आता दादागिरी दाखवाच!
“बलात्कारी नराधमांचे
कापून टाका...आता काय कापायचे ते तुम्हाला ठाऊक आहे...” राज्याचे
उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचे हे वक्तव्य. जालन्यात त्यांनी जाहीररीत्या असे
म्हटले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला होता. मात्र दुस-या दिवशी लगेच
त्यांच्यावर टीकेची झोड सुरू झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री असे कसे बोलू
शकतात...त्यांनी पुन्हा मर्यादा ओलांडली वगैरे...वगैरे...त्यावेळी मी या वक्तव्याच
टीव्हीवरील चर्चेत समर्थन केल्यावर अनेकांचे फोन आले. आपण चिथावनीखोर वक्तव्याचे
समर्थन कसे करू शकतो, असे मला समजवले गेले. मात्र मला ते पटले नाही. ज्या वयात
स्त्री-पुरूष भेदही कळत नसतो त्या वयातल्या अगदी कोवळ्या चिमुरड्या मुलींपासून
आजीच्या वयाच्या जख्ख वयोवृध्दांना वासनांध नराधम लक्ष्य करीत असताना कोणालाही चीड
येणारच ना. कायदा वगैरे ठीक आहे. पण अगदी घरातल्या स्त्रीयांनाही विचाराल तरी
बलात्का-यांचे लिंग कापणे हा त्यांनाही योग्य उपाय असल्याचे त्या मनापासून
सांगतील. जनसामान्यांच्या भावना नेत्यांनी अभिव्यक्त केल्या तर त्यात चुकीचे काही
आहे असे वाटत नाही. मग ती ठाकरी शैली असो वा अजीत पवारांची दादागिरी.
आता पुन्हा हे सारे आठवण्याचे कारण तसेच
आहे. नुकतीच एक घटना घडली आहे.
घटना बारामती येथील आहे. 8 डिसेंबरला 15 वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार झाला. दुस-याच दिवशी त्या मुलीने
स्वतःला जाळून घेतले. आज ती पुण्याच्या रूग्णालयात अतिगंभीर अवस्थेत आहे.
पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. मात्र आठ दिवस उलटून गेले, तरी पुढे काही
घडलेले नाही. ज्याने त्या मुलीवर पाशवी अत्याचार केले तो सुरेंद्र काजळे हा नराधम
पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
घटना बारामतीची आहे म्हणूनच नाही तर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची आहे,
त्यामुळे आठवले ते दादांचे जालना येथील वक्तव्य. दादांनी
काही दिवसांपूर्वीच जालना येथील सभेत जाहीररीत्या बलात्कारी नराधमांविरोधात गर्जना केली होती आणि
आता त्यांच्याच बारामतीत ही घटना घडली आहे. दादांनी अभिव्यक्त केलेली
सर्वसामान्यांच्या मनातील भावना, कायद्याच्या चौकटीत ‘सध्यातरी’ बसू शकत नाही. (‘सध्यातरी’...कारण जगात अनेक देशांमध्ये बलात्कारी नराधमांसाठी लिंगविच्छेदनाची
शिक्षा आहे! आपल्याकडेही
तशी शिक्षा आणणे गैर ठरणार नाही.)
पण किमान आपल्या दादागिरीचा वापर अजीतदादा त्या बलात्कारी नराधमाला जेरबंद करण्यासाठी
करणार का?
दादा
कुणाचीही भीडभाड ठेवत नसतात असे म्हणतात, मात्र सर्वसामान्यांना त्याचा प्रत्यय
येणे गरजेचे आहे. नाहीतर एक आक्रस्ताळी, नको तेवढा आक्रमक नेता अशीच त्यांची
प्रतीमा तयार केली जात राहील. ही आक्रमकता जर लोकांच्या प्रश्नावर, त्यांना न्याय
देण्यासाठी उपयोगात आणली गेली तर खरोखरच अशी दादागिरी पाहिजेच असे कोणीही म्हणेल. मग दादा म्हणतात तसे त्यांच्या द्वेशातून
त्यांना कोणी जाणीवपूर्वक लक्ष्य करीत असले तरी तशी टीकाही त्या लोकभावनेच्या
झंझावातात पालापाचोळ्यासारखी उडून जाईल. पण दादा तशी दादागिरी दाखवणार का?
#rape #baramati #pawar #ajitpawar #maharashtra #ncp #baramatirapes #rapevictims #castration #punishmentforrape #police #maharashtrapolice

hope dada will do justice to the poor
ReplyDelete