Thursday, September 10, 2020

#कोरोनावास्तव महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या दहा लाखांवर जाण्याची शक्यता - पुणे जिल्हा महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरण्याची पाच कारणं

गुरुवारी महाराष्ट्रात २३ हजार ४४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना रुग्णाांची एकूण संख्या ९ लाख ९० हजार ७९५ झाली आहे. सध्या वाढीचा रोजचा दर हा २० हजारांच्यावर आहे, त्यामुळे शुक्रवारी राज्यातील कोरोना रुग्ण संख्या दहा लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी १४ हजार २५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख ७१५ वर पोहचली. 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.७२ % एवढे झाले
आहे.


आज पुणे जिल्ह्यातील कोरोना वास्तवाचा आढावा घेऊया.
हा जिल्हा महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरलाय. एकीकडे सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांनी कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आणल्याचा दावा केला जात असतानाच पुण्यात मात्र कोरोना संसर्ग वाढताच आहे.
सक्रिय रुग्ण संख्येच्या बाबतीतच नाही तर एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीतही पुणे जिल्हा नंबर १ ला आहे.

पुणे महाराष्ट्राची कोरोना राजधानी का ठरला, याचा शोध घेतला तर पुढील कारणं समोर येतात. 

1. योग्य समन्वय नाही 
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेवर आहे. राज्यसरकार, जिल्हा परिषद आणि या दोन मनपा यांचा परस्पर समन्वय योग्य नसल्याचं सांगितलं जातं.

2. हाताळणीत चूक
ससून रुग्णालय सर्वात मोठं. मात्र त्या रुग्णालयात कोरोनाचं गांभीर्य समजून योग्य यंत्रणा उभीच करण्यात आली नाही. कालांतराने अधीक्षकांवर बदलीचा बडगा उगारला गेला. इतर मनपा आणि सरकारी यंत्रणाही खरंतर म्हणाव्या तशा सक्रिय नव्हत्या. संकट ओळखून तयारी झाली पाहिजे होती ती केली गेली नाही. मुंबईच्या जंबो फॅसिलिटींचा अभ्यास करुन त्वरित पावलं उचलण्याऐवजी दिरंगाई झाली. आताही ८०० खाटांचा दावा असलेल्या कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्षात ३००च खाटा असल्याचा आरोप डॅशबोर्डावरील माहितीच्या आधारे आम आदमी पक्षाने केला आहे.

3. लॉकडाऊनबद्दल धरसोड धोरण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पालक मंत्री असेलेला हा जिल्हा. मात्र राज्यात कडक लॉकडाऊन होते तेव्हाच पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनच्या बाबतीत धरसोड धोरण होतं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईप्रमाणे टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन उठवण्यास सांगितला होता, पण व्यापाऱ्यांच्या दबावामुळे लवकर उठवावा लागल्याची कबुली उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच दिली असली तरी त्यामुळे जे व्हायचे ते नुकसान होऊनच गेले.
मात्र, केवळ सरकारी यंत्रणा, मनपा प्रशासन यांना दोष देता येणार नाही निष्काळजीपणा घडलाय तो पुणेकरांकडूनही! गर्दीत वावरणं आणि मास्क न घालणं सर्रास घडलं, घडतंय, अशा तक्रारी आहेत.

4. डॉक्टरांची कमतरता
पुणे जिल्ह्यात त्यातही पुणे शहरात आरोग्य सुविधांची कमतरता नाही. त्यात पुन्हा खास  कोरोनासाठी वेगळ्या सुविधाही उभारण्यात आल्या. मात्र, त्यांची हाताळणी करण्यासाठी, उपचार करण्यासाठी योग्य प्रमाणात डॉक्टरच नाहीत. 
पुणे महापालिकेत फक्त २१०च डॉक्टरांची मंजूर पदं आहेत, त्यातही सध्या १५६ सेवेत आहेत. तर पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण डॉक्टर 398, तर जिल्हा परिषद सेवेत एकूण डॉक्टर 186च आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जवळपास 3 हजार 500 डॉक्टर आहेत. लोकसंख्येचा आणि इतर आजारांचा विचार करता डॉक्टरांची संख्या कमी आहे.

5. सुसज्ज रुग्णवाहिका मोजक्याच
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूमुळे सुसज्ज रुग्णवाहिकांची कमतरता उघड झाली. तसं पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यात किमान ६०० रुग्णवाहिका असाव्यात. पण त्यातील खूपच कमी अगदी मोजक्याच कोरोना अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक अशा सुसज्ज आहेत.

No comments:

Post a Comment