्हणायचे अनेक लोक. माई म्हणजेच सरोज पाटील मॅडमनी 'तबेला' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या शाळेला शाळेसारखं बनवलं. शाळेचं नाव अभिमानानं घेतलं जाऊ लागलं. छत्रपती शिवाजी विद्यालय, विलेपार्ले, मुंबई !

आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं सध्या कोल्हापुरात असणाऱ्या सरोज पाटील मॅडमशी बोललो. त्यांच्याशी बोलताना ऐकलेला आणि अनुभवलेला इतिहास नजरेसमोर तरळला. 

पाटील मॅडममुळेच शाळा सुधारली, निकाल सुधारला आणि त्या शाळेत शिकणाऱ्या माझ्यासारख्या हजारोंचं जीवनही घडवलं गेलं. होय, मलाही घडवणारी हीच शाळा !! पण मी तसा सुदैवी, कारण मी १९८२मध्ये शाळेत गेलो, तोपर्यंत पाटील मॅडमनी शाळेत चांगले बदल घडवून आणले होते. पण काही वर्षे मागे गेलं तर खूप भलतीच स्थिती होती. आज पाटील मॅडमशी बोलताना अनेकांकडून ऐकलेला शाळेचा तो इतिहास आठवला.

आमचं छत्रपती शिवाजी विद्यालय विलेपार्ल्यात. पण शाळेत विलेपार्ले नव्हतं. कारण तिथं येणारा वर्ग हा समाजाच्या आर्थिक दृष्ट्या सर्वात तळागाळात असणारा. अनेकांची तर शिकणारी पहिली किंवा दुसरीच पिढी. पार्ल्यापेक्षा शेजारच्या अंधेरी, सहार, सांताक्रुझ या उपनगरांमधील चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील कष्टकरी कुटुंबातील मुलं-मुली कुठंच प्रवेश मिळत नाही म्हणून त्या शाळेत येत. 

मी मनपा शाळेत शिकलेलो. शैक्षणिक कामगिरी तशी बरीच. पण का कोणास ठाऊक आईनं अंधेरीतील जवळच्या शाळा न निवडता तशी दूरची पार्ल्यातील शाळा निवडली. बहुधा तीही कामगार असल्यानं इतर कामगारांकडून पाटील मॅडम, इतर शिक्षक वर्गाविषयी ऐकलं असावं. त्यामुळे एक चांगलं झालं. चालण्याची मस्त सवय लागलीच आणि जीवनाला दिशाही मिळाली. 

जुन्या काहींशी बोलल्यावर कळतं शाळा मी प्रवेश घेतला तेव्हा जशी बदलली होती, बदलत होती तशी पूर्वी नव्हती. १९६५मध्ये पाटील मॅडम आल्या. सुरुवातीला शिक्षिका. पगाराच्याही बोंबा. कसंबसं चालायचं. पुढे कायम झाल्या, पण पगार तसा हाती येतच नव्हता. चेकनं पगार सुरु झाला आणि त्यांच्यासारख्या शिक्षकांना दिलासा मिळाला. 

शाळेत येणारे विद्यार्थी चाळी, झोपडपट्ट्यांमधील. असं म्हणतात की त्याकाळी काही मुलं चाकू सुरेही आणायचे. त्यामुळे शिक्षकांनी शिस्त लावण्यासाठी शिक्षा करणं दूरच, तेच टरकून असायचे. शिक्षकांनी नोकरी सोडण्याचे प्रमाण जास्त असायचं. क्वचितच कुणी टिकायचं. पाटील मॅडमसाठी मात्र शाळा अशी असणं हेच समर्पितपणे काम करण्याची संधी असावी. त्याचं कारण त्यांची सामाजिक बांधिलकीची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यातूनच घडलेला स्वभाव असावा. त्या टिकून राहिल्या. परिस्थिती बदलण्यासाठी झगडत राहिल्या. त्यांना मुख्याध्यापिकापदाची जबाबदारी मिळाली ती 'ओसाडगावच्या पाटीलकी'सारखीच. पण त्यांनी ओसाडगावातच शिक्षणाचं नंदनवन फुलवलं. आमच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षणच नाही तर शिस्त आणि संस्कारही मिळू लागले. 

छत्रपती शिवाजी विद्यालयातील शैक्षणिक आणि इतर संस्कारांमुळे माझं तर जीवनच बदलून गेलं. आईची शाळेची निवड सार्थ ठरली. 

शिवीगाळ, रासवट वागणं चहूबाजूला असणाऱ्या वस्त्यांमधील आम्ही मुलं छत्रपती शिवाजी विद्यालयात घडवले गेलो. मला तसं वाचनाचं वेड बालपणापासूनच. पण छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रत्येक वर्गात पुस्तकांची पेटी येत असे. त्यातील पुस्तकांनी वाचन वेडाला आकार दिला. 

पत्रकार झालो ते वाचनाच्या वेडातून. त्या वेडाला आकार दिला तो शाळेतील त्या पुस्तक पेटीनं. तसंच लोकांसमोर, कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा आत्मविश्वास जोपासला तोही शाळेतील दर एक ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेतून. विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग कष्टकरी. कमीच भाग घ्यायचे. पण शिक्षकांच्या खोलीतील माइकसमोर उभं राहून बोलताना शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आपलं बोलणं ऐकत आहेत ही जाणीव माझा आत्मविश्वास वाढवत गेली. मी तसाही घडलो.

संस्थेतील प्रतिकुलतेशी लढतानाच पाटीलबाईंच्या सामाजिक जाणीव खूपच तीव्र होत्या. मला आठवतं मी आठवीला होतो. माझ्या सोबतची गिरणीकामगारांची मुलं असणारे मित्र रुबाबात राहायचे. पण तो गिरणी संप झाला. आणि चित्रच बदलले. खरंतर शाळेनं काय करावं? पण माझी शाळा पाटील मॅडमची शाळा होती. त्यांनी शिक्षकांच्या माध्यमातून आम्हा मुलांना विश्वासात घेतलं. कामगिरी दिली. संपानं पोळत असलेल्या गिरणी कामगारांच्या मुलांसाठी समाजातून सहकार्य मिळवण्याची. मला आठवतं. मी रिकाम्या वेळेत अनेक घरं फिरलो. खूप पुस्तकं गोळा झाली. शाळेत तो गठ्ठा नेताना ओझं जाणवलं नव्हतं, उलट आपण काहीतरी करु शकल्याच्या अभिमानानं त्या वयात छाती तट्ट फुगली होती.

मला आठवतं. अगदी आजही लक्षात आहेत आमच्या समूहगीत तासातील गाणी. खरा तो एकची धर्म...पासून अनेक. त्यातही ग.दि.मांडगुळकरांचं...हे राष्ट्र देवतांचे...हे राष्ट्र प्रेषितांचे...हे गाणं आजही मनात निनादत असतं.

"कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची"

हे कर्तव्यदक्षतेचे पाठ आपल्या वागण्यातून आमचा शिक्षकवर्ग आम्हाला रोजच शिकवायचा. 

पाटीलबाईंनी फार आर्थिक बळ नसताना, काही प्रस्थापितांचा साधा खिळाही ठोकण्यास विरोध असतानाही शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामांबरोबरच शिक्षकांच्या मदतीनं शिक्षणाचा दर्जाही असा दुरुस्त केला की इमारत बैठी असली तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाचे मात्र मनोरे उभे राहिले. जणू त्यांच्या रचनात्मक संघर्षातून त्या आम्हाला दाखवून देत असत...

"येथे नको निराशा, थोडया पराभवाने

पार्थास बोध केला येथेच माधवाने"

     माझ्यासारख्यांवर पद, सत्ता हाती असतानाही जमिनीवरच राहण्याचे संस्कारही झाले ते पाटील मॅडममुळेच. काहीवेळा चांगला पगार, सोयीसुविधा, मोठं पद असलेली नोकरी सोडून वेगळा प्रयत्न करण्याचं बळही आईच्या संस्कारांप्रमाणेच शाळेतील मॅडमचं वागणं पाहूनही मिळालं असावं. मॅडम महाराष्ट्रातील महानेत्याच्या कुटुंबातील. मात्र, मला आजही आठवतात...स्कुटरवरून येणाऱ्या, अनेकदा स्कुटर स्टार्ट करण्यासाठी किकवर किक मारणाऱ्या आमच्या पाटीलबाई. कडक शिस्तीच्या पण मायाळू स्वभावाच्या. माती आणि माणसांशी नातं राखणाऱ्या. बहुधा त्या माई म्हणून ओळखल्या जातात, त्यामागे थोरल्या बहिणीची करडी शिस्त आणि माया करणारा स्वभावही असावा.

पाटील मॅडम म्हणतात, "प्रत्येक मुलं हे बुद्धिमत्तेचं लेणं असतंच असतं. शिक्षकांनी शोधून आकार दिला पाहिजे. टाकाऊ काहीच नसतं, तसं वाटलं तरी त्यातूनच टिकाऊ घडवलंच पाहिजे."

घडलं तसंच. शाळेतून डॉक्टर - इंजिनीअर कमी झाले असतील. पण हजारो लघु उद्योजक घडलेत. शाळेच्या संस्कार, शिस्तीतून नेतृत्वगुण वाढवले गेले. छत्रपती शिवाजी विद्यालयात शिकलेल्यांमधून दहा नगरसेवक, दोन आमदार आजवर निवडले गेलेत. 

सरकारी योजना आता खूप आहेत. पण आमच्या शाळेत येणारी मुलं ही खूपच गरीब परिस्थितीतील. मुलींचे तर खूपच हाल. पाटील मॅडमनी एक योजना राबवली. विलेपार्ल्यातील मध्यमवर्गीय कुटुंबांशी संवाद साधला. त्यांना सहकार्यासाठी पुढे आणलं. त्या कुटुंबांनी मुलींना शैक्षणिक दत्तक घेतलं . त्या योजनेतून २५० मुली व्यवस्थित शिकू शकल्या.

मॅडम आणखी एक सांगतात. नव्हे तीव्रतेनं बजावतात. "कधीच नकारघंटा वाजवू नका. प्रयत्न करा. शिक्षकांनी ठरवलं तर खूप करू शकतात. तुम्ही चांगलं काम केलंत तर समाज सोबत येतो."

मॅडम जे बोलतात, त्यांनी करूनही दाखवलं. करूनही दाखवत आहेत. आमच्या शाळेला सभागृह नव्हतं. काय करायचं? प्रत्येक वर्गात स्पीकर लावले. समूह गीत स्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला. क्रीडांगण नसताना मुलांना दुसऱ्यांच्या मैदानात नेलं जायचं. तसं करून मुलांनी करून दाखवलं. शाळेची कबड्डीची टीम स्पर्धा जिंकायची. हे सारं करतानाच शाळा शैक्षणिक क्षेत्रातही पुढे गेली. पार्ले टिळकचा दहावीचा निकाल ९७ टक्के तर छत्रपती शिवाजी विद्यालयाचाही तेवढाच. फरक एकच. पार्ले टिळकची निवडून घेतलेली, तर छत्रपती शिवाजी विद्यालयाची मुलं कुठेही वाव नसलेली. पण कामगिरी सारखीच !

मला अनेकांकडून ऐकलेलं. आवडलेलं एक काम. आमच्या शाळेनं पार्ल्यात अनेक झाडे लावली. जोपासलीही. पार्ल्यातील अनेक झाडं पाटील मॅडमच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावली. मॅडमनी दुधाच्या रिकाम्या पिशव्यांमधून घरून पाणी आणून झाडं जोपासायची सवय लावली, 

जीवनभराचं देणं आम्हाला छत्रपती शिवाजी विद्यालयातून लाभले, ते पाटीलबाई आणि साळवीसर, जंगले सर, भट सर, चव्हाणबाई अशा शिक्षकांमुळे. शिक्षण संपवून आम्ही पुढे निघालो. १९९७नंतर पाटीलबाईही शाळेतून निघाल्या. 

शाळेतून निवृत्त झाल्यावरही माई स्वस्थ नाहीत. नव्हे त्यांना तसं बसणं शक्यच नाही. सध्या त्या कोल्हापुरात एन.डी.पाटील सरांसोबत कृतार्थ जीवन जगत आहेत. मात्र तिथंही स्वस्थ नाहीत. रयत शिक्षण संस्थेच्या किमान ८६ शाळांचा तरी दर्जा अधिक उंचावण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असल्याचं कळत आहे. म्हणजे एक छत्रपती शिवाजी विद्यालय घडवलेल्या आमच्या पाटील मॅडम आता जीवनाच्या या टप्प्यावरही तशाच अनेक शाळा घडवत आहेत आणि माझ्यासारखे लाखो विद्यार्थी ! 

- तुळशीदास भोईटे

9833794961


31 comments:

  1. ह्याच शाळेत मी सुद्धा घडलो आणि त्यांच्या संस्कार आणि विचारा मुळे मी भारतीय थलसेनेत भर्ती झालो व सलग 17 वर्ष देशाची सेवा करता आली हे माझे भाग्य पण हे सर्व घडलं फक्त आणि फक्त माझ्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या शाळे मुळेच...
    जय हिंद

    ReplyDelete
  2. After many days read a beautiful piece. Individuals like her who build generations are however often forgotten. I congratulate you for writing this blog. Keep writing. Keep motivating.

    ReplyDelete
  3. खुप सुंदर, चंदनाचे हात पायही चंदन असं काम आहे माईंच त्यांच्या कार्यास क्रांतिकारी सलाम..

    ReplyDelete
  4. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, खूप सुंदर तुमचे संस्कार, माई तुमच्या कार्यास क्रांतिकारी सलाम.

    ReplyDelete
  5. खूप छान माई एक आदर्श शिक्षिका ,मुख्याधिपिका म्हणून काम केलेले आहे छत्रपती शिवाजी हायस्कूल विलेपार्ले मध्ये शैक्षणिक परिसर प्रतिकूल सुविधांचा अभाव असताना विद्यालयाची शैक्षणिक सामाजिक गुणवत्ता चांगली वाढविली आहे शाळेच्या परिसरात कामगारांची मुले , गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण, शिस्त, संस्कार त्यांनी दिले आहेत त्यांनी जे शैक्षणिक क्षेत्रात काम केले आहे हे त्यांच्या आईवडिलांच्या संस्काराचे फलित आहे एवढया प्रतिकूल परिस्थितीत केलेले शैक्षणिक काम फारच मोठे आहे त्यांच्या
    या शैक्षणिक कामास सलाम जय कर्मवीर

    ReplyDelete
  6. Vivekrao Shinde
    Artist - kolhapur
    खूप छान लेख आहे.

    माईंनी माझे आयुष्य स्थिर केले आहे. त्यांचे खूप खूप आभार. त्या प्रेरणादायी व मार्गदर्शिका आहेत.
    ** 'चंदन होऊन जन्मावे,
    चंदन होऊन झिजावे,
    चंदन होऊन सुगंधावे. **

    ReplyDelete
  7. खूप खूप अभिमानास्पद असा आपला विचार मनास भावला.
    अशी असावी कृत्तज्ञा .🙏🙏

    ReplyDelete
  8. आव्हानात्मक परिस्थितीतील सौ. माईंच्या कार्यास आदरपूर्वक सलाम !🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  9. आदरणीय माई आपले काम आम्हा सर्वांना ज्ञात आहेच परंतु माई म्हणजे दुसरी आई मानणाऱ्या पैकी मी आहे .आज पर्यंत केलेल्या कामाचे व सहकार्य असेच सर्वांना मार्गदर्शक ठरावे हीच शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
    आपला बाळासाहेब गोरखनाथ शितोळे माजी प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय Rukadi.

    ReplyDelete
  10. आदरणीय माई आमच्या प्रेरणास्थान आहेत. आमचा अभिमान आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.

    श्री.शशिकांत पाटील
    पर्यवेक्षक,बागणी.

    ReplyDelete
  11. माई खूप छान काम केलेत तुमच्या कार्यास सलाम

    ReplyDelete
  12. माई, तुम्ही खूप चांगले काम केले आहे. तुमच्या कार्याला माझा मनापासून सलाम. तुमच्या कार्यातून निश्चितच आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते.कार्य सिद्धीस नेतांना मोठ्या प्रमाणात जिद्द पणाला लावावी लागते. ती मिळवली आणि कार्याला सफलता मिळाली. यात खूप मोठे समाधान आहे.या वयातही आपल्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान हे आमच्यासारख्या तरुणाला लाजवते. आपल्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा.
    आपला,
    प्राचार्य उदयकुमार अरुण सांगळे,
    श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, रुकडी

    ReplyDelete
  13. मनापासून खूप आवडला लेख

    ReplyDelete
  14. खूपच छान माहिती आहे. माईच योगदान या शाळेसाठी खूपच मोठं आहे. याचा मला अत्यंत अभिमान आहे

    ReplyDelete
  15. वर्षानुवर्षे अंधकार आणि अज्ञानात ग्रासलेल्या समाजाला ज्ञानाचा नवा प्रकाश देण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली व ती ज्योत तेवत ठेवण्याचे व शिक्षणाचा वसा व वारसा एकविसाव्या शतकात सुद्धा पुढे नेणेचे महान कार्य माई साहेब यांनी केले आहे . बहुजन समाजातील शेतकरी ,कष्टकरी, तळागाळातील उपेक्षित,अशिक्षित ,शोषित ,घटकातील मुलांना तिमिरातून तेजाकडेचे नेण्याचे कार्य व त्यांच्या जीवनात "ज्ञानदीप"सदैव प्रज्वलित करण्याचा कार्य रयतच्या माध्यमातून माईनी केलेले आहे. याचे शब्दशः वर्णन करणे कठीण आहे .माई या आजच्या काळातील शिक्षण प्रेमींसाठी एक "दीपस्तंभ" आहेत त्यांच्या शिक्षण रुपी कार्याला मी शतशः वंदन करत आहे.
    त्यांच्या शिक्षणाच्या कार्यावर व व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणारा मी त्यांचा एक सच्चा रयत सेवक आहे याचा मला अभिमान आहे
    श्री रावसाहेब वसंतराव शिंदे ( कलाध्यापक )
    रा . बा . पाटील विद्यालय सडोली खालसा .
    ९८२२४५९६५६

    ReplyDelete
  16. आदरणीय श्रीमती सौ. सरोज ताई पाटील मॅडम, यांच्या कर्तृत्वाचा इतिहास खुप मोठा आहे.. त्यांच्या विषयी बोलण्यास शब्दही अपुरे आहेत..
    चांदीचा चमच्या घेऊन जन्माला आलेल्या या मॅडमनी आपल्या सर्व सुख सोयी एका बाजूला ठेऊन केवळ समाज प्रबोधनाचा मुळ असलेल्या शिक्षण क्षेत्रात उडी घेतली.. या मागे त्यांचा उद्देश फक्त एकच होता की रसातळाला गेलेल्या, कुपोषित, शिक्षणापासून वंचित, गरीब, दुर्बल असलेल्या समाजाला निस्वार्थ, निःसंकोचपणे घडवणे..
    पेरणी केलेले बियाणे हे उगवणारच पण जर त्याला वेळीच खत पाणी व्यवस्थित घातले, त्याची देखरेख व्यवस्थित झाली तर ते सक्षम बनते, टिकून राहते.. हे त्या ममत्व असणा-या मॅडमने जाणले होते..
    आणि म्हणूनच त्यांनी हे क्षेत्र निवडले..
    नकळत एक प्रकारची समाज बांधिलकी जपत होत्या त्या..
    आज या क्षेत्राचा बाजार मांडला आहे.. पैसे द्या आणि शिक्षण घ्या.. पण आमच्या मॅडम ने तसं काहीच केले नाही.. आजुबाजुला नामाजलेल्या शाळा होत्या.. त्यातुन केवळ डॉक्टर, इंजिनिअर आणि वकिलांनी जन्म घेतला होता पण आमच्या शाळेने कुशल कामगार उभे केले होते, देशाच्या सिमेवर रक्षा देणारे सैनिक उभे केले होते, मुलांना स्वताला उभे राहायला शिकवले होते, वैगरे वैगरे.. या सर्वांनमागे फक्त माई आणि त्यांची टिम होती..
    आज आपण पन्नाशी, साठी जवळ आलो आहे आपल्या मुलांना ना शिक्षकांची धस्ती आहे ना शाळेचे महत्त्व.. किमान एक तरी पालक मुला सोबत बसुन त्याचा अभ्यास घेताना दिसतो.. त्यावेळेस आमचे आईवडील मजुर, अशिक्षित.. त्यांना त्यांच्याच जिवनात निर्माण झालेल्या ठिगळांना शिवतांना नाकेनऊ येत होते, मग आमची शैक्षणिक प्रगती तर दुरचीच गोष्ट.. अश्या फाटक्या जीवनाला कुशल शिप्यांसारखे टाके देऊन समाज्यासमोर एखाद्या परिपक्व मानसासारखे उभे केले..

    कोळश्यातुन हिरे गोळा करावे तसे मॅडमने,
    आदरणीय,
    श्री गावडे सर,
    श्री रमेश साळवी सर,
    श्री मनोहर चव्हाण सर,
    श्री अंतोनी लोबो सर,
    श्री अनिल जंगले सर,
    श्री किशोर भट्ट सर,
    श्री प्रमोद म्हात्रे सर,
    श्री गुलाबराव जाधव सर,
    श्री सुरेश माने सर,
    श्री भास्कर मुळे सर,

    आदरणीय,
    सौ. कुंदा वासुदेव मॅडम,
    सौ निलिमा चव्हाण मॅडम,
    सौ लिला काळे मॅडम,
    सौ अपर्णा वाडकर मॅडम,
    सौ सुजाता सकपाळ मॅडम,

    आदरणीय
    श्री तानाजी काष्टे सर,

    आदरणीय
    स्वर्गीय कै. श्री साने सर,
    कै. श्री गणेश बोरोले सर,
    कै. श्री सुधाकर राणे सर,
    आणि
    कै. श्रीमती स्मिता राजवाडे मॅडम

    या सारखे हिरे गोळा करुन एक हि-यांची माळ गुंफून ठेवली..
    या माळेमुळेच शाळेचे सौंदर्य वाढले..
    शिक्षक मारत होते यापेक्षा आम्ही नकळत घडत होतो याची आम्हाला जाणीव ही होऊ दिली नाही.. गलिच्छ, अगदी दंगामस्ती करणा-या वस्तीतून उद्रेकाला आलेल्या दगडांत या संपूर्ण गुरुजण वर्गाने काही अपवाद वगळता मुर्तीत रुपांतर केले होते..

    आज आम्ही खुप शिकलेलो नाही आहोत, ना ही श्रीमंत आहोत पण समाधानी मात्र प्रमाणाच्या बाहेर आहोत..
    शिकवणच होती तसी त्यांची की, जो समाधानी तोच सुखी, तोच समृद्ध..
    मी माझे दुर्भाग्य समजतो की मला या गुरुजन वर्गाची केवळ तीन वर्षच मिळाली.. शिशुवर्गा पासुन ते दहावी पर्यंत जर मला यांची सांगड लाभली असती तर आज आमच्यापैकी भरपुर जणांचे समाजातिल स्थान अव्वल असते..

    शेवटी एकच बोलेन..

    हेच ते शिक्षक, हिच ती शाळा आणि हेच ते मायेचं छत..
    जिथे घडत होता, आमच्या भविषाचा छानसा लघुपट...

    मारुती आनंद बजबळकर
    माजी विद्यार्थी, सत्र १९९० ते सत्र १९९३.

    ReplyDelete
  17. आदरणीय बोहिटे सरांनी सदर माहिती ब्लॉग रूपाने present केल्या बद्दल धन्यवाद. महाराष्ट्रीय जनहित चळवळींचे अतुलनीय व्यक्ती मा. Dr.N.D.Patil saheb यांच्या सुविद्यापत्नी सौ. सरोज पाटील माई यांच्या शिक्षिका ते मुख्याध्यापिका या कारकीर्दीचा घेतलेले आढावा तो काळ , शिक्षण व्यस्थेतील संक्रमण यांना स्पर्श करतो. शिक्षक खूप काही करू शकतो. विज्ञान,सा. शास्त्रे , गणित हे विषय हातात पुस्तक घेऊन शिकवतात का ? असे माई आज ही रयत सेवकांना विचारतात. प्रत्येक विद्यार्थ्याला उपजत क्षमता आहे कोणीही मठ्ठ नसतो हे त्याचे मत तेंव्हा ही होते आज ही आहे व पुढे ही राहणार. त्यांना समस्या बघून रडणारे शिक्षक आवडत नाहीत. लिहिण्यासारखे खूप आहे पण comments चे रूपांतर निबंधात होइल. सौ. माई व Dr.N.D. पाटील साहेब हे दोघे परीस आहेत त्यांचा सानिध्यात जो येतो तो हिराच बनतो. धन्यवाद Dhananjay Akaram patil
    A.Teacher k.B.p. v.Bagani

    ReplyDelete
  18. माई,आपण तळागाळातील मुलांसाठी जे कार्य केले ते अतुलनीय आहे, आपल्या कार्यास सलाम.

    ReplyDelete
  19. आदरणीय माईंनी उभी केलेली शाळा छत्रपती शिवाजी विद्यालय विलेपार्ले संबंधीचा लेख खूपच छान आहे. शिक्षिका ते मुख्याध्यापक म्हणून केलेल्या कामांमुळे अनेक विद्यार्थी घडले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शाळा उभी करण्याचे व विद्यार्थी घडवण्याचे काम धाडसाने व कल्पकतेने त्यांनी केलेलेआहे याचे सर्व श्रेय माईंना जाते त्या शाळेत काम करत असताना त्यांना आलेल्या अनुभवाचा लाभ आम्हा सर्व सेवकांना त्यांच्या मार्गदर्शनामुळे होत आहे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व कौतुकामुळे सर्व रयत सेवक भारावून जातात व शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी झटून काम करतात आदरणीय माईंचे सतत मार्गदर्शन मिळत राहण्यासाठी त्यांना चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
    श्री. वाय. डी. केसरे
    मुख्याध्यापक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बागणी.

    ReplyDelete
  20. आदरणीय श्रीमती सौ. सरोज ताई पाटील मॅडम आपले काम आम्हा सर्वांना ज्ञात आहेच परंतु माई म्हणजे दुसरी आई मानणाऱ्या पैकी मी आहे . ह्याच शाळेत मी सुद्धा घडलो.जीवनभराचं देणं आम्हाला छत्रपती शिवाजी विद्यालयातून लाभले, ते पाटीलबाई आणि सर्व शिक्षकांमुळे आज पर्यंत केलेल्या कामाचे व सहकार्य असेच सर्वांना मार्गदर्शक ठरावे हीच शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

    योगेश सोमा कानागल
    माजी विद्यार्थी, सत्र १९९० ते सत्र १९९३.

    ReplyDelete
  21. आमचे मित्र तुलशिदास भोईटे ह्यांनी माईंबद्दल जो लेख लिहिला ते वाचून पुन्हा शालेय जीवनात गेल्यासारखे झाले खरंच माई माई होत्या कोणताही विषय शिकवण्याचा त्यांचा हातखंडा होता कठीण विषय सोपा करून प्रत्येकाच्या स्मरणात राहील अशा शिकवायच्या.धन्यवाद तुलशिदास आमच्या माईरूपी शिक्षकांना आमच्या समोर आणलात त्याचा मला फार अभिमान वाटला
    अनिल मोघे अंथेरी

    ReplyDelete
    Replies
    1. खुप छान वर्णन भोईटे सरांमुळे भूतकाळात जाऊन आले.आम्ही ५भावंड याच शाळेत शिकलो.
      मी१९८३/१९८५ काळात शिकत होते.परत सगळ्यांना भेटायला मिळाले तर फार आनंद होईल.

      Delete
  22. खूपच सुंदर मांडणी तुळशीदास सर यांनी केली व आपले दैवत पाटील मॅडम यांचे समाजकार्य व शाळेतील ते सुवर्ण दिवस सहज डोळ्यासमोर उभे राहिले.पाटील मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या सारख्या तळागाळातील विद्यार्थ्यासाठी जे कार्य केले त्याला तोड नाही.आम्ही त्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. त्यांचे खूप खूप आभार

    ReplyDelete
  23. तबेल्याची शाळा करणाऱ्या माईचे कार्य अभिनंदनीय आहे. असेच कार्य रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील अनेक शाखांमध्ये माईच्या मार्गदर्शनाखाली आजही सुरु आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , ढवळी . ता : वाळवा, जिल्हा : सांगली हे विद्यालय होय. अल्पावधीतच माईच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. माई च्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून विद्यालयाची इमारत, विविध उपक्रम विद्यालयात सुरु आहेत. वयाच्या ८० व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा प्रकारचे कार्य त्या करत आहेत. हे सर्व करत आदरणीय प्राध्यापक.एन.डी .पाटील साहेब व कुटुंबातील इतर सदस्यांकडे जातीने लक्ष देत आहेत याचे आम्हाला कौतुक वाटते. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वास उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा .

    मुख्याध्यापक व सर्व सेवक वर्ग ,
    राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय
    व कनिष्ठ महाविद्यालय, ढवळी.
    ता: वाळवा , जि : सांगली

    ReplyDelete
  24. विलेपार्ले सारख्या वस्तीत तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगोत्री पोहचवणाऱ्या माई खरोखरच धन्य आहेत
    त्या स्कूटर वरून शाळेस जात असताना त्यांनी घडलेला एक प्रसंग मला जेव्हा सांगितला तेव्हा तर अंगावर शहारेच आले माईंनी अतिशय कठीण प्रसंगांना तोंड देऊन विद्यार्थ्यांना घडवले आहे
    आज माझ्या सारख्या शिक्षकांना सौ . माईंनी केलेल्या त्यागातून खरी स्फूर्ती मिळेल .

    सौ. माईंच्या या ज्ञानाच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम

    ReplyDelete
  25. Really Patil madam is the best principal and all teachers I am very proud of my all teachers.Really miss those days

    ReplyDelete
  26. Really patil madam is the best teacher and all teachers who taught me really miss that days

    ReplyDelete