संवेदनशीलता...’लिमिटेड!’
बातमी -1 - वर्ष उलटून गेले...’तो’ दिवस विसरायचे म्हटले तरी विसरता न येणारा...दिल्लीत निर्भयावर
अमानुष अत्याचार झाले तो हाच
दिवस...वगैरे...वगैरे...
बातमी -2- अवघ्या चार वर्षांच्या बलात्कार पीडित चिमुरडीवर प्रश्नांची
सरबत्ती...आणि तेही तक्रार नोंदवताना पोलिसांकडूनच! ...”तू खरे बोलते आहेस की खोटे? खरोखरच तू जसे सांगितले तसेच तुझ्यासोबत घडले होते का? ”
बातम्या दोन...आजच्या एका दिवशीच आलेल्या...पहिली बातमी आपण काही उपचार पार
पडतो तशी. ठराविक साचाची. वर्ष सरले आता दखल घेतलीच पाहिजे म्हणून आवश्यकच असलेली.
दुसरी मात्र हादरवून टाकणारी. एक प्रकारे अत्याचारानंतरचे अत्याचारच उघड करणारी. पुन्हा
त्या चिमुरडीसोबत हे सारे अत्याचार झाले ते दिल्लीतच. त्या चिमुरडीवर तिच्याच प्ले
ग्रुपच्या मुख्याध्यापिकेच्या पतीने अत्याचार केले ते ही गेल्यावर्षी
डिसेंबरमध्येच. निर्भयावर अत्याचार झाले त्याच महिन्यात आणि स्वाभाविकच त्या
चिमुरडीवर मानसिक अत्याचार करणारे प्रश्न विचारले गेले ते ही निर्भयामुळे आपल्या
संवेदना जाग्या झाल्या त्यानंतरच्या काळातच!
त्यामुळेच प्रश्न निर्माण झाला आहे...खरोखरच आपल्या संवेदना जाग्या झाल्या
आहेत का?
ठिक आहे. पोलिसांना कायद्यानुसार वागावे लागते. नियमांनुसार काही माहिती
विचारावी लागतेच. पण म्हणून असे प्रश्न!
ज्या वयात स्त्री-पुरूष हे भेदही कळत नसतात. त्यावयात कोणीतरी वासनांध सैतान
अशा चिमुरड्यांवर अत्याचार करतो. कल्पनेनेही जीव पिळवटून जातो. वेदना कशा सहन करू
शकतात ते चिमुरडे जीव...वासनांध सैतानांना तसे करताना कसे काहीच वाटत नाही. एक
नाही अनेक प्रश्न मनाला इंगळ्या डसाव्या तसे डसत राहतात. मात्र त्यानंतर
ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा, वासनांध सैतानांना ज्यांनी अद्दल घडवलीच पाहिजे असे वाटते,
ते पोलीसच असे प्रश्न विचारतात तेव्हा मात्र आपल्याही मनावर अत्याचार झाल्यासारखे
वाटतात.
मला फक्त त्या कनिष्ठ पोलिसांना दोष द्यायचा नाही. सर्वात सोपा मार्ग ठरेल तो.
नेहमीसारखा. कनिष्ठ स्तरावर काम करणा-या पोलीस कर्मचा-यांमध्ये त्यासाठी
संवेदनशीलता असेलच असे म्हणता येत नाही. मात्र वरिष्ठ अधिका-यांचे काय? निर्भयासारख्या प्रकरणानंतरही ते झोपूनच होते काय? त्या चिमुरडीला विचारले गेलेले प्रश्न पाहिले तर
तसेच वाटत आहे.
कारण आताच काही महिन्यांपूर्वी मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला
तेव्हाही असाच काहीसा अनुभव आला. मी जेथे कार्यरत होतो त्या चॅनलच्या वार्ताहराला
अत्याचार पीडित मुलीची मुलाखत मिळाली. खरेतर ती सर्वच चॅनलना मिळाली होती. मात्र
त्या वार्ताहराने फोन करून तिला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीची माहिती त्यात
असल्याचे सांगितले. त्यामुळे आमच्या टीमने गंभीरता ओळखून मोहीमेसारखा तो विषय
हाताळला. ती मुलाखत स्वत: ऐकली तेव्हा कानात कोणीतरी एसिड ओतत आहे असेच वाटले. तिलाही
मुंबईच्या पोलिसांनी असेच प्रश्न विचारले होते. “तुझ्यावर बलात्कार कशावरून झाला...तूच तशी आहेस...” पोलीसी गणवेशातील एका
पुरूषाच्या या हल्ल्यानंतर तिला मग एका वडिलधा-या स्वरात आणखी एकाने समजावले. “हे बघ...तुझ्यावर बलात्कार झाला
अशी तक्रार नोंदवली तर तुझेच नाव खराब होईल...मग लग्न कसे होईल?”
सुदैवाने कायद्याच्या रक्षकांना जे वाटले ते तिची लग्नाची काळजी ज्याने केली
पाहिजे त्या तिच्या भावाला वाटले नाही. त्याचा कणा शाबूत होता. गणवेशाखाली त्याची
संवेदना झोपली नव्हती. त्याने सामाजिक कार्यकर्त्यांकडे, प्रसारमाध्यमांकडे धाव
घेतली. बहिणीवर अत्याचार करणा-या नराधमांना गजाआड पोहचवले. प्रसारमाध्यमांमध्ये
प्रकरण गाजल्यानंतर त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली.
एवढे झाले तरी मी फक्त कनिष्ठ पातळीवर कार्यरत पोलिसांनाच दोष देणार नाही. चूक
आहे ती त्यांच्यात आवश्यक ती संवेदनशीलता निर्माण करण्यात अपयशी ठरणा-या
वरिष्ठांची. मोठी-मोठी भाषणे होतात. राजकीय नेते-वरिष्ठ अधिकारी खूप बोलतात. मात्र
प्रत्यक्षात ज्या कनिष्ठ पातळीवर प्रत्यक्षात काम चालते. अंमलबजावणीची जबाबदारी
असते त्या कनिष्ठ स्तरापर्यंत यातील काहीच पोहचत नसते.
आता काहींना प्रश्न पडेल की कनिष्ठ स्तरावरील पोलीसही माणसेच असतात. त्यांनी संवेदनशील
असलेच पाहिजे. होय ना. मात्र जेव्हा तुमच्या हद्दीत गुन्हे वाढलेच नाही पाहिजेत
असा वरून दट्ट्या असला तर ठाण्यात बसलेले कर्मचारी गुन्हा घडल्यावरही तो नोंदवून
कारवाईसाठी खरीखुरी शाबासकी मिळवण्याऐवजी गुन्हा नोंदवण्याचे टाळून गुन्हेगारी कशी
नियंत्रणात ठेवली त्याचे काल्पनिक चित्र उभे करून कौतुक पदरात पाडणारच ना!
तेजपाल प्रकरणाने अगदी न्याय देण्याचा आव आणणारेही कसे अन्याय करणे योग्य
मानतात ते उघड झाले आहे. त्या मुलीचा ईमेल हादरवून टाकणारा आहे. तेजपालच्या राजकारण्यांचे
वस्त्रहरण करणा-या गौप्यस्फोटांमुळे जेवढा तहलका माजला नव्हता तेवढा त्या मेलमुळे
झाला. “आपल्या वडिलांच्या
वयाच्या वरिष्ठाला आपले शरीर उपभोगू देणे हाच नोकरी टिकवण्याचा मार्ग” असे तरूणीला तेजपालांकडून बजावले गेले. हे तेजपाली चाळे सामूहिक
बतात्कार करणा-या वासनांध सैतानांपेक्षा फार वेगळे नव्हते. उलट ते नराधम पुढे
नैतिकतेचा आव तरी आणत नाहीत. त्या तरूणीने तेजपालाच्या मुलीला तिच्या वडिलांचा
पापाचा पाढा वाचताच त्या तेजपालांनी जे म्हटले ते अधिकच संतापजनक...”बाप-मुलीच्या नाते-संबंधांचा तरी
तू विचार केला पाहिजे होता! ”
तेजपालसारख्यांचे हे वर्तन समाजातील संवेदनशीलता हरपत चालल्याचेच उघड करणारे
आहे. मुळात संवेदनशीलता हीच आता दुर्मिळ भासत आहे. पुन्हा ही संवेदनशीलता दुस-यांमध्येच का असावी. तुमचे-आमचे
काय? आपण काय करतो. काही
अपवाद वगळले तर काय घडताना दिसते. डोळ्यादेखत गैरप्रकार घडताना पाहून कितीवेळा आपण
पुढे सरसावतो. प्रतिकार नाही पण किमान नंतर पोलिसांना कळवून त्यांना पुढच्या
कायदेशीर कारवाईसाठी तरी आपण मदत करतो का?
केवळ
आता मोबाईलवर फेसबुक-टि्वटर उपलब्ध आहे म्हणून पोस्ट-ट्विट करून उपचार पार
पाडण्याएवढीच आपली संवेदनशीलता लिमिटेड ठेवायची का?

No comments:
Post a Comment