Wednesday, September 2, 2020

पांडुरंगचा बळी घेणारी 'ती' पाच कारणं !

 पांडुरंग रायकर हा सिस्टमचा बळी. व्यवस्थेचा बळी. आज अनेकांकडून ऐकलं. पण मला वाटतं पांडुरंगचा बळी नेमका का गेला याची पाच कारणं आहेत. त्यासाठी काही प्रमाणात तरी आपणही सारे जबाबदार आहोत.

 मी एक सामान्य पत्रकार. सध्या कोणत्याही प्रस्थापित माध्यमांसोबत नाही. त्यामुळेच आज खूप आतून दाटून आलं त्यामुळे समाजमाध्यमांच्या मुक्तपीठावर व्यक्त होतोय. 

 पांडुरंग रायकर. वय वर्षे ४२. माझा दोन चॅनलमधील तरुण सहकारी. सकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला. हे वय नव्हतंच जायचं. खूप करायचं होतं त्याला. खूप काही. कधीही न चिडणारा. शांतपणे काम करत राहणारा. कुणी त्रास दिला तरी तक्रारही न करणारा. वेगळाच होता तो. आज सकाळी तो गेल्यावर पुण्यातील पत्रकारांना अश्रू आवरत नव्हते त्याचं कारणचं पांडुरंगचा स्वभाव. आपुलकीचं वागणं बोलणं. त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. कारण अनेक जवळच्या मित्रांनी, मोठ्या माणसांनी त्याच्याविषयी भरभरून बोलून झालंय. त्यातील काही तर असेही असावेत की आज त्याच्या मृत्यूनंतरच ते बोलते झाले असावे, काल जेव्हा पुण्यातील पत्रकार पांडुरंगला वाचवण्यासाठी झगडत होते तेव्हा मात्र ते कुठेच नसतील. तेव्हा कदाचित पांडुरंग नावाचा एक पत्रकार त्यांच्या दृष्टीनं तेवढा महत्वाचाही नसावा. त्यामुळेच त्याच्या पुढे जात असं पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न आवश्यक!

 आपला एक पांडुरंग गेला, आणखी कुणाचा पांडुरंग होऊ नये. त्यासाठीच पांडुरंगचा बळी घेणारी कारणं तपासली पाहिजेत. 

कारण -१

 पुण्यासारख्या महानगरात कोरोना अत्यवस्थ रुग्णाला एका कोरोना उपचार केंद्रातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध नसणे. त्याचबरोबर कोरोना जंबो फॅसिलिटीच्या नावाखाली उभारली गेलेली मोठी केंद्रं. उद्घाटन झोकात. मिरवतात नेते. असतं काय? जर पुढील उपचाराची योग्य सोय नसेल, कोणत्या वॉर्डमध्ये, कोणत्या बेडवर कोणता रुग्ण आहे, याची धड नोंद नसेल, जर आपत्कालीन स्थिती उद्भवली तर तर इतरत्र हलवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिकाही नसतील  तर या तथाकथित जंबो फॅसलिटी म्हणजे पोकळ सांगाडेच! 
 बालेवाडीच्याआधी त्याला हिंजवडी कोव्हिड सेंटरला नेण्यात आलं. तिथं हाय प्रेशर ऑक्सिजनच नव्हते. छातीत सूज असल्यानं फिजिशियननं इंजेक्शन दिलं. 
 या पहिल्याच कारणावर आज सर्व प्रस्थापित माध्यमांचा भर राहिला. पण मुळात पांडुरंग पॉझिटिव्ह असतानाही अहमदनगरहून पुण्यात का यावं लागलं तेही महत्वाचं.

कारण -२

 पांडुरंग त्याच्या गावाकडे कोपरगावला गेला होता. तिथंही त्रास होतच असल्यानं तो कोपरगावच्या रुग्णालयात गेला. तिथं तपासणीसाठी अँटीजन किटच नव्हतं. कसंबसं ते काही तासांनी मिळालं. टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र, रुग्णालयानं दाखल करून घेण्यासाठी ४० हजार आगाऊ रक्कम मागितली. त्याच्या पत्नीकडे दहा हजारच होते. अखेर त्याची पत्नी पांडुरंगला घेऊन पुण्याकडे निघाली. 
 कोपरगावातील रुग्णालयासारखी ती रुग्णालयं जी कंपनीनं दिलेलं कॅशलेस मेडिक्लेमचं कार्ड असतानाही तब्बल ४० हजाराची आगाऊ रक्कम मागतात. हा अनुभव सध्या हजारो घेतात. एकीकडे जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा करणारे आरोग्यरक्षक डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि दुसरीकडे हे धंदेवाईक ! पांडुरंगचा बळी जाण्यासाठी हेही जबाबदार !!

कारण -३

 तिसरं कारण खूपच महत्वाचं वाटतं. प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर संबंधित व्यक्तीला योग्य सल्ला न मिळणं. योग्य उपचार न मिळणं. आजवर हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी सेवेतील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण काहीवेळा ज्या डॉक्टरांकडे जातात त्यांनी खूप दक्षता घेतली पाहिजे. जर वेळेत कोरोना चाचणीच्या जोडीनं संशय येत असेल तर छातीचे सिटी स्कॅन केले पाहिजे. अनेकदा सुरुवातीला कळतही नाही. पांडुरंगला ताप आल्यानंतर सात दिवसांनी एक चाचणी झाली. ती निगेटिव्ह आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो श्रीरामपूरला गेला. तिथं अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली. हे सारंच विचित्र वाटतंय. चौकशी गरजेची. 
 नेमके हे महत्वाचे दहा दिवस त्याचा संसर्ग जास्त वाढवणारे ठरल्याची शक्यता, वन रुपी क्लिनिकच्या डॉ. राहुल घुले यांनीही व्यक्त केली. ज्याअर्थी ऑक्सिजन पातळी ७८च्याही खाली गेली त्याचा अर्थ संसर्गानं फुप्फुसाची हानी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त झाली असण्याची शक्यता होती, असंही ते म्हणाले. त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक रुग्णाकडे जनरल प्रॅक्टिसनरनी संशयानंच पाहावं. तात्पुरती औषधं देऊ नये. त्यामुळे तापासारखं लक्षण जाईल, पण कोरोना संसर्ग मात्र वाढेल, असे ते म्हणाले. 
 सरकारने जनरल प्रॅक्टिसनरसाठी असे रुग्ण आल्याची माहिती त्वरित स्थानिक आरोग्य यंत्रणेला कळवणं बंधनकारक असावं. जर नसेल तर त्वरित तसं केलं जावं, अशी मागणीही डॉ. घुले यांनी केली. 
 कोरोना उपचाराच्या दृष्टीनं सुरुवातीचे हे दिवस गोल्डन अवर, पांडुरंगच्या बाबतीत तिथं अक्षम्य दिरंगाई झाली, असं दिसतंय. 

कारण -४

 पांडुरंग रायकरला कोरोना झाला तो धोकादायक परिस्थितीत फिरल्यामुळे हे नाकारताच येणार नाही. टीव्ही 9 असो किंवा अन्य कोणतंही चॅनल आपल्या कर्मचाऱ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्याचे प्रयत्न कंपनीचं धोरण म्हणून असतातच. प्रसंगी नुकसान सहन करुनही. मात्र, तरीही पत्रकारांना व्यावसायिक जबाबदारीमुळे धोकादायक स्थितीत फिरावयास लागणं, हे अपरिहार्यच असतं. कोणी कितीही नाकारलं तरी दर गुरुवारी येणारे बार्कचे आकडे हे टीव्ही पत्रकारितेसाठी साप्ताहिक तणावाचं कारण असतंच असतं. अपरिहार्य असं. त्यामुळेच खरं तर कोरोना संकटकाळात बार्कची रेटिंग सिस्टम कोरोना संकट काळापुरती स्थगित करणं आवश्यक होतं. 
अनेकांना बाहेरून वाटतं चॅनलना काय, कोण विचारतंय? मात्र एनबीएफसारख्या संघटनांकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारी, अगदी कुसळाचंही मुसळ करणाऱ्याही असतात. त्यांना पुराव्यासह उत्तरं देणं सोपं नसतं. त्याच संघटनांना रेटिंगबाबतीत स्थगितीचा निर्णय घेणं आवश्यक वाटलं नाही.

 स्पर्धा नसती तर ताणही कमी असता. तशी मागणीही झाली. पण दुर्लक्ष केलं गेलं. चॅनलमधील पत्रकारांना कामाशिवाय पर्याय नव्हता. थोडक्यात चॅनलकडून कितीही काळजी घेतली गेली तरी धोकादायक स्थितीत काम करणं अपरिहार्यच होतं. 

कारण - ५

मला स्वत:ला पांडुरंग रायकर सारख्या तरुण पत्रकाराचा बळी जाण्यासाठी राजकारण हेही सर्वात महत्वाचं कारण वाटतं. खटकेल, खुपेल अनेकांना पण हे सत्यच आहे. 

टीव्हीच्या रेटिंगप्रमाणेच कोरोना संकटकाळात राजकारणही थांबणं गरजेचं होतं. पण ज्या देशात राजकारण हेच अनेकांचा फुलटाइम उद्योग असतो तिथं तसं घडणं अशक्यच होतं. 
जबाबदार राजकीय नेत्यांनी बेजबाबदारीनं गर्दी जमवत आंदोलनं करत धोकादायक परिस्थिती निर्माण करणं कधीच समर्थनीय मानलं जाऊ शकत नाही पण तसं सातत्यानं घडलं. घडतंय. अपवाद कुणाचाच नाही. कुणी आंदोलनांसाठी तर कुणी राजकीय कार्यक्रमांसाठी गर्दी जमवण्याचा बेजबाबदारपणा केलाच केला. त्यामुळे पत्रकारांनाही अशा धोकादायक गर्दीच्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्याशिवाय पर्याय नव्हता. यूट्युब, फेसबुक लाइव्हचा पर्याय असतानाही पत्रकार परिषदा घेण्याची हौसही अशीच धोकादायक. पण भागवली गेली. भागवली जात आहे.

दुसरीकडे कोरोना आरोग्य सुविधा नाहीत म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे आपल्या विभागात होऊ घातलेल्या कोरोना सुविधा केंद्रांना विरोध करण्याचेही राजकीय उद्योग बरेच झाले. 

माध्यमांनी संयम बाळगला. कोरोना जागतिक आपत्ती असल्याची जाण ठेवत गल्लीतील ठाकरे सरकार असो वा दिल्लीतील मोदी सरकार दोष देणं टाळलं. तर माध्यमांनाही लक्ष्य करून बदनामीचे प्रयत्न सुरुच आहेत. 

सकाळपासून पांडुरंग रायकरचा बळी कुणी घेतला यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवताना दिसतात तेव्हा मनाला वेदना होतात. किमान तरुण पत्रकाराच्या मृत्यूवर तरी राजकारण नसावं. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन राजकीय पक्षांनी पांडुरंगच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाखांची मदत दिली. किमान एक छोटा दिलासा मिळाला. तेवढ्यानं जीवन निघणार नाही. अजून खूप करावं लागेल. पण काही तरी झालं.

गेलेला पांडुरंग परत येणार नाही. पण किमान आता आणखी एखादा पांडुरंग नको. त्यासाठीच आपण सर्वांनी गंभीरतेनं ही पाच कारणं म्हणजे आपणही सोसलेले, दुर्लक्षानं पोसलेले आपल्याही सर्वांचे दोष असल्याचं समजून घेणं आवश्यक आहे.

सकाळपासून सांगितलं जातंय. पांडुरंगचा व्यवस्थेनं बळी घेतला. मग ही व्यवस्था...म्हणजे सिस्टम...असते काय...ती काही फक्त राजकारणी, प्रशासन मिळून तयार होत नाही, सिस्टममध्ये आपणही असतोच असतो. जेव्हा सिस्टमने पांडुरंगचा बळी घेतला म्हणतो तेव्हा तो आपणही घेतलेला आहे. पांडुरंगचा बळी आपणही घेतला असं मी म्हणतो ते त्यामुळेच. जर सिस्टम बदलायची असेल तर आपणच आधी बदलावं लागेल.

- तुळशीदास भोईटे

Monday, August 17, 2020

सुनील इरावारांचा गळफास...राज ठाकरेंना अस्वस्थ करणारा...पण प्रत्येकानं विचार करावा असा !

सुनील इरावार. नांदेडचे मनसे पदाधिकारी. त्यांनी रविवारी गळफास. स्वत:ला संपवलं. सुनील किनवटमधील. किनवट तसं नांदेडच्या कोपऱ्यातील. महाराष्ट्राच्या तर आणखीच कोपऱ्यात. जास्त चर्चा झाली नाही. पण त्यांचं पत्र वाचलं आणि त्यातील एक वाक्य मनाला स्पर्शून गेलं. दाहक वास्तव मांडणारं असं ते वाक्य. 

आत्महत्येच सुनीलनं सांगितलेलं कारण. त्यांनी आपल्या अखेरच्या पत्रात आई-वडिलांची माफी मागतानाच आपल्या अध्यक्षांसाठीही लिहिलं..."राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात यावर राजकारण केल जातं.आणि या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत. अखेरचा जय महाराष्ट्र. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मी माझं आयुष्य स्वखुशीने संपवत आहे. जय महाराष्ट्र. जय मनसे. जय राजसाहेब"
सुनील इरावारांनी स्वत:चं जीवन ऐन तारूण्यात संपण्यासाठी दिलेलं कारण वेगळंच. आजवर तसं उघडपणे कुणी न मांडलेलं. पण आहे ते महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील वास्तव. त्यामुळेच या प्रकरणाची जास्त माहिती घेण्यासाठी प्रयत्न केले. किनवटलाच शुभम शिंदे हा तरुण पत्रकार राहतो. त्याच्याशी बोललो. त्याच्याकडून सुनीलच्या अमोल जाधव या मित्राचा मोबाइल नंबर मिळाला. अमोलला कॉल लावताच तो भडाभडा बोलू लागला. आणि एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेच्या बळावर मनानं किती मोठा असतो ते अनुभवता आलं.
अमोल म्हणाला, "सुनील इरावार आमचा मित्र. मी काही मनसेचा कार्यकर्ता नाही. पण आमचा सुनील गेली दहा वर्षे तरी राजसाहेबांचा फॅन. त्यामुळे तो मनसेचं काम करु लागला. आम्हीही त्याला साथ देऊ लागला. राजकारणात असला तरी सुनील खूपच गरीब घरातील. त्याचे वडिल मेल एक्स्प्रेसमध्ये काही कामे करून कमाई करायचे. लॉकडाऊनने ती कामेही थांबली. त्याची आई किनवटच्याच एका वसतीगृहात भांडी घासायचे काम करते. कष्ट करणारे कुटुंब.
 सुनीलही तसाच. मात्र, तो आपलं कुटुंब, स्वत: यापेक्षा समाजाचाच जास्त विचार करायचा. त्याने कधीच पैशाच विचार केला नाही. राजसाहेबांचा कडवट चाहता. वाट्टेल ते करण्यास तयार असणारा. केवळ त्यांना भेटायचं म्हणून दोन वेळा मुंबईला गेला. एकदा मनसेचं निवडणूक चिन्ह असणारा इंजिन भेट दिलं. तेही असं तसं नाही. किनवटला सागाची झाडे खूप. साहेबांनी द्यायचं म्हणून त्यानं सागाचं बनवून घेतलं. ते दिलं. गर्दीमुळे थेट साहेबांच्या हाती देता आलं नाही. त्याची रुखरुख राहिली. पण टीव्हीवर साहेब दिसलं की दिसणारं इंजिन आपणच दिलेलं असं तो अभिमानानं सांगायचा."
अमोल सांगत होता. मला स्वत:ला असे कार्यकर्ते खूप भारी वाटतात. मोठे वाटतात. नेत्यांपेक्षाही. त्यामुळेच खरंतर सुनीलविषयी माहिती मिळवत होतो. अमोल सांगू लागला, "सुनील खूप काम करायचा. त्याला इतर पक्षांमध्येही बोलवायचे. पण तो निक्षून सांगायचा, जे काही आहे ते राजसाहेबांसाठीच करेन. सुनील मनसेचा किनवट शहर अध्य़क्ष होता. पण खूप प्रामाणिक. पक्षाशी आणि लोकांशीही. खूप कामं करायचा. अडीनडीला धावायचा. खिशात काही नसताना काम करत राहायचा."
अमोलने पुढे सुनीलच्या नैराश्याचं कारण मांडलं, "किनवटमध्ये दोन समाजांची लोकसंख्या जास्त. एसटी आणि बंजारा. मतांच्या राजकारणात सुनिल होता ती मसनजोगी जात तशी काहीच महत्व नसलेली. त्यामुळे सुनीलची निराशा वाढत गेली. त्यातच आर्थिक स्थितीनं तो अधिकच ढासळला." 
अमोलनं सांगितलेलं आत्महत्येचं कारण सुनीलनं त्यालाही सांगतिलं नसावं. सुनीलने ते आत्महत्येच्या पत्रात लिहिल्यानं उघड झालं. आर्थिक तंगी ठाऊक होती. पण ती आताची नाही. कदाचित लॉकडाऊननं सर्वच आटवलं असावं. त्यात मग जातीय समीकरणांच्या राजकारणात आपला निभावच लागणार नाही, ही भावना अधिकच तीव्र झाली असावी. त्यातूनच रविवारी पहाटे त्यानं गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. 
खरंतर जातीय समीकरण हे विदारक वास्तव. मात्र, तसं असल्यानं काहीच करता येत  नाही असं नाही. अनेक राखीव मतदारसंघांमध्ये ज्यांच्यासाठी जागा राखीव असते ते समाज सोडून इतर समाजाचे कार्यकर्ते नेते काम करत राहतात. किमान पदांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तसंच ओपन मतदारसंघांमध्ये इतर कमी संख्या असणाऱ्या जातींच्या बाबतीत घडतं. त्यांना इतर काही जागा राखीव असल्यानं त्यांनी ओपनकडे पाहूच नये असाही एक दृष्टिकोन आढळतो. पण तिथंही ते कार्यकर्ते-नेते थांबत नाहीत. काम करत राहतात. 

काही ठिकाणी तर समाज नसला तरी कामाच्या, पक्षाच्या बळावर चंद्रकांत खैरेंसारखे नेते अनेक वर्ष निवडून येत राहतात. त्यांच्या बुरुड समाजाची घरं मोजलीत तर काही टक्केही नसतील. तसंच इतरही काही लोकप्रतिनिधी असतात. अर्थात ते अपवादच. पण सुनिलला हे समजवणारं कुणी नसावं. तो आपल्या नेत्यांशी बोललाही नसावा. त्यात आर्थिक तंगीची झळ मनातील नैराश्य अधिकच दाट करणारी ठरली असावी. त्यातूनच त्याने स्वत:ला संपवलं. पण सुनील ईरावारांना हे कुणी समजवलंच नसावं.
हे लिहून संपवतानाच राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली. "अरे बाबांनो जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण बदलण्यासाठी पक्ष स्थापन केला. जात आणि पैसा या गोष्टीवर मला माझ्या पक्षाचं राजकारण करायचे नाही. त्यासाठी मी माझे तत्व सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल,” असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष असे आहेत जे जातीय आधारावर राजकारण करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनाला किती लागलं असावं ते समजू शकतो. पण एक मात्र नक्की. थेट पक्षाचे सर्वोच्च नेते नाही. पण किमान इतर जिल्हा-संपर्क नेत्यांनी तरी आपल्या पक्षाच्या अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवला पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. राजकारण म्हटलं की अर्थकारणच असं नसतं. मी शेकडो तरी अशा कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांना ओळखतो जे घरचं खावून लष्कराच्या भाकऱ्या भाजतात. काही तर कर्जबाजारी होतात. बर्बाद होतात. आणि असे मनसेतच नाही प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. नेत्यांनी या कार्यकर्त्यांना सभोवतालच्या गर्दीतून वेळ काढत समजून घेण्याची एक व्यवस्था उभारली पाहिजे. पुढच्या फळीतील नेत्यांची अशी व्यवस्था. समर्पित कार्यकर्त्यांना वेळ देणारी. या व्यवस्थेनं अशांना आधार दिला पाहिजे. शक्य तसा पैशाचाही, किमान मानसिक तरी. समजवलं पाहिजे, संपत नसतं काहीच. नेहमीच असते संधी. प्रतिकुलतेतही.  
सुनीलचा भाऊ अनिलशी राज ठाकरे बोलले. तो संवाद ऐकला, राज ठाकरेंनी विचारलं, "अनिल, राज ठाकरे बोलतो, काय झालं? असं का केलं?" अनिल म्हणाला, "वाघ गेला साहेब तुमचा वाघ गेला. अचानक काय टेन्शन होतं. गेला साहेब. खूप जीव लावत होता हो साहेब. तुमच्याबद्दल कुणी काही पोस्ट केली तर खूप भांडत होता. सांगायचा खूप भाग्यवान मी, साहेबांना अशी तशी माणसं भेटत नाही. मी भेटलो
अशा वेळी नेत्यांचं दु:खही वेगळंच. राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं तर...“मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्य़ावर येऊ नये." अशी वेळ त्यांच्यावरच काय कुणावरही येवू नये. आणखी कोणत्याही सुनीलमधील महाराष्ट्राचं भविष्य असं अकाली करपू नये. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते नेत्यांनाच. तसं घडलं तर बिघडणं नक्कीच थांबेल.

- तुळशीदास भोईटे
मोबाइल - 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite

Tuesday, August 11, 2020

"मौत तूने मुझको जमींदार कर दिया"


राहत इंदोरी...शायरीच्या दुनियेतील सदाबहार सदाबंडखोर कलाकार. शायरीतील हळूवारपणा जपतानाच अंगार उसळवणारे शब्द म्हणजे राहत इंदोरी. 

आपल्या भावनांना शब्दरुप देत त्यांना आपल्या शैलीत मांडणाऱ्या राहतजींचं जाणं मनाला चटका लावणारं...

त्यांनी मृत्यूलाही कलात्मक धन्यवादच दिले होते....

"दो गज सही मगर ये मेरी मिल्कियत तो है,
ऐ मौत तूने मुझको जमींदार कर दिया"

कसलीही पर्वा न करता सत्तेच्या...प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आवाज बुलंद करणारे राहतजी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यातील सत्तेच्या धुंदीला सहजच ठणकावून गेले...

"जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं, ज़ाती मकान थोड़ी है"

हा माणूस एवढी हिंमत कशी दाखवू शकतो असा प्रश्न ज्यांना पडायचा अशा कणाहीनांनाही त्यांनी विचारलेलं...

"लोग हर मोड़ पे रुक रुक के सँभलते क्यूं हैं
इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यूं हैं"

भेदाभेदाचं राजकारण करुन देशाची एकात्मता धोक्यात आणणाऱ्यांना राहजींनी बजावलेलं...

"सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है"

त्यांच्याकडे भौतिक संपत्ती, सत्तेचा आधार असं फार काही होतं...असं नाही...पण आपल्या हिंमतीबद्दल त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता...

"मैं जानता हूं दुश्मन भी कम नहीं,
लेकिन हमारी तरह हथेली पर जान थोड़ी है"

हिंमत हरायची नाहीच...उलट संकटालाही ठणकावून सांगायचं. राहतजींनी वारंवार ते मांडलं...

"शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम
आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे"

एक शायर. लोकप्रिय. सृजनशीलतेचं शिखरं गाठणारा. लोकांना भावणारा. आणखीही काही तसे असतील. पण राहत इंदोरीच तशी हिंमत दाखवायचे...त्यांच्या हिंमतीचं कारण त्यांच्याच शब्दात...

"बादशाहों से भी फेंके हुए सिक्के न लिए
हम ने ख़ैरात भी माँगी है तो ख़ुद्दारी से"

आज ते गेले...जीवनभर ज्या प्रवृत्तींचा शब्दांची शस्त्रं करून मुकाबला केला त्यांची थोबाडं फोडणारे त्यांचे हे शब्द. का शायराची अंतिम इच्छाच...

"मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना
लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्तान लिख देना"

- तुळशीदास भोईटे
9833794961
@TulsidasBhoite

Thursday, August 6, 2020

मुरलीधर शिंगोटे : शून्यातून शिखर...जबरदस्त न्यूजसेंस !


मुरलीधर शिंगोटेंच्या प्रेरणादायी जीवनकथेत एक भाग खूपच नाट्यमय. अमिताभ शून्यातून पुन्हा शिखरावर झेपावले तसाच. त्यांच्याकडे मुंबईतील तेव्हा प्रचंड खपणाऱ्या नवाकाळची एजेंसी होती. कालनिर्णय प्रकाशनाच्या साळगावकरांनी अचानक दैनिक प्रकाशनाचा निर्णय घेतला. दैनिक वर्तमान नाव नक्की झालं. मराठीतील बहुधा पहिलं बहुरंगी दैनिक. वितरक म्हणून चांगला खप असलेल्या नवाकाळच्या शिंगोटेंनाच गळ घालण्यात आली. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी वर्तमानचं वितरण स्वीकारलंही. बहुधा नवाकाळला ते मान्य नव्हतं. त्यांनी शिंगोटेंना दूर केलं. कालनिर्णयचं दैनिकही अत्यल्पजीवी ठरलं. मुरलीधर शिंगोटेंकडे काहीच उरलं नाही. पण ते शांत बसले नाहीत. त्यांना स्वत:च्या वितरण साखळीत काम करणाऱ्यांचीही काळजी होती.  त्यांनी स्वत:चंच दैनिक सुरु करण्याचा निर्धार केला. मुंबई चौफेर या सायंदैनिकाच्या रुपानं प्रत्यक्षात आणला. त्यानंतर त्यांनी पुढेच झेपावणं सुरु केलं. वार्ताहर, हिंदीतील लोकप्रिय असं यशोभूमी आणि अन्य अनेक भाषांमधील दैनिकं त्यांनी प्रकाशित केली. 

अभिमान म्हणजे मराठी दैनिक, चॅनलचे मालक अमराठी असताना मुरलीधर शिंगोटे हा अस्सल मराठी माणूस हिंदी, तमिळ, कन्नड दैनिकांचाही मालक होता! मध्यंतरी इंग्रजी दैनिकाचा प्रयोग मोठा फटका देणारा ठरला. तरीही त्यांनी नव्या पिढीसह दै. पुण्यनगरी महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पोहचवला. 

अनेकांना ठाऊक नसेल त्यांचा न्यूजसेंस. मी ऐकलेला. अंक छापायला जाईपर्यंत ते लक्ष ठेवत. कोणती बातमी वाचकांना भावेल ते लक्षात घेऊनच पहिलं पान. नवी बातमी आली तर छपाई थांबवून ती घेण्याचा कटाक्ष. 

एक वृत्तपत्र वितरक ते अनेक भाषांमधील दैनिकांचे मालक. अभिमान वाटावा असाच खराखुरा शुन्यातून शिखरापर्यंतचा आपल्या माणसाचा प्रवास ! 

- तुळशीदास भोईटे

Sunday, December 23, 2018

शेतकऱ्यांचं करायचं तरी काय?


तुळशीदास भोईटे (९८३३७९४९६१)



करदाते असल्याच्या बुरख्याआड व्हायरल केल्या जाणाऱ्या काही पोस्टना धड न वाचताच आणि काडीचाही विचार न करता फॉरवर्ड करण्याची चूक आपल्यातील काही करतात. अशांना या चुकीपासून वाचवण्यासाठी शेतकरी कोण ते सांगण्याची गरज आहे. काही स्वार्थांधांनी जाणीवपूर्वक पसरवलेल्या विखारी आणि विषारी अपप्रचाराला बळी पडू नये यासाठी हा एक प्रयत्न.


शेती आणि शेतकऱ्याचं महत्व
शेती, शेतकरी म्हटलं की नाक मुरडण्याची एक फॅशन अनेकांमध्ये दिसून येते. शेतकरीही माणसं आहेत. ते अगदीच सरळसाधे नसतील पण सर्वच काही लबाडही नसतात. मात्र काही अपप्रवृत्तींकडून तसं जाणीवपूर्वक पसरवलं जातं. शेती म्हणजे आपल्यावरचं ओझं, शेतकरी आपले पोशिंदे नसून आपणच जणू त्यांच्यावर उपकार करतोय, आपणच त्यांचे पोशिंदे आहोत असा काहींचा विखारी समज हा कसा गैरसमज आहे ते साधं सरकारी आकडेवारीवर लक्ष टाकलं तरी कळतं.
शेती आपल्या देशातील ५० टक्के लोकसंख्येला रोजगार पुरवते. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचं मोठं स्थान आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या म्हणजेच जीडीपीचा १८ टक्के वाटा शेतीच्या उत्पन्नाचा आहे. गेल्या जागतिक आर्थिक मंदीच्यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीला एवढं महत्वाचं स्थान नसतं तर अधिकच मोठा फटका बसला असता, असं सांगितलं जातं हे विसरून चालणार नाही. तसंच ५० टक्के रोजगार पुरवणारं हे क्षेत्र आक्रसलं गेलं तर महानगरांकडे, शहरांकडे येणाऱ्या लोंढ्यांमुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव येऊन कशी अनवस्था ओढवेल हे सहजच कळू शकतं. या साऱ्यातून शेतीचं आणि शेतकऱ्यांचं महत्व कळण्यास हरकत नसावी.

शेतकरी करदाते नसतात
वैयक्तिक आयकर म्हणजेच कर उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत नाही. देशाला कररूपे मिळणाऱ्या उत्पन्नात वैयक्तिक आयकराचा भाग २३.३ टक्के आहे. पण इतर कर ७६.७ टक्के उत्पन्न देतात. शेतीवर आयकर नसला तरी शेतकरी तुमच्या माझ्यासारखीच इतरही वस्तुंची खरेदी करत असतो. सेवांचा वापर करत असतात. स्वाभाविकच त्यावर असलेले कर तेही देत असतात. म्हणजेच ते प्रत्यक्ष करदाते नसले तरी अप्रत्यक्ष करदाते आहेतच.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखादी काडीपेटी घेतली तरी त्यावरही कर असतो. ती काडीपेटी विकत घेतली म्हणजे तो कर तुम्ही आम्ही देतो तसा शेतकऱ्यांनाही आपोआपच द्यावा लागतोच. तेच इतरही वस्तू आणि सेवांच्या बाबतीत. पुन्हा हे सारे कर काही डोकं वापरून चलाखी दाखवतं कर परतावा मिळवून देणारे नसतात!
त्यामुळे शेतकरी म्हणजे फक्त घेणारे हे डोक्यातून काढून टाकून तेही करदाते आहेत हे मान्य केलंच पाहिजे.

शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज का?
शेतकऱ्यांवर होणारा कर्जाचा बोजा हा नैसर्गिक आपत्ती, सरकारची काही चुकीची धोरणं अशा अस्मानी सुलतानीमुळे होत असतो. तो फेडण्यासाठी मदतीची गरजच भासणार नाही जर आपलं सरकार शेतीला उद्योग मानून त्यासाठी आवश्यक पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्था, बियाणं, खत वगैरे इतर आवश्यक कच्च्या मालाचा विनाव्यत्यय आणि रास्त दरात पुरवठा करू शकेल. तसंच शेती उत्पादनाला योग्य हमीभावासह बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडली गेली. तसं होत नाही. लूटमार होते. त्यातूनच कर्जाचा बोजा वाढतच असतो.
सर्वात महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे. आपण वापरतो तो दहा रूपयांचं पेन. साधं पेन. पेनाचा उत्पादन खर्च पाच रूपये असेल तर उत्पादन खर्च, वाहतूक खर्च, कमिशन, हा सर्व खर्च आणि त्यावर नफा असं सर्व मोजून त्यावर दहा ते पंधरा रूपये विक्री मूल्य आधीच ठरवलं जातं. शेतीमालाच्या बाबतीत तो बाजारात जाईपर्यंत विक्रीमूल्य काय असेल त्याची शेतकऱ्याला कल्पनाच नसते. त्यामुळे तो जे काही करतो ते बेभरवशाचं असतं.
आपत्तींमुळे कसलाच भरवसा नसतो. त्यामुळे शेती हा तोट्याचाच उद्योग होत राहतो. यामुळे स्वाभाविकच जसं खाजगी उद्योगांना, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जगवण्यासाठी बेलआऊट पॅकेजेस दिली जातात तशी शेतीलाही देण्यात गैर नाही.
अर्थात कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे कर्जाची पाळी येऊ नये यासाठी शेती फायद्याचा व्यवसाय झाला पाहिजे. कर्जबाजारीपणाची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा देऊन सक्षम शेतीचं स्वप्न साकारता येईल. कष्टकरी शेतकऱ्याला स्वाभिमानानं जगण्याची संधी देता येईल.
सध्यातरी आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हा प्राथमिक उपाय आवश्यकच होता. मात्र तो कायमस्वरूपी उपाय असूच शकत नाही. पुढच्या टप्प्यात इतर उपाययोजनांच्या माध्यमातून शेती सक्षम करणं आवश्यक आहे. सुदैवानं सध्याचं सरकार त्यादृष्टीनं विचार करू लागलंय. तसं प्रत्यक्षात व्हावं. फक्त कागदावर न राहता ते प्रत्यक्षात यावं.

शेतीकर्ज माफ होतं मग आमचं गृहकर्ज का नाही?
विखारी अपप्रचार करणारे शेतकऱ्यांचं करता मग मध्यमवर्गीयांचं गृहकर्ज का नाही माफ करत असाही मुद्दा मांडतात. हा मुद्दा तसा अनेकांना पटतोही. मात्र येथे शेतीकर्ज आणि गृहकर्जातील फरक लक्षात घेतला पाहिजे. गृहकर्ज परवडेल अशा दरात मिळावं. व्याजदरात कपात व्हावी. इतर सवलती मिळाव्यात. सर्वात महत्वाचं पहिलंच घर घेणाऱ्यांना मुद्रांक शुल्कातही सवलत मिळावी.
मात्र गृहकर्ज माफ करण्याची अपेक्षा बाळगली जाऊ शकत नाही. गृहकर्ज कुणीही घेतलं तरी ते मालमत्तानिर्मितीसाठी असतं. वैयक्तिक लाभासाठी घेतलेलं कर्ज माफ करण्याची अपेक्षा कर्ज घेणारेही बाळगत नाहीत, मात्र काही उपद्रवी अपप्रवृत्ती तशा पुड्या मात्र सोडत असतात. त्यांचा उद्देश हा विखारी असतो. शहर विरूद्ध शिवार असा संघर्ष भडकवण्याचाच असतो. डोकी भडकवण्याचाच असतो.
आपल्याला गृहकर्जासाठी कमी व्याजदर, योग्य सवलती आणि मुद्रांकशुल्कातील लूटमार थांबली पाहिजे, पण त्याची तुलना शेतीकर्जाशी नसावी.

शेतकरी कसा होणार सक्षम?
शेतकरी सक्षम व्हावा यासाठी शेती सक्षम करणं आवश्यक आहे. त्यासाठी शेतीसाठी अनेक उपाययोजनांवर खूप चर्चा झालीय. मी सध्यातरी फक्त थेट विक्रीच्या बाबतीत काही कल्पना मांडतो.
तुम्ही आम्ही शेतीमाल घेतो तो काहीवेळा कमालीचा महाग असतो. अनेकदा बातम्या येतात. शेतीमाल कवडीमोलानं विकावा लागला. तरीही आपल्याला शहरात तो महागच घ्यावा लागतो. मग यावर उपाय आला तो शेतकऱ्याला शेतीमाल थेट शहरी ग्राहकाला विकू देण्याचा. त्यामुळे मग अनेक ठिकाणी शेतीमाल घेऊन शेतकरी शहरात दिसू लागले. मात्र त्यांना दरवेळी ग्राहक मिळतातच असं नाही. अनेकदा त्यांचा माल तसाच पडून राहतो. त्याचं कारण शहरी ग्राहकांना ताजा, चांगला आणि तुलनेनं स्वस्त शेतीमाल पाहिजे असला तरी तो त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे तेथे मिळतोच असं नाही. तसंच शेतकरी नेमके कधी येतील ते माहित नसतं. जेथे माहित असतं तेथे विक्री होताना दिसते. हाच प्रकार अपवाद वगळता आठवडी बाजार सारख्या चांगल्या सरकारी उपक्रमांच्या बाबतीतही दिसतो. 
त्यामुळे यावर काही वेगळे उपाय करता येतील.
  • ·        शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना विक्री केंद्रांसाठी जागा
  • ·   शहरातील सार्वजनिक रुग्णालयं, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालयं, मनपा कार्यालयं. सांस्कृतिक केंद्रं, मैदानं, वाहतूक केंद्रं, बाजारकेंद्रं याठिकाणी दोनशे फुटांचे सुविधायुक्त गाळे शेतीमाल विक्री केंद्र म्हणून विकसित करावीत.
  • ·   सध्या खाद्यविक्री केंद्रं म्हणून छोट्या वाहनांचा वापर होतो तशी कायदेशीर परवानगी शेतीमाल विक्रीसाठीही देण्यात यावी
  • ·    हे गाळे असतील ती ठिकाणे गर्दी येणारी असल्याने कायम ग्राहक असतील. विक्री वाहनांसाठीही पार्किंगची खास परवानगी असावी.
  • ·         हे गाळे, विक्री वाहन परवाने देताना शेतकरी कुटुंबियांना, गिरणी कामगारांना, माथाडींना अग्रक्रमानं देण्यात यावेत.

·         गर्दीच्या ठिकाणी थेट विक्रीची संधी मिळाल्यानं शेतकऱ्यांचा फायदा आणि ताजा, स्वच्छ आणि स्वस्त मिळाल्यानं ग्राहकांचाही फायदा. असा शिवार – शहर मैत्रीचं नातं वाढवणारा प्रयोग होऊ शकेल.
शेतीसाठी असे काही सोपे उपायांचे प्रयोग केले तर नक्कीच चांगलं काही घडू शकेल. त्याचा फायदा सर्वांनाच. शेवटी जे पेरावं ते उगवतं हा निसर्गाचा नियमच. चांगलं पेरलं तर सर्वांसाठीच चांगलं उगवेल.

Friday, April 21, 2017

लेकींचे बळी थांबवा!


मी शीतल व्यंकट वायाळ,
चिठ्ठी अशी लिहते की
माझे वडिल मराठा कुणबी समाजात जन्मले असल्यामुळे त्याच्या
शेतात सलग पाच वर्षांपासूनच्या नापीकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थीती अत्यंत हालाकीची व नाजूक असून माझ्या दोन बहिणींची लग्न गेटकेन करण्यात आले. परंतु माझं लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती.
कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्यामुळे दोन वर्षांपासून माझं लग्न थांबलं होतं.
तरी मी माझे माझ्या बापावरील वज कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रुढी, परंपरादेवानघेवान कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे.
तरी मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.

-    शितल वायाळ

शीतलची ही चिठी. तिनं जशी लिहिली तशी, शब्दाचाही बदल न करता, अगदी पांढरपेशांच्या प्रमाणमराठीत न आणता जशी आहे तशीच मांडली. शीतलनं जे लिहिलं आहे ते सर्वांनाच थोबाडात मारणारं आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज काय असे तारे तोडणाऱ्यांपासून ते इतिहासातील पराक्रमात रमून वर्तमानात मागे पडलेल्या आणि भविष्यही करपवत चालललेल्या काही कडवट मराठा जात अभिमान्यांपर्यंत साऱ्यांच्याच डोळ्यात लातुरच्या या लेकीनं झणझणीत अंजन घातलंय.
समाजातील या दोन टोकाच्या दोन प्रवृत्ती आहेत. एक शेतकऱ्यांना कशाला उगाच मदत करायची? कशाला कर्जमाफी द्यायची? त्यांना शेतकरी म्हणजे फुकटच्याला सोकावलेले बनेल टगे वाटतात. दुसऱ्यांच्या पैशानं पंचतारांकित हॉटेलमध्ये पुख्खा झोडायची ज्यांना सवय असते असे अनेक महाभाग या प्रवृत्तीचे आहेत. खरं तर शेतकऱ्यांना बनेल टगे समजणारे हेच खरे बनेल टगे. त्यांना साधं बिलही द्यावं लागत नाही. दिलं तरी त्यासाठी वापरलेला पैसा दुसऱ्याच कुणी तरी दिलेला असतो. त्यामुळे दिली ऑर्डर की पाहिजे ते मिळतं. कधी काही कमी पडत नसतं. पाणीही अहो मिनरलच काय आता तर फ्लेवर्ड मिळू लागलंय. कॅश देऊन असो की कॅशलेस पैसा मोजला की सारं मिळतं ना. अशा फुकटचंद माजोर्ड्यांना काय कळणार पाणीटंचाई आणि काय कळणार त्यांच्या प्लेटमध्ये वाढला...माफ करा सर्व्ह केला जाणारा मोत्याचा दाणा पिकवणारा शेतकरीच त्याच मोत्याच्या दाण्याला स्वत: मात्र कसा पारखा असतो ते!
          शीतलच्या चिठीतील शेतात सलग पाच वर्षांपासूनच्या नापीकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थीती अत्यंत हालाकीची व नाजूक हे वाक्य शेतकऱ्यांची परिस्थिती कशी करपतेय ते दाखवण्यास पुरेसं आहे. मात्र लक्षात कोण घेतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहे. मला हा माणूस काही तरी करण्याची धडपड करणारा सकारात्मक नेता वाटतो. शेतकरी सक्षमीकरणाची त्यांची भूमिका योग्यच. मात्र तो दीर्घकालीन इलाज आहे. आवश्यकच. मात्र तोपर्यंत मरणपंथावर असलेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या खऱ्या गरजू वर्गाला कर्जमाफीच्या सलाईनचीही आवश्यकता आहे. उत्तरप्रदेशमधील योगी पॅटर्नचा त्यांनी अभ्यास सुरु केला आहे. अपेक्षा आहे ते शेतकऱ्यांना वाचवतील. कारण शेती सक्षमीकरणासाठी आधी शेतकरी जगणं महत्वाचं!
     हे एकीकडे. दुसरीकडे शीतलचा बळी घेणारी समाजातील बुरसटलेली व्यवस्था. मी माझे माझ्या बापावरील वज कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रुढी, परंपरादेवानघेवान कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. हे शीतलचं वाक्य आपल्या लेकींचे बळी घेणाऱ्या तिसऱ्या गुन्हेगाराकडे बोट दाखवणारे आहेत. पहिले गुन्हेगार ते नराधम जे कोपर्डीसारख्या घटनांमध्ये वासनांधतेने लेकींचे लचके तोडून हालहाल करुन बळी घेतात. दुसरे गुन्हेगार ते जे शेतकऱ्यांना माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचे हक्क हिरावून घेतात, किंवा फक्त स्वत:च्या राजकारणासाठी वापरून घेतात. ज्यामुळे शेतकरी, त्यांच्या लेकींचे असे बळी जातात. तिसरे शेतकी समाजाचा मोठा भाग असणाऱ्या मराठा समाजातील हुंडा-मान-पान रुढी-परंपरा. ज्यांच्यामुळे लेकींच्या लग्नात शेतकरी पिचून जातो. या रुढी परंपरा सर्वात मोठे गुन्हेगार आहेत.
लातुरच्या लेकीने या जुनाट बुरसटलेल्या रुढी परंपरा या गुन्हेगारांकडेही आपलं लक्ष वेधलं आहे. समाज कोणताही असो. ज्या समाजात या रुढी असतील त्या समाजाला दुसऱ्या शत्रूंची गरजच नाही. जमीन कमी होत जाते, पण हुंडा मात्र वाढत जातो. शीतलच्या वडिलांनी दोन मुलींची लग्न बहुधा हुंडा देऊन केली नाहीत. त्यांनी कुंकवावर लग्न लावण्याची गेटकेन ही पद्धत वापरली. ते चांगलंच. पण शीतलनं चिठ्ठीत देवान-घेवानचाही उल्लेख केला आहे. हुंडा नाही पण हे ओझंही शेतकरी वधुपित्याचं कंबरडं मोडत असावं. नाहीतर शीतल असं लिहिणार नाही. ती स्पष्ट लिहिते, बापाचं वज कमी करण्यासाठी. लेकी बापाला ओझे वाटत नसतात. वाटू नयेच. पण आपल्या लेकींना त्या बापावरील ओझं वाटणं हे आपल्यासाठी कलंकाचं ओझंच!
मधल्या काळात मराठा क्रांति मोर्चाचा एक अभिमान वाटावा असा सामाजिक प्रयोग झाला. अनेकांनी त्यावेळी मराठा समाजात जात्यंधता वाढल्याचे शोध लावले होते. मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने मोर्चे निघत असल्याचे साक्षात्कार अनेकांना झाले होते. मात्र त्याच मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला नंतरच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयांनी ते साक्षात्कार कसे पूर्वग्रहदुषित होते ते सिद्ध झाले. नाहीतर ३०-३५ टक्के मतदार एकगठ्ठा विरोधात गेले असते आणि मोर्चामागे आहेत असा उल्लेख केला जायचा त्या राष्ट्रवादी काँग्रेसमागे ते मतदार एकगठ्ठा गेले असते तर निवडणुकीचे निकाल वेगळेच असते. ते असो. तो विषय नाही.
मुद्दा क्रांति मोर्चाच्या सामाजिक प्रयोगाचा. शिस्त, संयम, स्वच्छता हे त्रिगुण केवळ मोर्चापुरते नकोत. तसंच लेकींना निवेदन देण्यापुरतं प्रतिकात्मक वापरलं जाणंही नकोच. जिजाऊंचे, सावित्रीबाईंचे, अहिल्यादेवींचे केवळ भाषणापुरतं नाव घ्यायचं नाही. तसे मायभगिनींनीही आता प्रत्यक्षात वागायचं. शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण जसं महत्वाचं तशीच समाजात हुंडाबंदी, देवान-घेवाणींना फाटा आणि सर्वांसाठी शिक्षणही महत्वाचंच. समाज कोणताही असो. हे जर झाले नाही तर आपल्याला येणारा काळ माफ करणार नाही. कोपर्डीच्या लेकीचा बळी घेणाऱ्या नराधमांना शिक्षा होणारच. मात्र लातुरच्या लेकीचा बळी घेणाऱ्या नराधम रुढी-परंपरांचे काय? त्यांनाही संपवावेच लागेल. तोच खरा न्यायासाठीचा लढा ठरेल. लेकींचे बळी घेणारे नराधम...मग ते वासनांध असो वा बुरसटलेल्या रुढी-परंपरा...कुणीही असो त्यांना संपवणं हीच खरी शिवनिती. तरच शिवछत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार!
         


- तुळशीदास भोईटे
संपादक, दै.जनशक्ति-मुंबई
9833794961
Twitter - @TulsidasBhoite 

Friday, April 14, 2017

सकल समष्टीचे प्रेरणादाते!

सकल समष्टीचे प्रेरणादाते!
बाबासाहेबांविषयी लिहायचं, बोलायचं झालं की नेमक्या कोणत्या पैलूवर लिहावं, बोलावं असा प्रश्न पडतो. त्यांचं व्यक्तिमत्वच तसं. अष्टपैलू म्हणावं तर अष्टहा शब्दही तोकडा वाटू लागतो. पुन्हा त्यात उद्धारकवगैरे उपाध्याही मला त्यांना एका मर्यादेत कोंडणाऱ्याच वाटतात. उगाचच सुर्याला सकाळी झोपेतून उठवणारा असं म्हटल्यासारखंच.
सूर्य ऊर्जादाता. अवघ्या चराचराला गतिमान ठेवणारा. ऊर्जेनं साऱ्यांनाच भारून चैतन्यांना अवघ्यांना सळसळवणारा. निरंतर मिळणाऱ्या त्याच्या ऊर्जेमुळे अवघी सृष्टी चालते. त्याच्या प्रभावाखाली घडत नाही असं सृष्टीत काही नसावं. पर्वतशिखरांना गवसणी घालणाऱ्या वाऱ्यापासून समुद्रात उसळणाऱ्या लाटांपर्यंत सारं काही सुर्याच्या प्रभावाखालीलच. रात्री जरी तो नसला तरी चंद्राकडून येणारी शितल किरणही मुळात सुर्याच्याच प्रभावाचीच.
मग अशा सुर्याला कसं पाहायचं? दिवस ज्याच्यामुळे उगवतो आणि आम्हाला झोपेतून उठावे लागतं तो सूर्य असं त्याला छोटं करुन पाहाणं योग्य ठरेल? बाबासाहेबांचंही तसंच. त्यांनी उद्धार केलाच. समाजाला जागवलंच. गुलामगिरीतच खितपत पडून त्यालाच आपलं जीवन मानणाऱ्यांना ते चुकीचं असल्याची जाणीव तर करुन दिलीच पण त्या अवस्थेतून बाहेरही काढलं. मुळात हे करणं, ते ही त्याकाळी ज्यावेळी सकल समाज खूपच वेगळ्या मानसिकतेत होता, मुळीच सोपं नव्हतं. पण बाबासाहेबांनी ते करुन दाखवलं.
पण केवळ ते तेवढ्यावरच कुठे थांबले? जागवलं आणि सोडून दिलं. आता आपलं आपण पाहून त्यांचं ते पाहतील, असंही नाही त्यांनी केलं. एका समाजघटकावरील शतकानुशतकांचा अन्याय दूर केलाच. मात्र नंतर ते तेथच थांबले. त्यातच समाधान मानून पुढे काहीच केले नाही, असंही नाही. जागवल्यानंतर माणूस म्हणून आत्मभान दिल्यानंतर माणूस म्हणून उभे करण्यासाठी शिक्षणाचा जीवनमंत्रही दिला. मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी बाबासाहेबांनी उभारलेल्या शिक्षणसंस्था या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केलेल्यांना माणूस म्हणून उभे करणाऱ्या प्रयोगशाळा होत्या. स्वत:चं महत्व वाढवणारी शिक्षणसाम्राज्य नव्हती. पुन्हा ती विशिष्ट वर्गांसाठीच मर्यादित असं करण्याचा विचारही या अमर्याद प्रतिभेच्या धन्याच्या मनात आला नसावा.
त्यातूनच त्यांचं सर्वव्यापी कर्तृत्व दिसतं. ज्यांचा उद्धार केला, त्यांच्यापलिकडे पाहिलेच नाही असेही नाही. उलट ज्यांच्या शोषण व्यवस्थेतून त्यांनी एका समाजघटकाला सोडवलं त्या शोषक समाजघटकांसाठीही त्यांनी खूप काही केलं. स्वातंत्र्यानंतरच्या नवभारताची जी व्यवस्था उभी राहिली ती जगातील सर्वोत्कृष्ठ घटनेच्या पायावर. सुर्य जसा ऊर्जा देताना त्याच्यासमोर येणाऱ्यांमध्ये भेदाभेद करत नसतो तशीच आपली घटना. भेदाभेद न करणारी. तसेच बाबासाहेब. सकल समाजाचा...सकल समष्टीचा विचार करुन त्यासाठीच जीवनभर प्रयत्न केले.
हिंदू कोड बिल. हा तर वेगळाच विषय. बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर केलेले मोठे उपकारच. मात्र का कोणास ठाऊक त्यावेळी पंडित नेहरु या उदारमतवादी महान नेत्याने मोरली करेक्ट वागण्यापेक्षा पॉलिटिकली करेक्ट वागणं पसंत केलं. काही कलम वगळता बिल अडवलंच गेलं. बाबासाहेबांनी समस्त हिंदू समाजाला लिंगभेद न करता दिलेले समानतेचे हक्क टाळले गेले. बाबासाहेब स्वाभिमान दाखवत मंत्रिमंडळातून बाहेर आले. पुढे काही वर्षांनी पंडित नेहरुंनी श्रेय घेत वेगळ्या कायद्यांच्या स्वरुपात त्यातील काही तरतुदी मंजूर केल्या. आणि मालमत्तेतही समान हक्क देण्याच्या सुधारणा तर आता काही वर्षांपूर्वी कऱण्यात आल्या. पण त्यात 60 वर्षे गेली. काळाचा पुढचा विचार करणाऱ्या बाबासाहेबांचे ऐकले असते तर माणूस म्हणून उभे राहणे अधिक सोपे झाले असते. बाबासाहेबांचा मंत्र हा सकलांचा सक्षमीकरणाचा होता. त्याचा फायदा सर्वांनाच झाला. अधिक झाला असता.
सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न चर्चेत आहे. अनेकांचे उल्लेख होतात. अनेक मिरवतात. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात व्हॉइसरॉय कॉन्सिलमध्ये असताना बाबासाहेबांनी बंगाल राज्यात जलसंधारणाच्या योजना राबवल्या त्यांचा स्थानिक शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. तसंच त्यांच्या नियेजन कौशल्यामुळेच अनेक मोठ्या धरणांचे नियोजन योग्य प्रकारे झाले. त्यातही सर्वात मोठे धरण असणाऱ्या भाक्रा-नांगल प्रकल्पातील त्यांचे योगदान तर तेच जनक म्हणून उल्लेख करावा असेच मानले जाते.
नोटाबंदीनंतर आर्थिक विषयांवरील बाबासाहेबांच्या अभ्यासाची खूप चर्चा झाली. प्रॉब्लम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहून देशाला आर्थिक मार्गदर्शनही केल्याचे नव्याने लक्षात आले. पण इंग्रजी राजवटीत रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीपासून रुपयाच्या अवमुल्यनाबद्दलही तत्कालिन सत्ताधाऱ्यांना रोखठोक सल्ला देणारे अर्थतज्ज्ञ बाबासाहेब तसे कमीच ज्ञात आहेत.  
बाबासाहेब हे बाबासाहेब होते. त्यांना उगाचच कोणत्याही एका विशिष्ट प्रतिमेत, मर्यादेत कोंडणे म्हणजे सूर्याला जाड काळ्या काचेतून पाहून तो किती छोटा दिसतो त्याचा भ्रामक आनंद मिळवण्यासारखंच मूर्खपणाचे आहे. ते उद्धारक होतेच...पण अखंड मानवजातीचे. कारण त्यांनी दिलेल्या घटनेने भारतीयांना जसं समानपातळीवर आणलं तसंच विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात स्वातंत्र्य झालेल्या आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांनी आपल्याच घटनेच्या प्रकाशात मार्गाक्रमण केले.
कोणीही असो. क्षेत्र कोणतेही असो. अवस्था कितीही बिकट असो. बाबासाहेबांचे त्याक्षेत्रातील योगदान आठवायचे, विचार आठवायचे आणि प्रेरणा घेऊन आपलं कर्तृत्व उभारायचं. त्यामुळेच बाबासाहेब आहेत आणि असणारच ते म्हणजे एक मोठे प्रेरणादाते. ज्यांना-ज्यांना माणूस म्हणून जगायचं आहे, त्या सकलांसाठी.

-    तुळशीदास भोईटे