Saturday, October 17, 2020

Maharashtra Farmer's Ground Report from Flood Affected Farms ओला दुष्काळ -शेतकऱ्याचा ग्राऊंड रिपोर्ट

आधीचे अटी शर्ती निकषवाले सरकार. तर आताचे पंचनामेवाले. परतीचा पाऊस शेतकऱ्यांना बुडवणारा ठरला. एका शेतकरी तरुणाचा बुडालेल्या शेतातून ग्राऊंड रिपोर्ट... #ओलादुष्काळ सिद्ध करणारा अस्सल पंचनामा...
@ganesh_ghorband 
तुम्हीही मांडू शकता - संपर्क ७०२११४८०७०
 
पाहा

मराठवाडा, कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही शेतकरी कधी सुका तर कधी ओला दुष्काळ पडत असल्यानं पिडलेला असतो. यावेळी पाऊस चांगला झाल्यानं...अगदी दुष्काळी टापूतही शेतकरी सुखावले. पण तेवढ्यात परतीच्या पावसानं सैतानासारखं झोडलं. सारं बुडवलं. कुठे भाक, कुठ नाचणी, कुठे कापूस, कुठे सोयाबिन सारं सारं हातचं गेलं. सरकार सांगतंय पंचनामे करु मग नुकसानभरपाई देऊ! 
सारं बुडालेल्या शेतकऱ्यांचं जीवनच बुडत असताना सत्ताधारी असं का बोलतात? 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं ते योग्यच...पंचनाम्यांसाठी का थांबता?
विरोधात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो की काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते ते आता तसे का बोलत नाहीत? सत्तेतील चेहरे बदलले तरी वृत्ती तशीच का? शेतकऱ्यांना हक्काचं पीक कर्ज का मिळत नाही? भाजप सरकारच्या अटी शर्ती निकष जसे शेतकऱ्यांना भोवायचे तसेच आताच्या आघाडी सरकारचेही का?  अस्वस्थ करणारे काही प्रश्न
मुक्तपीठसाठी नांदेडचे एक तरुण शेतकरी गणेश घोरबांड यांनीच आपल्या गावांमधील बुडालेल्या शेतांमधून ग्राऊंड रिपोर्ट मांडलाय...आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत...तिथं त्यांनी नोकरशाहीच्या विळख्यातून बाहेर येऊन थेट शेतकऱ्यांना भेटावं. समजून घ्याव्या त्यांच्या मनातील त्यांच्या व्यथा....जाहीर करावा असलेला भोवणारा ओला दुष्काळ...मुक्तपीठचं एवढंच साकडं.

Friday, October 9, 2020

टीव्हीचा धंदा का झाला गंदा? समजून घ्या टीव्ही रेटिंग गेम What is TRP SCAM ? What is TRP game?







३२ हजार कोटी

होय ३२ हजार कोटी

मग कोणी कोणतीही भूमिका घेऊ दे...खरं लक्ष्य असते ते या आकड्यावरच. हा आकडा आहे. भारतीय टीव्ही इंडस्ट्रीच्या वार्षिक जाहिरात उत्पन्नाचा. या आकड्यातील वाटा ठरवण्यात सर्वात महत्वाची कामगिरी बजावतात तेही आकडेच. ते आकडे असतात. टीव्ही रेटिंगचे. म्हणजेच टीव्ही प्रेक्षकसंख्येचे. मग कुणी त्याला टीआरपी म्हणो कुणी बदललेल्या व्यवस्थेतील बार्क रेटिंग म्हणो. पण ते आकडेच जाहिरात उत्पन्नातील वाटा ठरवण्यात सर्वात महत्वाचे ठरत असल्यानं प्रत्येक टीव्ही व्यावसायिकासाठी महत्वाचे असतात. मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याच्या भानगडीनिमित्त टीव्ही रेटिंग पाच मुद्द्यांमधून समजून घेऊया...

तुळशीदास भोईटेंचा व्हिडीओही पाहू शकता... https://youtu.be/nNIfzvYV-fE


मुद्दा -१

टीव्ही रेटिंग

टीव्ही चॅनलना जाहिराती देण्यासाठी त्यांची लोकप्रियता जाहिरातदारांना माहित असणं आवश्यक असते. जाहिरातदारांच्या त्या व्यावसायिक गरजेतून जगभर टीव्ही रेटिंग सिस्टम अस्तित्वात आली. भारतात पूर्वी टॅम या खाजगी कंपनीच्या माध्यमातून रेटिंगचे काम केले जात असे. त्यावेळीही अनेकदा टॅमच्या टीआरपीविषयी आक्षेप घेण्यात येत असत. एनडीटीव्ही समूहाने तर थेट अमेरिकेत खटला दाखल करून टॅम वेगळ्यापद्धतीनं टीआऱपी रेटिंग ठरवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिल म्हणजेच बार्क ही संस्था अस्तित्वात आली. बार्क ही संस्था भारतातील टीव्ही चॅनल्सची संघटना नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशनसाठी क

 सध्या ही संस्थाच भारतात टीव्ही चॅनल्सची प्रेक्षकसंख्या ठरवते.


मुद्दा -२

बार्क कसं काम करते?

बार्क प्रेक्षकांच्या घरातील टीव्ही मीटरवर नोंदवलेली माहिती हंस रिसर्च या वेगळ्या एजेंसीच्या माध्यमातून एकत्र करून तिच्या विश्लेषणानंतर टीव्ही रेटिंग जाहीर करते. त्यामुळेच टीव्ही व्यावसायिकांसाठी गुरुवारचा दिवस एकतर गोल्डन किंवा ब्लॅक थर्सडे असतो. हद्याचे ठोके वाढवणारा असतो. 


मुद्दा -३

टीव्ही रेटिंग कसं ठरतं?

बार्कने २०१४मध्ये २२ हजार घरांमध्ये टीव्ही रेटिंग नोंदवण्यासाठी बार ओ मीटर बसवले. प्रथमच छोटी शहरं, ग्रामीण भागाचा भारतीय टीव्ही रेटिंगमध्ये हिस्सा वाढला. त्यावेळी खरंतर ५० हजारांपर्यंत चार वर्षात मीटर लावण्याची घोषणा झाली होती. मात्र, आजही तेवढ्या घरांपर्यंत बार्क पोहचू शकलेली नाही. आताही फारतर ३० हजारांपर्यंतच मीटर असतील, त्यातील २ हजार अडीच कोटीच्या महामुंबईत आहेत.

टीव्ही प्रेक्षकांच्या घरांची निवड आर्थिक, भौगोलिक, शहरी-ग्रामीण असे सर्व गट लक्षात ठेवून केली जाते. प्रेक्षक कुटुंबाला विश्वासात घेऊन बार्कचा बार ओ मीटर घरातील टीव्हीशी जोडला जातो.

त्या मीटरसाठी वेगळा रिमोट असतो. घरातील सदस्यांना टीव्ही पाहताना रिमोटचा वापर करताना लिंग, वय यानुसार ठरवून दिलेली बटणे दाबूनच टीव्ही पाहणे अपेक्षित असते. 

या मीटरमधील आकडेवारी बार्कसाठी हंसा रिसर्च एजेंसीकडून गोळा केली जाते. त्या आकडेवारीचं बार्कने ठरवलेल्या अल्गोरिदमनुसार विश्लेषण केले जाते. केवळ किती प्रेक्षकांनी पाहिलं यावर नाही तर किती वेळ पाहिलं हेही टीव्ही रेटिंग ठरवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक आहे. दर आठवड्याला गुरुवारी सकाळी बार्क टीव्ही रेटिंग जाहीर करते.









मुद्दा -४

टीव्ही रेटिंग घोटाळा कसा होतो?

आधी टॅम आणि आता बार्कही दावा करते की आम्ही टीव्ही रेटिंग मीटर कोणत्या घरांमध्ये लावलेत ते गोपनीय असते. कुणालाच कळू दिलं जात नाही. पण टॅमच्या काळातही आणि आताही टीव्ही मीटर असलेल्या घरांपर्यंत काही चॅनलनी किंवा त्यांच्यावतीने संपर्क साधून टीव्ही रेटिंग सोयीनुसार ठरवण्याचे आऱोप झालेत. याआधीही मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अशा घोटाळ्याच्या तक्रारी झाल्या होत्या. रेटिंग ठरवणाऱ्या संस्था किंवा त्यांच्यासाठी सांख्यिकी विश्लेषणाचे काम करणाऱ्या संस्थांशी संबधित असल्याचा दावा करणारे किंवा असणारेही काही आडवळनाने टीव्ही चॅनलच्या संपर्कात येत असतात. रेटिंगसाठी सहकार्य करण्यासाठी कन्सल्टंसी पुरवण्याच्या बहाण्याने अथवा समोरची व्यक्ती लोभी असल्याचं लक्षात आलं तर थेट आर्थिक मागणी करतात. व्यवहार ठरला की मीटर असलेल्या घरातील कुटुंबांना आमिष दाखवून सतत एकच चॅनल सुरु ठेवण्यास सांगितले जाते. श्रीमंत, मध्यमवर्गीय कुटुंबं अशी मीटर लावण्यास तयार नसल्याने अनेकदा असे मीटर आर्थिक कमकुवत घरांमध्येच बसवलेली असतात. त्यातील काहींना वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून हे एजंट आपल्याला पाहिजे ते साध्य करतात. काहीवेळा एमएसओ किंवा वितरकांशी अधिक़ृत संगनमत करून सेट टॉप बॉक्स सुरु केल्यावर टीव्हीवर जी पहिली स्क्रिन दिसते तिला लँडिग पेज म्हणतात. तीच ताब्यात घेणय्याची क्लुप्तीही काही चॅनल्स अर्थबळावर लढवतात. त्याबद्दल तक्रारी आल्याने बार्कने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदल  केलेत. 

काही वेळा रेटिंगमध्ये बाह्य प्रभाव पडत असल्याचे डेटा व्हॅलिडेशन क्वालिटी इनिशिएटिव्ह सुरु करून दाखवून दिले होते. या मोहिमेचाच एक भाग म्हणून सेटटॉप बॉक्सवाले टीव्ही सुरु करताच जे प्रथम दिसते त्या लँडिंग पेजच्या प्रभावाला कमी करण्यासाठी काही बदल केलेत. 


मुद्दा -५

उपाय काय – घोटाळा कसा थांबणार ?

टीव्ही रेटिंग ज्या मोजक्या सॅम्पल साइझवर ठरवले जाते तिथेच घोटाळ्याचे मूळ आहे. शेकडो कोटींचा देश, टीव्हीचे रेटिंग ठरवतात ती घरे मात्र काही हजारच! त्यामुळे ३२ हजार कोटींच्या जाहिरात उत्पन्नात मोठा वाटा मिळवण्यासाठी खर्च करणे चॅनलना सोपे जाते. त्यातील काही गैरमार्ग निवडतात. ते रोखायचे असेल तर ठराविक प्रेक्षकांवर अवलंबून बेभरवशाची रेटिंग पद्धत बंद केली जावी. भारतात आता अनालॉग सेटटॉप बॉक्सेस नसतीलच. सरकारनेच ते सक्तीने थांबवलेत. सेटटॉप बॉक्स डिजिटल असल्याने आतील चीपमध्ये काही बदल करून एमएसओ म्हणजे वितरकांच्या कंट्रोल रुममध्ये बार्कने सुरक्षित यंत्रणा उभारली तर केवळ काही घरांचं नाही तर बहुसंख्या टीव्ही प्रेक्षकांच्या घरांमधील खरी निवड कळू शकेल. तसंही लिंग आणि वयोगटाप्रमाणे प्रेक्षक रिमोटचे बटन दाबून बदल नोंदवत असतील ही शक्यता कमीच आहे. अर्थात सर्वच घरे टीव्ही रेटिंग ठरवू लागले की चॅनलना त्यांच्यावर प्रभाव पाडता येण्याची भीती आहेच. पण सध्या मर्यादित संख्येत मुळात वास्तवदर्शी आहेत की नाही तेच कळत नसलेल्या रेटिंगबाबतीत जर घोटाळे होतात, त्या तुलनेत तो धोका तेवढा मोठा नसेल.


हा घोटाळा थांबवायचा असेल तर ती शक्ती तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांच्या हातातील रिमोटमध्ये आहे. टीव्ही सेटटॉप बॉक्सचा रिमोट वापरताना योग्यच चॅनल निवडा. तुमच्या घरी जर टीव्ही रेटिंग मीटर म्हणजे बार्कचे बार ओ मीटर असेल तर कृपया विकले जाऊ नका. मीडिया माफियांना साथ देऊ नका. तुमच्या डोक्यानं रेटिंग मीटरचा रिमोट वापरा. तुम्हीच टीआरपी घोटाळा थांबवू शकता. अन्य कुणीच तसं करणार नाही.

- तुळशीदास भोईटे

संपादक

www.muktpeeth.com

९८३३७९४९६१


पाहा व्हिडीओ आणि यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा

मुक्तपीठ यूट्युब चॅनल


वाचा फेसबूक पेजवर आणि पेज लाइक करा मुक्तपीठ Muktpeeth फेसबूक पेज

https://www.facebook.com/109767937512717/posts/134673098355534/


ट्विटर मुक्तपीठ ट्वीटर, मुक्तपीठ इंस्टाग्रामवर फॉलो करा


लवकरच अधिकृत सुरुवात www.muktpeeth.comमुक्तपीठ


Monday, September 28, 2020

जनहित याचिका म्हणजेच पीआयएल म्हणज नेमके काय ?

जनहित याचिका म्हणजेच पीआयएल म्हणज नेमके काय ? त्या कधी, का, कुठे दाखल केल्या जाऊ शकतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडीओ आहे. 

सर्वाच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या अ‍ॅड. अनिता बाफना यांनी सोप्या शब्दात मराठी माणसांसाठी जनहित याचिका समजवून सांगितल्या आहेत.

भविष्यातही कायदा, आरोग्य, शिक्षण, सरकार आणि इतर विषयातील तज्ज्ञ अशाच प्रकारे सोप्या शब्दात मराठीत त्या त्या विषयांची माहिती देतील.

तुम्हाला एखाद्या विषयावरील व्हिडीओ आवश्यक वाटत असेल तर कृपया मेल करा muktpeeth.com@gmail.com किंवा 7021148070 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप, टेलिग्राम मॅसेज पाठवा.

मुक्तपीठ आपलं माध्यम आहे. आपलं सहकार्य आवश्यक आहे. कृपया हा व्हिडीओ लाइक करा, चॅनल सबस्क्राइब करा. 

www.muktpeeth.com
सर्वांचे विचार, सर्वांचा आवाज

What is Public interest litigation or PIL means. PIL refers to litigation to undertake to secure public interest in India. This is explainer video is for the commoners to understand the meaning of PIL, How, When & Where can fine those.

https://youtu.be/xqEv5zCFBYM

Friday, September 25, 2020

दीपिका - रणवीर आणि एनसीबीच्या कव्हरेजमध्ये तुम्ही महाराष्ट्रात आणखी काय घडलं ते विसरला तर नाही ?

दीपिका - रणवीर आणि एनसीबीच्या कव्हरेजमध्ये तुम्ही महाराष्ट्रात आणखी काय घडलं ते विसरला तर नाही ?
हा व्हिडीओ पाहा आणि लाइकही कराच...


न विसरता सबस्क्राइब करा... #मुक्तपीठ यूट्युब चॅनल. 


तसंच फेसबुक पेजवर संपूर्ण बातमी अवश्य वाचा. 

Sunday, September 13, 2020

लॉकडाऊनमध्ये 'तो' अनाथांसाठी केस कापायला शिकला !



आजच एक पोस्ट वाचली. 

" मी केशकर्तनकार नसूनही मी हे काम लॉकडाऊनमध्ये शिकून घेतलं आहे. गेल्या २वर्षात आपण २७००,२८०० लोकांना ही सेवा दिली आहे.  हे एकट्याचं काम नसून तुमचा सहकार्याची गरज आहे. मी सर्व काम शिकवेन. जो कोणी इच्छूक असेल त्यांनी माझाशी संपर्क करा. 🙏आणि ग्रुप मधील जे कोणी डॉक्टर असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की जर कोणत्या व्यक्तीचा डोक्यामध्ये जखमा किंवा खवले होत असेल तर मला प्रथम उपचार कसे करता येईल याचे मार्गदर्शन करावे."



.

अनाथाश्रम, वृद्धाश्रम वगैरे आश्रमांमध्ये जाऊन समाजसेवा करणारे अनेक आहेत. नाभिक समाजातील नसूनही केशकर्तनकला शिकणारेही हजारो असतील. आता करिअरचा एक चांगला पर्याय झाला आहे. पण या पोस्टमधून मला दिसलं एक वेगळंपण. समाजसेवेसाठी सहकार्याचा वेगळा मार्ग शोधण्याची धडपड. मी निकेशशी बोललो

        निकेत सखाराम व्यवहारे. २७ वर्षांचा तरुण. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बोर्डात नोकरी करतो. तिथं आठ तास नोकरी करुन उरलेल्या वेळेत समाजासाठी धडपड. वडिलांना समाजसेवेची आवड आहे. सखाराम बापू व्यवहारे त्यांचं नाव. किराणा मालाचे दुकान आहे. त्यातून वेळ काढून ते समाजसेवा करत असतात. निकेत ते लहानपणापासून पाहत आला. तेव्हापासून तो अनाथ, दिव्यांग, दृष्टीहिनांच्या निवारा केंद्रात जात असे. 

त्याचा मूळ राजस्थानमधील मित्र सुनील सैनी यांचं उल्हासनगरात सलून आहे. आदल्या दिवशी निकेत म्हसकळच्या पारस बालाश्रमात गेला होता. तिथं मुलांचे केस वाढलेले होते. चौकशी केली तर कळलं की त्यांना गाडी मागवून केस कापण्यासाठी जावं लागतं. गाडी आली की ते जाणार आहेत. निकेतने सलूनमध्ये केस कापायला आलेले मुलं पाहिले. त्यांना पाहून तो सुनीलला म्हणालो आपण आश्रमात जाऊन केस कापले पाहिजेत. सुनील लगेच तयार झाला. गेले दीड वर्षे निकेत सुनील सैनी आणि आणखी एका सलूनवाल्याला घेऊन अनाथाश्रम, अंध आश्रम, बेघर निवारा केंद्र, वृद्धाश्रम अशा ठिकाणी सेवा देतात. त्यातही टिटवाळामधीस म्हसकळचा पारस बालाश्रम, उल्हासनगर मनपाचे बेघर निवारा केंद्रांमध्ये ते दर ४५ दिवसांनी जातात. कर्जतच्या सावित्रीफुले निवारा केंद्रातही ते सेवा करतात. 

लॉकडाऊनमध्ये सुनील सैनी राजस्थानला परतला. अडचण झाली. आता आश्रमांमधील प्रवेश सुरु होईल. मुलांचे, वृद्धांचे, बेघरांचे केस कापायचे कसे ? निकेतला प्रश्न पडला. त्यानेच मार्गही शोधला. ओळखीच्या सलूनवाल्या मित्रांकडून त्याने केस कापण्याचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. आता परवानगी मिळताच तो स्वत: केस कापणार आहे. 



त्याला विचारलं, हे काम का शिकलास? निकेत म्हणाला, मला समाजसेवेची नशा आहे. ४५ दिवस झाले की मला वाटते आश्रमातील मुलांचे, लोकांचे केस वाढले असतील. मी तिथं जातोच जातो. आता लॉकडाऊनमुळे शक्य झालं नाही. आता सुनील नसेल तर काम अडू नये म्हणून स्वत: शिकलो. अनेक मुलांच्या डोक्यात खवले असतात. वृद्धांच्या डोक्यात रिकामपणात खाजवून झालेल्या जखमा असतात, त्यांच्यावर उपचार कसे करावं ते कळत नाही. हायड्रोजन लावतो. पण इतर उपचार कळावेत, म्हणून डॉक्टरांना आवाहन करणारी पोस्ट केली."

निकेतच्या कामाला समाजातूनही सहकार्य लाभतं. त्याचा सलूनवाला मित्र सुनील सैनी, सहकारी जसे सरसावले तसेच इतरही आहेत. उल्हासनगर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत यांनी केस कापण्याचे किट घेऊन दिलं. 


        मधल्या काळात निकेत एनडीआरएफच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाला. पूर परिस्थिती, भूकंप, चक्रीवादळातील मदतकार्याचं प्रशिक्षण घेतलं. नेहरू युवा केंद्राच्या सहकार्यानं एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं.

समाजसेवा हजारो करतात. पण निकेश समाजसेवेची आणखी एक संधी शोधून काढतो. परत ते काम बंद पडू नये म्हणून स्वत:च शिकून घेतो. पुन्हा त्यात आरोग्य समस्या आढल्यानं त्यावरील उपायांसाठीही प्रयत्न करतो. सर्वच मला वेगळं वाटलं. 

डॉक्टरांना निकेतला मार्गदर्शन करायचे असेल, औषधं सुचवायची असेल, कुणाला औषधं द्यायची असतील तर त्याच्या आवाहनला नक्की प्रतिसाद द्या. 

- तुळशीदास भोईटे

९८३३७९४९६१


Thursday, September 10, 2020

#कोरोनावास्तव महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या दहा लाखांवर जाण्याची शक्यता - पुणे जिल्हा महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरण्याची पाच कारणं

गुरुवारी महाराष्ट्रात २३ हजार ४४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना रुग्णाांची एकूण संख्या ९ लाख ९० हजार ७९५ झाली आहे. सध्या वाढीचा रोजचा दर हा २० हजारांच्यावर आहे, त्यामुळे शुक्रवारी राज्यातील कोरोना रुग्ण संख्या दहा लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी १४ हजार २५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख ७१५ वर पोहचली. 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.७२ % एवढे झाले
आहे.


आज पुणे जिल्ह्यातील कोरोना वास्तवाचा आढावा घेऊया.
हा जिल्हा महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरलाय. एकीकडे सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांनी कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आणल्याचा दावा केला जात असतानाच पुण्यात मात्र कोरोना संसर्ग वाढताच आहे.
सक्रिय रुग्ण संख्येच्या बाबतीतच नाही तर एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीतही पुणे जिल्हा नंबर १ ला आहे.

पुणे महाराष्ट्राची कोरोना राजधानी का ठरला, याचा शोध घेतला तर पुढील कारणं समोर येतात. 

1. योग्य समन्वय नाही 
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेवर आहे. राज्यसरकार, जिल्हा परिषद आणि या दोन मनपा यांचा परस्पर समन्वय योग्य नसल्याचं सांगितलं जातं.

2. हाताळणीत चूक
ससून रुग्णालय सर्वात मोठं. मात्र त्या रुग्णालयात कोरोनाचं गांभीर्य समजून योग्य यंत्रणा उभीच करण्यात आली नाही. कालांतराने अधीक्षकांवर बदलीचा बडगा उगारला गेला. इतर मनपा आणि सरकारी यंत्रणाही खरंतर म्हणाव्या तशा सक्रिय नव्हत्या. संकट ओळखून तयारी झाली पाहिजे होती ती केली गेली नाही. मुंबईच्या जंबो फॅसिलिटींचा अभ्यास करुन त्वरित पावलं उचलण्याऐवजी दिरंगाई झाली. आताही ८०० खाटांचा दावा असलेल्या कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्षात ३००च खाटा असल्याचा आरोप डॅशबोर्डावरील माहितीच्या आधारे आम आदमी पक्षाने केला आहे.

3. लॉकडाऊनबद्दल धरसोड धोरण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पालक मंत्री असेलेला हा जिल्हा. मात्र राज्यात कडक लॉकडाऊन होते तेव्हाच पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनच्या बाबतीत धरसोड धोरण होतं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईप्रमाणे टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन उठवण्यास सांगितला होता, पण व्यापाऱ्यांच्या दबावामुळे लवकर उठवावा लागल्याची कबुली उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच दिली असली तरी त्यामुळे जे व्हायचे ते नुकसान होऊनच गेले.
मात्र, केवळ सरकारी यंत्रणा, मनपा प्रशासन यांना दोष देता येणार नाही निष्काळजीपणा घडलाय तो पुणेकरांकडूनही! गर्दीत वावरणं आणि मास्क न घालणं सर्रास घडलं, घडतंय, अशा तक्रारी आहेत.

4. डॉक्टरांची कमतरता
पुणे जिल्ह्यात त्यातही पुणे शहरात आरोग्य सुविधांची कमतरता नाही. त्यात पुन्हा खास  कोरोनासाठी वेगळ्या सुविधाही उभारण्यात आल्या. मात्र, त्यांची हाताळणी करण्यासाठी, उपचार करण्यासाठी योग्य प्रमाणात डॉक्टरच नाहीत. 
पुणे महापालिकेत फक्त २१०च डॉक्टरांची मंजूर पदं आहेत, त्यातही सध्या १५६ सेवेत आहेत. तर पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण डॉक्टर 398, तर जिल्हा परिषद सेवेत एकूण डॉक्टर 186च आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जवळपास 3 हजार 500 डॉक्टर आहेत. लोकसंख्येचा आणि इतर आजारांचा विचार करता डॉक्टरांची संख्या कमी आहे.

5. सुसज्ज रुग्णवाहिका मोजक्याच
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूमुळे सुसज्ज रुग्णवाहिकांची कमतरता उघड झाली. तसं पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यात किमान ६०० रुग्णवाहिका असाव्यात. पण त्यातील खूपच कमी अगदी मोजक्याच कोरोना अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक अशा सुसज्ज आहेत.

Wednesday, September 9, 2020

लाखोंची कोथिंबीर विकणाऱ्या शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना सल्ला, "कष्टासाठी हात चालवता, तसं डोकंही चालवा!"

"सारी समर्थांची...माझ्या सदगुरुंची कृपा !"
विनायकराव अगदी नम्रतेनं सांगत होते. 
विनायकराव हेमाडे. तेच शेतकरी...ज्यांनी शेतीत लाखोंची कोथिंबीर पिकवली. विकली. ज्यांच्याबद्दलच्या पोस्ट गेले काही दिवस समाज माध्यमांमध्ये वायरल आहेत. आपल्या मातीतील अशा अस्सल नायकांपैकीच एक म्हणजे विनायकराव हेमाडे. 

विनायकरावांविषयी पोस्ट वाचली आणि ठरवलेलं या माणसाशी बोलायचं. आपले बहुतांश शेतकरी असतात तसा साधा माणूस. मोकळा ढाकळा. हातचं राखून न बोलणारा. मी फोन केला तेव्हा ते नांदूरशिंगोटे गावातील शेतातच होते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हे गाव. 


विनायकराव हेमाडे चर्चेत आले ते कोथिंबीर विकून १५ लाखाचं उत्पन्न मिळवल्यामुळे. त्यांनी बजावलेली कामगिरी सर्वांना खूश करणारी. त्यांनी दी़ड एकरातील कोथिंबीर आधी अडीच लाखात विकली. त्यानंतर चार एकरातील १२ लाख ५१ हजारांना. परिसरातील व्यापारी शिवाजी दराडे यांनी घेतली. त्यांच्या या कर्तृत्वगाथेमुळे ते व्हायरल चर्चेचा विषय ठरले. कौतुकाचे मानकरी. मात्र, आता जरी कौतुक सुरु असलं तरी विनायकरावांचे पाय शेतातल्या मातीतच रोवलेले आहेत. ते शांतपणे मला बोलले, "गेल्या वर्षीच फटका खाल्ला होता. कोथंबिरीतच. पावसानं नासाडी केल्यानं सर्व गमावलं होतं. पण तरीही व्यवस्थित विचार केला आणि यावेळी कोथिंबीरच घेतली."

एवढा विचार करूनच निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्याचं जीवन जाणून घ्यावं असंच. विनायकराव सुशिक्षित पदवीधर. बीएची पदवी घेतली. पण मातीविषयी आवड. ठरवलं शेतातच करिअर करायचं. हाती जमीन कोरडवाहू. मग शांतपणे एक एक पाऊल उचललं. २० वर्षांपासून गाई घेण्यास सुरुवात केली. एक गाय, मग दुसरी करत करत वीसपर्यंत पोहचले. त्यांच्या गावात अनेकदा पाण्याची टंचाई. काही वेळा दुष्काळात तर पाणीही नव्हते. टँकरने पाणी मिळायचे. त्यातून काही पाणी ते गाईंसाठी राखून ठेवायचे. कितीही महाग झाला तरी चारा विकत आणायचे. काही वेळा तर दूध विक्रीतून आलेले सर्व पैसे जनावरांवरच खर्च व्हायचे. पण मागे हटले नाहीत.  दुधाचे पैसे जनावरांना द्यायचे.
चांगल्या वर्षी दूधाचे पैसे उरायचे. त्यातून त्यांनी शेतासाठी बोअर घेणं सुरु केलं. असं करता करता शेताचा पसारा वाढू लागला. नुकसानही व्हायचं. पण हिंमत हरले नाहीत. सातत्य ठेवले. मेहनत सुरु ठेवली. गेल्या वर्षी पाऊस जास्त झाला. कोथिंबीर हातची गेली. विनयाकरावांनी मनाला समजवलं. पुन्हा मिळवू. 

या वर्षी लॉकडाऊन सुरु झालं. त्यांनी अंदाज घेतला. कोंथबिर चालेल. प्रगतीशील शेतकरी विष्णू दराडे, कांदा व्यापारी सुदाम कारभारी शेळके यांचं मार्गदर्शन घेतलं. ठरवलं कोथिंबीर जास्त घ्यायची. ते गंमतीनं म्हणाले, "गावातील बियाणं विक्रेते आनंद घुले जास्त बियाणं घेतलं. त्यांना संशय आला. आपल्याकडून जास्त घेऊन कुणाला महागात विकतात की काय? शेवटी समजवलं, तेव्हा त्यांना पटलं"  
विनायकरावांनी केवळ ठरवलं आणि फायदा झाला असं नाही. ते शेतातच गांडुळ खत, शेण खत बनवतात. त्याचा वापर योग्य प्रकारे केला. चांगलं फळ मिळालं. साडे पाच एकरात पंधरा लाखाचं उत्पन्न मिळालं. 
खूप साधा माणूस. मला म्हणाले, "अहो मुलगा प्रचित दहावीला आहे. त्याला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल पाहिजे होता. आता देईन." त्यांची लेक साक्षीही शिकतेय. पत्नी लता घर सांभाळतानाच शेत-गाईंवर मायेनं लक्ष ठेवतात. शेतकऱ्यांसाठी ते विस्तारित कुटुंबच. 
आता विनायकरावांच अवघ्या महाराष्ट्रातून कौतुक होतंय. पण संघर्षाच्या काळात त्यांना कमालीचे कष्ट घ्यावे लागले. ते म्हणतात, "मला शेतीचा छंद आहे. पदवी घेऊनही त्यामुळे शेतातच रमलो."
 ते मुलांना सांगतात, "जास्तीत जास्त शिक्षण घ्या, नोकरी मिळो न मिळो पण शिक्षण घ्या. नंतर दुधाचा व्यवसाय करुया. वाढवुया. शेतीत करिअर करता येईल."

त्यांना विचारलं. थोडं शिकलं की लोकांना मातीत राबायची लाज वाटते, मग तुम्ही शेतीत कसे? ते म्हणाले, "मला नाही वाटत. उलट एकच स्वप्न आहे. मातीचं सोनं करायचं." आमचं बोलणं संपण्यापूर्वी त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिलेला सल्ला मोलाचा. ते म्हणाले, "आपण एखाद्याला एकदा कसला तरी फायदा झाला. किंवा एखाद्या पीकाला जास्त भाव आला तर हुरळतो. तसं नको व्हायला. माहिती घ्या. अंदाज घ्या. बाजारात काय चाललंय. काय स्थिती आहे. त्यानंतर योग्य मार्गदर्शन घेऊनच पीक ठरवा. आता जे चाललं ते नंतर चालेलच असं नाही. कष्टासाठी हात चालवता, तसं डोकंही चालवा !"

- तुळशीदास भोईटे
9833794961